Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धारावीची शिल्पकन्या

धारावीची शिल्पकन्या

धारावीच्या मातीतून आपल्या कलाप्रवासाला सुरुवात करून, मुंबईत स्वतःचे स्वतंत्र कलाविश्व उभारणार्‍या वंदना सोमप्रकाश कोरी यांच्याविषयी...

दगड म्हणजे कठोरता, स्थिरता आणि जडत्व. मात्र, संवेदनशील कलाकाराच्या हातात, तोच दगड बोलतो.

त्यातून चेहरा उमटतो, भावना आकार घेतात आणि एखादी कथाही जिवंत होते. दगडातून बोलया प्रतिकृती घडविणार्‍या वंदना सोमप्रकाश कोरी यांनी, धारावीच्या संघर्षमय वातावरणातूनच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा प्रवास परिस्थितीवर मात करत, स्वप्नांना आकार देणार्‍या एका जिद्दी मुलीची प्रेरणादायी यशोगाथा आहे.

वंदना यांचे बालपण आणि कलात्मक जडणघडण ही धारावीतलीच. आजही धारावीशी त्यांची नाळ अगदी घट्ट जोडलेली. धारावीने त्यांना केवळ संघर्षच दिला नाही, तर माणसांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टीही दिली. त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात २००४ मध्ये, मुंबईतल्या कला महाविद्यालयातील 'फाऊंडेशन कोर्स'पासून झाली. त्यानंतर त्यांनी 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'मध्ये त्यांनी, 'शिल्पकला आणि मॉडेलिंग'चे धडे गिरवले. मात्र शिक्षण पूर्ण झाले, म्हणजे कलाप्रवास संपल्याचे त्यांनी कधीही मानले नाही. आपल्या कलाविषयक ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्यांनी, २०२२ मध्ये पुण्यातल्या 'व्हिज्युअल आर्ट कॉलेज'मधून 'क्रिएटिव्ह स्कल्प्चर'मध्ये 'एमएफए' पूर्ण केले.

कलाकारासाठी प्रत्यक्ष अनुभव हीच सर्वांत मोठी शाळा असते. वंदना यांच्या बाबतीत धारावी एक मोठे विद्यापीठच होते. गेल्या १७ वर्षांच्या कलाप्रवासात वंदना यांनी विविध माध्यमे, तंत्रे आणि शिल्पप्रकारांवर सातत्याने प्रयोग केले आहेत. मुंबईनंतर पुणे, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरुपर्यंत, त्यांच्या कलाकृतींचा प्रवास आजवर झाला. विविध शहरांतील प्रदर्शनांमध्ये सहभागी होतानाही, त्यांच्या कलेचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच राहिला हे विशेष! त्यांच्या शिल्पांमध्ये समाजाचे प्रतिबिंब दिसते आणि माणसाच्या जगण्याविषयीची आस्थाही जाणवते.

त्यांच्या यशाचे रहस्य सातत्य, मेहनत आणि प्रयोगशीलतेत दडले आहे. २००६ मधील 'चातक' प्रदर्शनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, विविध समूह प्रदर्शनांतून अधिकच विस्तारला. मुंबईतील काळाघोडा येथील 'कठपुतली', 'धारावी बिएनाले', आग्रा येथील 'राष्ट्रीय कला शिबीर', 'सायमरोझा आर्ट गॅलरी', 'बॉम्बे आर्ट सोसायटी' आणि 'महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन' सारख्या विविध व्यासपीठांवर, त्यांच्या कलाकृतींना स्थान मिळाले. २०२४ च्या धुळे येथील, 'संतविचार' स्कल्प्चर कला शिबिरात दगडाशी त्यांचे नाते आणखी दृढ झाले.

त्यांच्या योगदानाची दखल विविध पुरस्कारांनीही घेतली. 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'मधील 'भगवान रामपुरे पुरस्कार, 'आर्ट सोसायटी ऑफ इंडिया'चा पुरस्कार' आणि 'बी. व्ही. तालीम पुरस्कार' यांसह २०२३ मध्ये 'बॉम्बे आर्ट सोसायटी'चा 'बेस्ट स्कल्प्चर आर्टिस्ट' पुरस्कारही त्यांना मिळाला. त्यानंतर २०२५ मध्ये 'श्री राम सुतार आर्टिस्ट पुरस्कार' आणि महाराष्ट्र शासनाचा शिल्पकलेतील पुरस्काराने, त्यांच्या प्रवासाला मान्यता मिळाली.

शिल्पकला ही शारीरिक ताकद, कौशल्य, संयम आणि कल्पनाशक्तीचा संगम आहे. अशा क्षेत्रात महिलेने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, निश्चितच उल्लेखनीय! मात्र, वंदना यांच्या प्रवासाकडे केवळ 'महिला कलाकाराचा संघर्ष' या चौकटीत पाहणे अपुरे ठरेल. त्यांनी स्वतंत्र कलाभाषाच विकसित केली. त्या आपल्या कलेच्या बळावर, स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या स्वतंत्र कलाकार आहेत.

वंदना यांच्या कलाप्रवासातील विशेष उल्लेखनीय टप्पा म्हणजे, मुंबईच्या शीव पश्चिम येथील त्यांचा खुला स्टुडिओ. वंदना सांगतात, "मुंबईमध्ये आम्हा शिल्पकलाकारांना स्वतःचा स्टुडिओ उभारणे, २०२२ मध्ये आव्हानात्मकच आहे. ' धारावीतून कलाप्रवास सुरू करून, मुंबईत स्वतःचे स्टुडिओविश्व उभारणे, हा त्यांच्या सातत्यपूर्ण प्रवासाचाच परिपाक म्हणावा लागेल. वंदना यांच्यासाठी हा स्टुडिओ, त्यांच्या स्वतंत्र कलाभाषेची प्रयोगशाळा आहे.

विशेष म्हणजे, मुंबईमध्ये स्वतःचे स्टुडिओ उभारुन त्या आपल्या कलेला स्वतंत्र अवकाशच देत आहेत. धारावीतील अनुभव, 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे शिक्षण, देशभरातील कला शिबिरे आणि प्रदर्शनांचा अनुभव, या सगळ्यांचा संगम त्यांच्या स्टुडिओतील सर्जनशीलतेत दिसतो. त्यामुळे हा स्टुडिओ त्यांच्या वैयक्तिक यशाचेच नव्हे, तर एका कलाकाराने स्वतःच्या बळावर निर्माण केलेल्या कलाविश्वाचेच प्रतीक ठरतो. वंदना यांच्या प्रवासात धारावी असली; तरी तिची मर्यादा नाही. त्यांच्या कलेत संघर्ष असला; तरी त्याचे उदात्तीकरण नाही. त्यात माणूस आहे, मानवी भावनांची जाणीव आहे आणि पुढे जाण्याची जिद्दही आहे.

आज वंदना दगडातून आणि मातीतून अभूतपूर्व कलाकृती जन्माला घालतात. ही प्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशीही जोडली गेली वाटते. परिस्थितीमुळे निर्माण अडथळे दूर करत, त्यांनी स्वतःमधील कलाकार शोधला आणि त्याला जगासमोर आणले. धारावीतील रस्त्यांपासून स्वतःच्या मुंबईतील स्टुडिओपर्यंत, कलादालनांपासून सार्वजनिक शिल्पांपर्यंत आणि प्रदर्शनांपासून राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांपर्यंत पोहोचलेली वंदना यांची वाटचाल, अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशातून मिळणारा महत्त्वाचा संदेश म्हणजे, तुमची जिद्द, मेहनत आणि स्वतःवरील विश्वासच तुमचे भविष्य घडवतो. म्हणूनच वंदना यांच्या शिल्पांकडे पाहताना, आपल्याला केवळ आपणास ती मूर्ती दिसत नाही. दिसतो, तो संघर्षातून घडलेला आकार, संवेदनशीलतेतून जन्मलेली कला आणि धारावीच्या मातीतून मुंबईत स्वतःचे कलाविश्व उभे करत, जगापर्यंत पोहोचलेले एक मोठे स्वप्न! धारावीच्या लेकीने, आपल्या कलेच्या सामर्थ्यावर निर्माण केलेल्या या स्वतंत्र ओळखीला आणि त्यांच्या भविष्यातील कलाप्रवासाला दै. 'मुंबई तरुण भारत'च्या अनेकानेक शुभेच्छा!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai