श्रीलंका, आयर्लंड पराभूत, डॅनी वेट हॉज, कॅथरीन ब्राईस सामनावीर
वृत्तसंस्था, बर्मिंगहॅम, मँचेस्टर
2026 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंड आणि स्कॉटलंड यांनी विजयी सलामी देत आपल्या मोहीमेला प्रारंभ केला.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने लंकेचा 87 धावांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडने आयर्लंडवर 40 धावांनी मात केली. इंग्लंडची नाबाद शतकवीर डॅनी वेट हॉज तसेच स्कॉटलंडची कॅथरीन ब्राईस यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
बर्मिंगहॅमच्या पहिल्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत 20 षटकांत 1 बाद 219 धावा जमवित लंकेला 220 धावांचे आव्हान दिले. पण लंकेचा डाव 20 षटकांत 132 धावांत आटोपल्याने त्यांना हा सलामीचा सामना गमवावा लागला.
इंग्लंडच्या डावामध्ये अॅमी जोन्स आणि डॅनी वेट हॉज यांनी पहिल्या गड्यासाठी 13.4 षटकांत 135 धावांची शतकी भागिदारी केली. षटकामागे 10 धावांची गती राखत इंग्लंडने 200 धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकांत 51 धावा जमविल्या. जोन्स आणि हॉज या जोडीने शतकी भागिदारी 60 चेंडूत नोंदविली. अॅमी जोन्सने 38 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 53 धावा झळकविल्या. जोन्सने आपले अर्धशतक 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. 14 षटकात लंकेच्या मदाराने जोन्सला झेलबाद केले.
हॉज आणि कर्णधार नॅट स्कीव्हेर ब्रंट यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 84 धावांची भागिदारी 38 चेंडूत झळकविली. ब्रंटने 22 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 46 तर हॉजने 62 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 105 धावा झोडपल्या. हॉजने 61 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह शतक पूर्ण केले. हॉजने आपले शतक शेवटच्या षटकात पूर्ण केले. इंग्लंडच्या डावात 3 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे मदाराने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 132 धावांत आटोपला. निलाक्षीका सिल्वाने 33 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 39 तर समरविक्रमाने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29, करुणारत्नेने 1 चौकारासह 11, दिलहारीने 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे केम्पने 22 धावांत 4 तर चार्ली डीन आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 2 तसेच बेल आणि स्मिथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेने पहिल्या 6 षटकांत 39 धावा जमविताना 3 गडी गमविले. या सामन्यात इंग्लंडला 2 गुण मिळाले.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 20 षटकांत 1 गडी बाद 219 (डॅनी वेट हॉज नाबाद 105, अॅमी जोन्स 53, ब्रंट नाबाद 46, अवांतर 15 मदारा 1-51), लंका 20 षटकांत सर्वबाद 132 ( निलाक्षीका सिल्वा 39, समरविक्रमा 29, करुणारत्ने 11, दिलहारी 19, अवांतर 11, केम्प 4-22, डीन व इक्लेस्टोन प्रत्येकी 2 बळी, बेल आणि स्मिथ प्रत्येकी 1 बळी).
स्कॉटलंडचा विजय
या स्पर्धेतील शुक्रवारी पहिल्या दिवशीच्या खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडने आयर्लंडवर 40 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी दिली. स्कॉटलंडने 20 षटकांत 5 बाद 161 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 19.1 षटकांत 121 धावांत आटोपला.
स्कॉटलंडच्या डावामध्ये कर्णधार कॅथरीन ब्राईसने 39 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 60 तर सारा ब्राईसने 35 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 49 धावा जमविल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 106 धावांची शतकी भागिदारी केली. सलामीच्या कार्टनने 1 चौकारासह 11 तर फ्रेत्झरने 1 चौकारांसह 15 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे कॅनींगने 27 धावांत 3 तर मेगुरे आणि केली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. स्कॉटलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 37 धावा जमविताना 2 गडी गमविले. कॅथरीन ब्राईसने अर्धशतक 32 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडचा डाव 19.1 षटकांत 121 धावांत आटोपला. सलामीच्या अॅमी हंटरने 36 चेंडूत 5 चौकारांसह 39, कर्णधार लेवीसने 1 चौकारासह 11, प्रेंडरगेस्टने 23 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 33, केलीने 2 चौकारांसह 15 आणि केनींगने 1 चौकारांसह नाबाद 10 धावा जमविल्या. स्कॉटलंडतर्फे फ्रेत्झर आणि गॉर्डन यांनी प्रत्येकी 3 तर कॅथरीन ब्राईसने 19 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात स्कॉटलंडला 2 गुण मिळाले.
संक्षिप्त धावफलक: स्कॉटलंड 20 षटकांत 5 बाद 161 (कॅथरीन ब्राईस 60, सारा ब्राईस 49, फ्रेत्झर 15, कार्टर 14, अवांतर 11, केनींग 3-27, मॅग्युरे आणि केली प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड 19.1 षटकांत सर्वबाद 121 (हंटर 39, प्रेंडरगेस्ट 33, लेव्हीस 11, केली 15, केनींग नाबाद 10, अवांतर 3, गॉर्डन व फ्रेत्झर प्रत्येकी 3 बळी, कॅथरीन ब्राईस 2-19).

