भारतीय संस्कृती ही विज्ञानाधारित असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. या संस्कृतीतील अनेक सण, व्रतवैकल्यांमागे विज्ञानाचा आधार असलेला दिसतो. चातुर्मास हा भारतीय संस्कृतीतील सणांचा काळ. सर्वाधिक सण याच कालावधीत येतात.
दरम्यान, अनेक उपवासही होतात. अर्थात, यामागेही निर्सग, मानवी आरोग्याचा सुंदर विचार गुंफला आहे. चातुर्मास आणि मानवी आरोग्य यांच्यातील सहसंबंधाचा आढावा घेणारा हा लेख...
अपथ्याकडून पथ्याकडे ऋतुसंधीतील आरोग्यशास्त्र म्हणजेच चातुर्मासातील परंपरा. निसर्ग जेव्हा बदलतो, तेव्हा फक्त ऋतू बदलत नाहीत; शरीरातील प्रत्येक पेशी त्या बदलाला प्रतिसाद देत असते. म्हणूनच ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य! आषाढ महिन्याची चाहूल लागते आणि आकाशात काळेभोर ढग दाटतात. पहिल्याच पावसाने कोरड्या धरतीला जीवन मिळते. वृक्ष नव्या पालवीने बहरून जातात. वातावरणात मातीचा सुगंध दरवळतो. महाकवी कालिदासांनी 'मेघदूत'मध्ये, या आषाढातील भरून आलेल्या मेघालाच विरही यक्षाचा दूत बनवले. निसर्गातील या विलक्षण बदलाचे त्यांनी, अत्यंत सुंदर असेच चित्रण केले आहे.
परंतु बाहेर जितका निसर्ग खुलतो, तितकेच शरीराला या काळात अधिक जपावेही लागते. आयुर्वेदात आषाढ हा ऋतुसंधीचा काळ मानला गेला. ग्रीष्म ऋतूचा शेवट आणि वर्षा ऋतूची सुरुवात. हा काळ शरीराच्या अंतर्गत जैविक प्रक्रियांमध्येही मोठा बदल घडवून आणणारा आहे.
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे शरीराची शक्ती कमी झालेली असते. पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी, वातावरणातील सूक्ष्मजीव आणि मंदावलेल्या पचनशक्तीमुळे अनेक आजारांना आमंत्रणच मिळते. म्हणूनच, वर्षा ऋतूला 'आजारांचा ऋतू' म्हटले जाते. याच काळात आपल्या पूर्वजांनी एक जीवनशैली निर्माण केली ती म्हणजे 'चातुर्मास.' चातुर्मास म्हणजे केवळ कांदा-लसूण सोडणे किंवा उपवास करणे नव्हे. तो शरीर, मन, आहार, विचार, योग आणि अध्यात्म यांचा समतोल साधणारा, चार महिन्यांचा 'आरोग्य महोत्सव' आहे.
ऋतुसंधी म्हणजेच शरीराला इशारा. आपण घरातील एखादे यंत्र सतत चालू ठेवल्यास, त्याला विश्रांतीची गरज असते. तसेच शरीरालाही ऋतू बदलताना, त्या बदलांशी नव्याने जुळवून घ्यावे लागते. या काळात पचनशक्ती (अग्नी) मंदावते. अग्नी म्हणजे केवळ भूकच नव्हे; तर अन्नाचे ऊर्जा, रक्त, स्नायू, हाडे आणि ओजामध्ये रूपांतर करणारी संपूर्ण चयापचय प्रक्रियाच होय. जेव्हा अग्नी मंदावतो, तेव्हा अन्न पूर्ण पचत नाही. त्यातून 'आम' तयार होतो. (हा आम म्हणजे अपूर्ण पचलेले, शरीरात फिरणारे, विविध विकारांना कारणीभूत ठरणारे द्रव्य.) म्हणूनच पावसाळ्यात अपचन, आम्लपित्त, पोटफुगी, वारंवार सर्दी, त्वचारोग, सांधेदुखी, थकवा, अॅलर्जी यांसारख्या तक्रारी वाढतात.
एक अनुभव - वसुधा. वय ४२ वर्षे. दर पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि दम्याने त्रस्त. औषधे अनेक घेतली होती. सविस्तर आहार-विचार केल्यावर लक्षात आले की, ती प्रत्येक जेवणाबरोबर दही खात होती. मी फक्त एवढेच सांगितले, "आषाढ ते कार्तिक दही टाळा.' महिनाभरानंतर ती म्हणाली, "डॉटर, यावेळी पावसाळाच बदलल्यासारखा वाटला.' पावसाळा बदलला नव्हता, तिचा आहार बदलला होता.
देवशयनी एकादशी - अपथ्याकडून पथ्याकडे
आषाढी एकादशीला 'देवशयनी एकादशी' म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. आयुर्वेदाच्या दृष्टीने, हा संदेश अत्यंत सुंदर आहे. जीवनाचा वेग थोडा कमी करा, आहार हलका करा, मन शांत करा, शरीराला विश्रांती द्या. म्हणजेच, अपथ्याकडून पथ्याकडे प्रवास सुरू करा. बदल एकदम नाही, हळूहळू. आज अनेकजण अचानक चहा, साखर किंवा गोड पूर्ण बंद करतात. काही दिवसांनी पुन्हा त्याच सवयी सुरू होतात.
टप्प्याटप्प्याने बदल : आचार्यांनी पादांशिक त्याग हा सुंदर सिद्धांत सांगितला आहे. ज्या पदार्थाची वर्षानुवर्षे सवय झाली आहे, तो पदार्थ अचानक बंद करू नये. सुरुवातीला त्याचे प्रमाण कमी करावे. चार भागांवरून तीन भाग, तीनवरून दोन, दोनवरून एक, एकवरून अर्धा आणि शेवटी पूर्ण त्याग. त्याचवेळी पथ्य पदार्थ हळूहळू वाढवत न्यावेत. शरीरावर बंधने लादू नयेत, त्याला योग्य सवयी लावाव्यात. हाच चातुर्मासाचा खरा संदेश आहे.
चातुर्मासात काही पदार्थ वर्ज्य का?
आपल्या परंपरेतील प्रत्येक नियमामागे विज्ञान दडलेले आहे. दही कफ वाढवू शकते आणि पचन मंदावलेल्या अवस्थेत जड पडू शकते. मांसाहार पचण्यासाठी प्रबळ जठराग्नी आवश्यक असतो. वर्षा ऋतूत अग्नी मंद असल्यामुळे, अपचन आणि आमनिर्मितीची शयता वाढते. याशिवाय, पावसाळा हा अनेक प्राणी, पक्षी आणि जलचरांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात मांसाहार कमी करण्यामागे पर्यावरणाचे संतुलन, जैवविविधतेचे संरक्षण आणि सर्व जीवांविषयी करुणा जपण्याचा सुंदर संदेशही संस्कृतीने दिला आहे. पालेभाज्या पूर्वी पावसाळ्यात अळ्या, बुरशी आणि दूषित पाण्यामुळे, सहज दूषित होत. म्हणूनच त्या मर्यादित प्रमाणात आणि स्वच्छ धुऊन वापरण्याची सूचना केली गेली. लंघन हे सर्वोत्तम औषध आहे. भूक नसताना खाणे म्हणजेच शरीरावर अन्याय. थोडे कमी खाणे, हलके खाणे, वेळेवर खाणे आणि पचेल तेवढेच खाणे, हेच अनेक रोगांवरील पहिले औषध आहे. आज जग खपींशीाळीींंशपीं ऋरीींळपस बद्दल बोलत आहे; तसेच काहीसे.
चातुर्मासातील मसाले - स्वयंपाकघरातील औषधालय
पावसाळ्यात मसाले केवळ चवच वाढवत नाहीत; ते पचनसंस्था आणि रोगप्रतिकारशक्तीचेही रक्षण करतात. सुंठ अग्नी प्रदीप्त करते, कफ कमी करते आणि सांधेदुखीत उपयुक्त ठरते. ताजे आले भूक वाढवते, मळमळ कमी करते आणि अन्नाचे पचनही सुलभ करते. जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा आणि सैंधव मीठ, हा भूक लागण्यासाठीचा उत्कृष्ट उपाय आहे. काळी मिरी श्वसनमार्ग स्वच्छ ठेवते, कफ कमी करते आणि इतर औषधी द्रव्यांचे शोषण वाढवते. पिंपळी ही उत्तम पाचक आणि रसायन द्रव्य मानली जाते. जुनाट खोकला, दमा आणि भूक कमी होत असताना, तिचा उपयोग सांगितला आहे. जिरे वात कमी करतात, पोटफुगी दूर करतात आणि पचन सुधारतात. धणे पित्तशामक आहेत. धण्याचे पाणी उष्णता कमी करण्यास आणि लघवीच्या तक्रारींमध्ये उपयोगी ठरते. ओवा वातहर असून गॅसेस, अजीर्ण आणि पोटदुखीमध्ये अत्यंत उपयुक्त आहे. हिंग हा पोटातील गुब्बारा कमी करणारा उत्तम पदार्थ आहे. डाळी, कडधान्ये किंवा वरणात त्याचा वापर पचनासाठी लाभदायक असतो. हळद शरीरातील सूज कमी करते, जंतूनाशक आहे आणि प्रतिकारशक्ती वाढविणारी आहे. काळी मिरीबरोबर घेतल्यास जास्त उपयोगी होते. दालचिनी, लवंग, तमालपत्र आणि मेथी यांचाही ऋतूनुसार योग्य प्रमाणात वापर पचन, कफ नियंत्रण आणि शरीरातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत करतो. यामुळे आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांचा डबा, हा खर्या अर्थाने छोटेखानी औषधालयच आहे.
चातुर्मासात काय खावे?
मुगाचे वरण, मुगाची खिचडी, कुळथाचे कढण, जुने तांदूळ, ज्वारी, नाचणी, यव, साजूक तूप, ताक, उकळून कोमट केलेले पाणी, आले-सुंठयुक्त काढे, ऋतुनुसार फळे आणि साधा, ताजा, गरम आहार हा या काळात फायदेशीर ठरतो.
चातुर्मासातील योगसाधना
पावसाळ्यात अतिशय तीव्र व्यायाम करण्यापेक्षा, शरीराला अनुरूप योगसाधना अधिक हितावह आहे. दररोज सूक्ष्म व्यायाम, वज्रासन, मार्जारीआसन, भुजंगासन, पवनमुक्तासन, अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि दहा मिनिटांचे ध्यान, शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवतात. दीर्घ श्वसनामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, भ्रामरीमुळे मन शांत होते, ध्यानामुळे ताण कमी होतो. योग म्हणजे शरीर वाकवणे नव्हे, तर शरीर, श्वास, मन आणि विचार यांची एकात्मता आहे.
भक्ती म्हणजे मानसिक उपचार
चातुर्मासात वाचन, नामस्मरण, कीर्तन, जप, ध्यान आणि सत्संग यांना विशेष महत्त्व दिले आहे. आज मानसशास्त्र सांगते की, प्रार्थना आणि ध्यानांमुळे ताण कमी होतो, झोप सुधारते आणि मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते. मन निरोगी असेल, तर शरीरही निरोगी राहते.
चातुर्मासाचा खरा संदेश : चातुर्मास म्हणजे केवळ काही पदार्थांचा त्याग नाही. तो आहे, अपथ्याकडून पथ्याकडे, अतिखाण्यापासून संयमाकडे, अस्वास्थ्यापासून आरोग्याकडे, अस्थिरतेपासून संतुलनाकडे आणि बाह्य निसर्गाशी एकरूप होत अंतर्मनाशी संवाद साधणे. देवशयनी एकादशी आपल्याला एकच संदेश देते, ऋतू बदलला की आहार बदला.,आहार बदलला की विचार बदला, विचार बदलले की जीवन बदलते. भारतीय संस्कृतीतील चातुर्मास हा धार्मिक परंपरा म्हणून जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो आरोग्यशास्त्राचा अमूल्य वारसाही आहे. यावर्षी चातुर्मासाचे पालन केवळ श्रद्धेने नव्हे तर समजून, विज्ञानाच्या आधाराने आणि आनंदाने करूया. कारण, योग्य पथ्य, नियमित योगसाधना, संतुलित मन आणि निसर्गाशी सुसंवाद यांच्यापासूनच खर्या अर्थाने आरोग्ययोग साधता येतो.
निसर्ग जसा बाहेर बहरतो
अलगद शरीर-मनातही उमलतो
साद आणि प्रतिसाद यांचे प्रत्येक क्षण
पेशीपेशींवर आनंद-तुषारशिंपण
परंपरा आणि शास्त्र यांची सांगड जपावी
आरोग्याच्या महाद्वारी तोरणे सजवावी
(लेख 'आरोग्य भारती' द्वारे प्रकाशित)
डॉ. मधुरा कुलकर्णी

