नवी दिल्ली : (Mumbai Ahmedabad Bullet Train) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आता वेगाने सुरू असून दर महिन्याला सुमारे १५ किलोमीटर ट्रॅक तयार केला जात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
देशातील हा सर्वात महत्त्वाकांक्षी आणि अत्याधुनिक रेल्वे प्रकल्प मानला जात आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोर हा एकूण ५०८ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यापैकी ३५२ किलोमीटर मार्ग गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमध्ये, तर १५६ किलोमीटर महाराष्ट्रात आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले, 'आम्ही संपूर्ण प्रक्रियेचे स्टँडर्डायझेशन केले असून हा प्रकल्प 'फॅक्टरी बिल्ड' पद्धतीने उभारला जात आहे. ११ ऑगस्ट २०२१ रोजी या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. गेल्या जवळपास पाच वर्षांत प्रकल्पाने चांगली प्रगती केली आहे.' त्यांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्रात परवानग्या मिळण्यात सुमारे अडीच वर्षांचा विलंब झाला. त्यामुळे आम्हाला प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये बदल करून सुरतमध्ये डेपो उभारावा लागला. हा देशातील अत्यंत जटिल प्रकल्पांपैकी एक असल्याने आम्ही कोणतीही घाई न करता काम करत आहोत.'(Mumbai Ahmedabad Bullet Train)

