Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताचे कृतिशूर तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले

भारताचे कृतिशूर तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले

पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांनी असे एक विलक्षण रचनात्मक कार्य सर्जित केले आहे की, त्याचे इष्ट परिणाम आज समाजात प्रकर्षाने दिसतात. अर्थात, दादांनी कधीच त्यांच्या कार्याचा गाजावाजा न केल्याने, कदाचित बहुतांश समाजाला याविषयी तितकीशी माहिती नाही.

ती देण्याचाही या लेखाचा उद्देश नाही. कारण, दादांच्या वैश्विक कार्याबद्दल ५००-६०० शब्दांत सांगणे शयही नाही. स्वाध्याय कार्याचे परिणाम ही अनुभवण्याची गोष्ट असल्याने, ती लेखरूपात सांगून समजणारही नाही. पांडुरंगशास्त्री आणि त्यांच्या रचनात्मक कार्याविषयी जे भावले, ते अगदी थोडक्यात सांगण्याचा हा एक प्रयत्न.

आपल्या देशाचे कृतिशूर तत्त्वचिंतक 'पद्मविभूषण' पांडुरंगशास्त्री आठवले हे एक असे अजब रसायन आहे की, जे होते तर वेदशास्त्रसंपन्न प्रकांड शास्त्री; पण त्यांनी इतर बहुतांश समकालीनांप्रमाणे फक्त 'लेचर्स' देत न बसता, हजारो गावांत भ्रमण केले, ते माणसामाणसाला प्रेमाने भेटले, त्याला प्रेम आणि चारित्र्याने आपलेसे केले. त्यांच्यातील अस्मिता, तेजस्विता जागृत केली. अगदी बालवयात छोटा पांडुरंग आपल्या आजी-आजोबांना विचारे की, "एखाद्याला शिवायचे का नाही? जर प्रत्येक माणसाला भगवंतानेच निर्माण केले आहे, तर मग काही माणसे अस्पृश्य कशी?' माणसातील विषमता दादांना कमालीची अस्वस्थ करे. पुढे समज आल्यानंतर सतत विचार येत की, ज्या माझ्या भारत देशात इतके अवतार झाले, 'वेदोपनिषद', 'गीते'सारखे असामान्य तत्त्वज्ञान उगम पावले, त्या महान (!) देशातील माणसे अशी लाचार का? कणा मोडलेली का? दीन का? या व्यथेतूनच एका विराट रचनात्मक कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. मी ही अवस्था बदलीन, मी ही परिस्थिती बदलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, हा दृढनिश्चय झाला.

अर्थात, त्यांची भूमिका सुधारकाची किंवा समाजसेवकाची कधीच नव्हती, ती होती भक्ताची! भेदाभेदाच्या भिंती आहेत, तोवर सामाजिक क्रांती अशय आहे आणि जोपर्यंत माणूस विकत घेतला जातो, विकला जातो, तोपर्यंत विकासाच्या गावगप्पा हे स्वप्नरंजनच राहील, हे दादांनी ताडले. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून, शास्त्रीय भक्तीचा आग्रह त्यांनी धरला. हृदयस्थ भगवंत आणि त्या परस्पर भगवद्संबंधानेच फक्त माणूस माणसाजवळ येईल, त्याच्यातले भेद कोसळतील. हृदयस्थ भगवंत आणि ईश्वरी संबंध या भक्तीच्या रस्त्याखेरीज माणसांतील भेद काढण्याचा दुसरा मार्ग नाही. असे प्रत्यक्ष परिवर्तन दादांनी, हजारो गावांत करून दाखवले आहे. आज दादांच्या स्वाध्याय विचारांनी प्रेरित झालेल्या व परिवर्तित झालेल्या असंख्य गावांमध्ये भेद गळून पडले आहेत, केवळ 'प्लॅटफॉर्म'वर बोलण्यासाठी नाही, तर ते अंतःकरणातून मिटले आहेत. आज अशी गावेच्या गावे उभी आहेत की, जिथे 'स्वाध्याय' विचार रुजला आहे आणि तिथे बालसंस्कार केंद्रात जाणार्‍या लहान मुलालाही कुणी काही फुकट देऊन दाखवावे.

आज आपण दुर्दैवाने राष्ट्रनिर्माण म्हणजे रस्ते, पूल, धरणे, विमानतळ इत्यादी बांधणेच समजतो. या सर्व तर अत्यंत सामान्य बाबी आहेत, ते तर कल्याणकारी राज्य म्हणवणार्‍या देशात अपेक्षितच. परंतु, ज्या व्यक्तींनी राष्ट्र घडते, त्याला दृष्टिकोन कोण देणार? प्रत्येक व्यक्तीला मूल्यांचा आग्रह कोण समजावणार? त्याला अस्मिता, तेजस्विता कोण देणार? व्यक्तीला जर 'विकाऊ' आणि 'बकर्‍या'सारखेच ठेवायचे असेल, तर कसला विकास आणि कसले राष्ट्रनिर्माण? राष्ट्रातला माणूस जर लाचार, दुबळा, दीन, अस्मिताशून्य, दुसर्‍याच्या कृपेवर जगणारा असेल; तर राष्ट्रनिर्माणाची भाषाच फोल आहे. पांडुरंगशास्त्रींनी ठामपणे प्रतिपादन केले की, भगवंत केवळ मंदिरात नाही; तर तो आपल्या प्रत्येकाच्या बरोबर आहे, आपल्या प्रत्येक कृत्याचा साक्षी आहे. त्याला माझी गरज आहे म्हणून तो रोज मला उठवतोय, हा विचार जर मस्तिष्कात उतरला; तर माणसाचे आयुष्य नाही का बदलणार? जर विश्वाची नियामक शक्ती माझ्यात येऊन राहत असेल, तर मी हलका असूच शकत नाही. भगवंत सतत माझ्याबरोबर आहे हे समजले; तर माणसाची वृत्ती बदलेल, वर्तवणूक बदलेल, त्याची कृतीही बदलेल. हा दृष्टिकोन मिळणे म्हणजेच, खर्‍या अर्थाने 'विकास'!

आज समाजात बहुतेकवेळा पद, प्रतिष्ठा, सत्ता, पैसा किंवा विद्या याच गोष्टींनेच माणसाची ओळख होते. सामान्यतः आपण ओळख करून देताना काय म्हणतो? हा खूप मोठा डॉक्टर आहे हं, 'विद्यावाचस्पती' आहे, हा वित्तवान आहे वगैरे वगैरे. म्हणजेच, ओळख त्याच्या या बाह्य आभूषणांनीच केली जाते. त्याच्यातील मनुष्यत्वाला तशी काहीच किंमत नसते. मग सामान्य माणसात अस्मिता किंवा गौरव उभा करायचा असेल, तर कसा करणार?

बरे, समाजात अशी बाह्य आभूषणे असणारे लोक किती? फारतर १५-२० टक्के? म्हणजे, बाकी ८५ टक्के लोकांनी आपला गौरव कशात मानायचा? हा प्रश्न पांडुरंगशास्त्रींसारख्या द्रष्ट्या तत्त्वचिंतकाला पडला. थोडेफार वित्त किंवा गरजेच्या वस्तू देऊन आपण समाजाला चिरंतन सुखी करू शकतो, अशा भ्रामक कल्पनेत जगणार्‍या समाजशास्त्रींना हा प्रश्न कधी पडतो की नाही, याची कल्पना नाही. पण, पांडुरंगशास्त्रींनी तार्किकदृष्ट्या सांगितले की, भले तुझ्याकडे वित्त नसेल, विद्या नसेल, सत्ता नसेल, पद-प्रतिष्ठा नसेल; पण तुझ्याबरोबर तुझा राम आहे, यापेक्षा आणखी तुझा तो गौरव काय? दादांनी याच विचारांनी, माणसातला गौरव वर्धिष्णू करण्याचा महत्प्रयास केला. सामान्यांपासून सुरुवात करून ज्याच्याकडे सर्व भौतिक आभूषणे आहेत, त्यांपर्यंत 'तुझा गौरव तुझ्या आत येऊन बसलेल्या भगवंतामुळे आहे' ही भावना दृढ केली. एका स्वाध्यायी कवीने म्हटले आहे, "दादांच्या जीवनाचे वर्णन काय करावे? मनुष्य गौरव केवळ हो, दुसरे काही नाही.' अशा दादांचा दि. १९ ऑटोबर हा जन्मदिवस, अखिल विश्वात 'मनुष्य गौरव दिन' या सार्थ नामाभिधानाने साजरा होतो.

यावर्षी दि. १९ ऑक्टोबरच्या 'मनुष्य गौरव दिना'निमित्त, दीड लाखापेक्षा जास्त स्वाध्यायी दि. २२ ते दि. २५ ऑक्टोबर या दिवसांत, जवळपासच्या तालुयांत लाखो माणसांना निरपेक्षपणे भेटण्यासाठी फिरणार असून, दादांना कृतिपूर्ण मानवंदना देणार आहेत. एका प्रकांड तत्त्वचिंतकाला आपल्या प्रामाणिक कृतीने भाववंदन करणार आहेत.

-आमोद दातार
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai