Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बहुआयामी कार्यकर्तृत्वाचा ध्यास

बहुआयामी कार्यकर्तृत्वाचा ध्यास

सामाजिक बांधिलकी, सहकार, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांची तळमळ या विविध पैलूंतून, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्‍या विश्वास ठाकूर यांच्याविषयी...

माजिक बांधिलकी, सहकार क्षेत्रातील योगदान, साहित्य-कला-संस्कृतीची आवड, क्रीडा क्षेत्रातील सहभाग आणि शैक्षणिक उपक्रमांची तळमळ, अशा विविध पैलूंमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वास ठाकूर!

गेल्या अनेक दशकांपासून नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून, त्यांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रांत काम करताना, समाजातील सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून उपक्रम राबविण्याची त्यांची भूमिका त्यांच्या कार्यातूनही सातत्याने अधोरेखित होते. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालीच 'विश्वास को-ऑपरेटिव्ह बँके'ने, नाशिक शहरात शाखाविस्तार करत ग्राहकसेवेला प्राधान्य दिले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या या अनुभवाची दखल, विविध सहकारी संस्थांनीही घेतली आहे.

'नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन', 'महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन', तसेच 'महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन' आणि 'नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अ‍ॅण्ड क्रेडिट सोसायटीज' अशा संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि संचालक म्हणूनही जबाबदार्‍या सांभाळल्या. सहकार क्षेत्रापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, त्यांनी ज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रातही योगदान दिले. 'विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट'ची स्थापना करून, विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी चालना दिली.

याच माध्यमातून 'रेडिओ विश्वास' हे समुदाय रेडिओ केंद्रही सुरू करण्यात आले. याच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. स्थानिक पातळीवरील विषयांना व्यासपीठ मिळवून देतानाच, समाजातील विविध घटकांमध्ये संवाद निर्माण करण्याचा प्रयत्नही या माध्यमातून करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग विशेष असाच! आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण व्हावी, याच उद्देशाने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन न राहता, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचेही माध्यम व्हावे, यासाठी शैक्षणिक उपक्रमांना सामाजिक जाणिवेची जोड देण्यावर त्यांनी कायमच भर दिला.

साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही ठाकूर यांचा सक्रिय सहभाग मोठा आहे. त्यांच्या 'नात्यांचे सर्व्हिसिंग' या कथासंग्रहाचा तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला आहेत. साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याबरोबरच, त्यांनी विविध साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातही मोलाची भूमिका बजावली आहे. क्रीडा क्षेत्रातही विश्वास यांनी संस्थात्मक पातळीवर काम केले आहे. 'नाशिक जिल्हा अ‍ॅमेच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन', 'नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन' आणि 'महाराष्ट्र खो-खो असोसिएशन'शी संबंधित कामही त्यांनी केले आहे. युवकांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावे, अशीच त्यांची कायमच आग्रही भुमिका असते. क्रीडा क्षेत्रामुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना, सातत्य आणि आत्मविश्वास निर्माण होतो, याच भूमिकेतून विविध उपक्रमांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता, आरोग्यजागृती, तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारे उपक्रम राबवले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर उपक्रमांच्या माध्यमातून काम करणे, हाच त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग. खाद्यसंस्कृतीशी संबंधित विविध महोत्सवांचे आयोजन करून, नाशिकच्या सांस्कृतिक आणि खाद्यपरंपरेलाही व्यासपीठ मिळवून दिले. स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरा यांचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या कार्याची दखल विविध संस्था, प्रसारमाध्यमे आणि शासनस्तरीय समित्यांनी घेतली असून, त्यांना राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील सातत्यपूर्ण सहभाग, व्यापक सामाजिक संपर्क आणि नव्या उपक्रमांची उभारणी, ही ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये! एका क्षेत्रापुरते कार्य मर्यादित न ठेवता, समाजजीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करण्याची कार्यपद्धती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याप्ती अधोरेखित करते. नाशिकच्या सामाजिक जीवनात काम करताना विविध संस्था, कार्यकर्ते, विद्यार्थी, साहित्यिक, कलाकार, क्रीडापटू आणि सहकार क्षेत्रातील व्यक्तींशी सातत्याने त्यांचा संपर्क आला. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या अनुभवांचा उपयोग, पुढील उपक्रमांसाठी करण्याची संधीही मिळाली. बदलत्या काळानुसार सामाजिक गरजा बदलतानाच, त्यानुसार नवीन उपक्रमांची आखणी करण्याचा प्रयत्नही ठाकूर यांच्या कार्यातून दिसतो. नाशिकच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या विश्वास ठाकूर यांना, पुढील आयुष्यासाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा!

९४०४६८७६०८

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai