Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारत-चीनमधील ऐतिहासिक 'शिपकी ला' मार्गावरील सीमाव्यापार सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू; का आहे मार्ग भारतासाठी महत्त्वाचा, यावरून किती मालाची वाहतूक होईल? जाणून घ्या.

भारत-चीनमधील ऐतिहासिक 'शिपकी ला' मार्गावरील सीमाव्यापार सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू; का आहे मार्ग भारतासाठी महत्त्वाचा, यावरून किती मालाची वाहतूक होईल? जाणून घ्या.

वी दिल्ली (Shipki La Border Trade) : भारत आणि चीन यांच्यातील ऐतिहासिक 'शिपकी ला' मार्गे होणारा सीमाव्यापार तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाला आहे. या प्राचीन व्यापारमार्गाच्या पुनरारंभामुळे शतकानुशतके महत्त्व असलेल्या सिल्क रूटवरील व्यापाराला पुन्हा गती मिळणार असून हिमाचल प्रदेशातील सीमावर्ती भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोविड महामारीमुळे २०१९-२०२० दरम्यान सीमाव्यापार बंद करण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या तणावामुळे हा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. आता सहा वर्षांनंतर हा मार्ग पुन्हा खुला झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी रोजगार आणि उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

हिमालयातील उंच आणि दुर्गम भागातून जाणारा 'शिपकी ला' हा मार्ग केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, सीमासुरक्षा, स्थानिक लोकजीवन आणि भारत-चीन संबंधांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. (Shipki La Border Trade)

'शिपकी ला' सीमाव्यापाराचा इतिहास

भारत-चीन सीमाव्यापाराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा असून तो प्राचीन सिल्क रूटचा महत्वपूर्ण भाग होता. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीममधील व्यापारी तिबेट प्रदेशाशी पारंपरिक स्वरूपात व्यापार करत होते. (Shipki La Border Trade)

स्वातंत्र्यानंतर १९५४ मध्ये भारत आणि चीनदरम्यान पंचशील करार करण्यात आला. या कराराअंतर्गत हिमाचल प्रदेशातील शिपकी ला, उत्तराखंडमधील लिपुलेख आणि सिक्कीममधील नाथू ला या तीन मार्गांना अधिकृत सीमाव्यापार केंद्रांचा दर्जा देण्यात आला. सीमावर्ती भागातील जनजातीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र, १९६२ मधील भारत-चीन युद्धानंतर सुरक्षा कारणास्तव या व्यापारावर पूर्णपणे बंदी आनण्यात आली होती. त्यानंतर दीर्घ काळ कूटनीतिक चर्चेनंतर १३ डिसेंबर १९९१ रोजी सीमाव्यापार पुन्हा सुरू करण्याबाबत करार झाला. त्यानुसार १९९२ मध्ये लिपुलेख, १९९४ मध्ये शिपकी ला आणि २००६ मध्ये नाथू ला मार्ग पुन्हा व्यापारासाठी खुले करण्यात आले. (Shipki La Border Trade)

व्यापार बंद होण्यामागील कारणे

२००० नंतर जवळपास दीड दशक हा सीमाव्यापार सुरळीत सुरू होता. मात्र, २०१९ मध्ये कोविड महामारीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या आणि व्यापार थांबविण्यात आला.

महामारीनंतर लगेचच २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला. या तणावामुळे सुरक्षा यंत्रणांनी सीमाव्यापाराशी संबंधित सर्व हालचाली स्थगित केल्या. त्यानंतर दोन्ही देशांकडून सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आणि शिपकी ला तसेच इतर व्यापारमार्ग अनेक वर्षे बंद राहिले. (Shipki La Border Trade)

कोणत्या वस्तूंचा होतो व्यापार?

भारत-चीन सीमाव्यापारात आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, जड यंत्रसामग्री किंवा मोठ्या औद्योगिक वस्तूंचा समावेश नसतो. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (DGFT) आणि चीनच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तूंची यादी तयार केली जाते. त्याच वस्तूंच्या व्यापारास परवानगी असते. (Shipki La Border Trade)

भारताकडून हस्तकला उत्पादने, हातमागावरील वस्त्रे, मसाले, गूळ, सुका मेवा, तांदूळ, वनस्पती तेल, चहा, कॉफी, कांस्य व तांब्याची भांडी, तयार कपडे तसेच हिमालयीन भागातील औषधी वनस्पतींची निर्यात केली जाते.

तर चीन आणि तिबेटमधून भारतात प्रामुख्याने पारंपरिक तिबेटी उत्पादने आणि काही कच्च्या मालाची आयात केली जाते. (Shipki La Border Trade)

सीमाव्यापाराचे महत्त्व

भारत-चीनमधील एकूण द्विपक्षीय व्यापाराच्या तुलनेत या सीमाव्यापाराचे प्रमाण कमी असले, तरी त्याचे सामाजिक, आर्थिक महत्त्व अत्यंत महत्वाचे आहे. (Shipki La Border Trade)

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीममधील दुर्गम जनजातीय भागांतील नागरिकांसाठी हा व्यापार उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. मर्यादित रोजगाराच्या संधी असलेल्या या प्रदेशांमध्ये काही महिन्यांसाठी सुरू होणारा सीमाव्यापार स्थानिक कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठा हातभार लावतो.

सीमावर्ती भागात स्थानिक लोकसंख्या टिकून राहणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सीमावर्ती पायाभूत सुविधा मजबूत करताना पारंपरिक व्यापारमार्ग नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने सुरू ठेवण्याचा भारताचा प्रयत्न हा स्थानिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल साधणारा निर्णय मानला जात आहे. (Shipki La Border Trade)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai