Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६' येत्या ७ ते ९ ऑगस्ट ला दिल्लीत होणार

'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६' येत्या ७ ते ९ ऑगस्ट ला दिल्लीत होणार

मुंबई : (Delhi Marathi Film Festival 2026) मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडविणारा 'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६' येत्या ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि.७ रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. याच महोत्सवात दिल्लीतील दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन होणार आहे.

या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणेश रामदासी, अभिजित गोडबोले आदी उपस्थित होते.(Delhi Marathi Film Festival 2026)

"महाराष्ट्राबाहेर, विशेषतः देशाच्या राजधानीत, मराठी चित्रपटांना समर्पित असा व्यापक आणि सर्वसमावेशक महोत्सव प्रथमच आयोजित होत असून, मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. मराठी चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचावेत, नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांना चित्रपट क्षेत्रातील संधींची माहिती मिळावी तसेच मराठी संस्कृतीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे." असे दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे यांनी सांगितले.(Delhi Marathi Film Festival 2026)

"नवी दिल्लीतील मराठी चित्रपट रसिकांना दर्जेदार आणि अभिजात मराठी चित्रपटांचा सातत्याने आस्वाद घेता यावा, यासाठी मुंबईच्या धर्तीवर महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या पुढाकाराने 'दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ' सुरू करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने कार्यरत होणाऱ्या या मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन, चित्रपट विषयक चर्चा, संवाद सत्रे तसेच चित्रपट संस्कृतीच्या प्रसारासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहे."असे महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी सांगितले.(Delhi Marathi Film Festival 2026)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai