Dailyhunt
अभिनेता रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : रामायण (Ramayana) या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक अखेर समोर आली असून, अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसत आहेत. 'राम' नावाचा हा टीझर अत्यंत खास मानला जात आहे, कारण ही महान कथा जागतिक स्तरावर भव्य स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जात आहे.
दिग्दर्शक नितीश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्यातील पहिल्या भागाची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. या टीझरमध्ये प्रथमच रणबीर कपूर श्रीराम यांच्या रूपात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट Prime Focus Studios, DNEG आणि Monster Mind Creations यांच्या सहकार्याने साकारला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भव्य निर्मितीमूल्यांसह ही कथा सादर केली जात असून, ती भारतीय संस्कृती आणि श्रद्धेशी घट्ट जोडलेली आहे.

टीझरमध्ये राम यांना केवळ नायक म्हणून नव्हे, तर कर्तव्य, करुणा आणि सत्य यांचे प्रतीक म्हणून दाखवण्यात आले आहे. अनेकांसाठी 'रामायण' ही केवळ कथा नसून श्रद्धा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या चित्रपटाचा उद्देश ही कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत आदर आणि संवेदनशीलतेने पोहोचवण्याचा आहे.


चित्रपटात श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. स्वतःच्या इच्छेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, कठीण प्रसंगातही ठाम राहणे आणि आदर्श आचरण राखणे या गुणांमुळे त्यांना 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हटले जाते. चित्रपटात या गुणांचे मानवी आणि भावनिक पद्धतीने दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भगवान रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर Ranbir Kapoor म्हणाला, 'मी रामाचे प्रतिनिधित्व करत आहे असे मला वाटत नाही. मी त्यांच्याकडून शिकण्यासाठी आलो आहे. त्यांचा साधेपणा आणि पवित्रता अत्यंत दुर्मिळ आहे. त्यांना समजून घेणे आणि आत्मसात करणे हा माझ्यासाठी नम्र करणारा अनुभव आहे.'

दिग्दर्शक नितीश तिवारी म्हणाले, 'रामायणाची सर्वात मोठी ताकद तिच्या भावनिक खोलीत आहे. ही केवळ चांगल्या-वाईटाची कथा नाही, तर निर्णय, त्यांचे परिणाम आणि योग्य गोष्ट करण्याची जबाबदारी यांची कथा आहे. रामांचा प्रवास अत्यंत मानवी आहे आणि आम्ही तो प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.'

निर्माते नमित मल्होत्रा यांनी सांगितले, 'रामाच्या कथेतली खरी ताकद त्यांनी काय जिंकले यात नाही, तर त्यांनी काय त्याग केला यात आहे. त्यांनी नेहमी कर्तव्याला इच्छेपेक्षा, सत्याला सोयीपेक्षा आणि त्यागाला स्वतःपेक्षा वर स्थान दिले.'
या भव्य चित्रपटात अनेक मोठे कलाकार झळकणार आहेत. साई पल्लवी (Sai Pallavi) माता सीतेच्या भूमिकेत, यश (Yash) रावणाच्या भूमिकेत, सनी देओल (Sunny Deol) हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे (Ravi Dubey) लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानासह भारतीय महाकाव्याची मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. संगीतासाठी Hans Zimmer आणि A. R. Rahman यांची जोडी एकत्र आली आहे.
राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या प्रवासावर आधारित ही कथा पुढे एका महान युद्धाकडे कशी वाटचाल करते, हे या चित्रपटातून उलगडले जाणार आहे. Ramayana Part 1 हा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai