Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युद्ध संपवण्याचा करार दृष्टिपथात

युद्ध संपवण्याचा करार दृष्टिपथात

मेरिका-इराण संघर्ष थांबण्याची चिन्हे : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार : 60 दिवसांच्या युद्धविरामाबाबत सकारात्मकता

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन, तेहरान

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा धोका टाळण्यासाठी 60 दिवसांच्या युद्धविराम करारावर सहमती झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

शांततेच्या दृष्टीने सुरू असलेला हा मोठा करार मध्य-पूर्वेतील दीर्घकाळ चाललेला तणाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या ऐतिहासिक करारानुसार, सामान्य जलवाहतुकीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाईल. त्याबदल्यात, अमेरिका इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी शिथिल करेल आणि त्यांना मुक्तपणे तेल विकण्याची परवानगी देईल, असे समजते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध संपवण्याचा करार जवळपास अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये अंतिम तपशील निश्चित केले जात आहेत. आखाती देशांचे नेते आणि इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंतर हा करार अंतिम केला जात आहे. येत्या एक-दोन दिवसात शांतता कराराला मूर्त स्वरुप मिळू शकते. या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार असल्याने कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर एप्रिलमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर मोठे हवाई हल्ले केल्यावर मध्य-पूर्वेतील हा संघर्ष वाढला. इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही देशांनी एप्रिलच्या सुरुवातीला युद्धविरामावर सहमती दर्शवल्यापासून पडद्यामागे शांतता वाटाघाटी सुरू आहेत.

प्रस्तावित करारानुसार, इराण अण्वस्त्रs विकसित करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही असे वचन देईल. इराणने आपला उच्च संवर्धित युरेनियम कार्यक्रम पूर्णपणे मर्यादित करण्यास आणि आपल्या साठ्यातील 400 किलो युरेनियम काढून टाकण्यास सहमती दर्शवली आहे. तथापि, हे धोकादायक युरेनियम देशातून कसे आणि कोठे पाठवले जाईल हे अद्याप ठरलेले नाही. या मोठ्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्या सल्लागारांसोबत महत्त्वपूर्ण बैठकसत्र सुरू आहे.

युद्ध संपवण्यासाठी इराणने आपला उच्च संवर्धित युरेनियमचा साठा पूर्णपणे सोडून देण्यास सहमती दर्शवली की नाही याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. इस्रायलच्या मते हे 400 किलो युरेनियम अंदाजे 11 अणुबॉम्ब तयार करण्यासाठी पुरेसे असू शकते. इराण अण्वस्त्रs विकसित करण्याच्या अगदी जवळ असल्यामुळे एक मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवले जाणार

या करारानुसार, इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेले आपले सर्व सुरुंग पूर्णपणे काढून टाकण्यास सहमती होऊ शकते. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल व्यापार मार्गांपैकी एक असून त्यातून मोठी व्यापारी जहाजे जातात. ही सामुद्रधुनी खुली झाल्यास आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठांना आणि जागतिक पुरवठा साखळीला मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

करारामुळे इस्रायलमध्ये तीव्र चिंता

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारामुळे इस्रायलमध्ये मोठी राजकीय चिंता निर्माण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने वाटाघाटींमध्ये इस्रायलची भूमिका मर्यादित केल्यामुळे पंतप्रधान नेतान्याहू यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हा करार भविष्यात आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी इराणला एक शक्तिशाली साधन सहजपणे उपलब्ध करून देऊ शकतो, असा इस्रायलचा विश्वास आहे. शांतता चर्चा सुरू असतानाच इस्रायलने लेबनॉनमध्ये मोठ्या हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. या धोकादायक आणि प्राणघातक हवाई हल्ल्यांमध्ये किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

करारापूर्वी ट्रम्प यांच्या संपर्कात असलेले नेते

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान

युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान

कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी

पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी

जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय

बहरीनचे राजे हमद बिन ईसा अल खलिफा

इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (स्वतंत्र चर्चा)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat