आज आश्विन पौर्णिमा. खर्या अर्थाने देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता. ही पौर्णिमा 'कोजागरी पौर्णिमा' म्हणूनही साजरी केली जाते. वर्षाकाळात मेघांच्या दाटीत लोपलेले चंद्रतेज पुन्हा आपल्या संपूर्ण वैभवानिशी रात्र उजळून टाकते.
अशा या चंद्राच्या कलांशी निगडित असलेली महाविद्या म्हणजे 'षोडशी'. तसेच आजच्या या चंद्राच्या शीतल प्रकाशात 'को जागर्ति?' असे म्हणत लक्ष्मीदेखील सदैव जागरूक, दक्ष अशा भक्तावर कृपा करण्यासाठी त्याचा शोध घेत असते, असे म्हणतात. ही लक्ष्मी म्हणजेच 'कमला' महाविद्या. त्याचप्रमाणे, सृष्टीतील प्राणिमात्रांना नव्या अन्नधान्याचे दान भरभरून देणारी म्हणूनही आजची ही 'नवान्न पौर्णिमा'. मग जगताचे 'भरणपोषण' करून त्यावर अधिराज्य गाजवणारी 'भुवनेश्वरी' ही महाविद्या विसरून कसे चालेल? त्यामुळे आज या तिन्ही महाविद्यांसह राहिलेल्या महाविद्यांचे स्वरूप थोडक्यात विशद करणारा हा शेवटचा भाग.
षोडशी
'षोडशी' ही महाविद्या त्रिपुरा, त्रिपुरसुंदरी, ललिता, ललिताम्बिका, बाला, श्रीविद्या, कामेश्वरी इत्यादी नावांनीदेखील ओळखली जाते. 'तारा' ही सूर्याशी संबंधित, तर 'षोडशी' चंद्राच्या १६ कलांशी. 'नित्याषोडशिकार्णव' ग्रंथानुसार 'सहस्रारचक्रा'च्या मध्यभागी चंद्रमंडल असून, त्याच्या केंद्रस्थानी असलेला बिंदू म्हणजे चिदानंदस्वरूप 'बैंदवी कला', हीच 'त्रिपुरसुंदरी' होय! 'आज्ञाचक्रा'तील चंद्रमंडलाच्या ठायी, त्रिपुरसुंदरीचेच पैलू असलेल्या अजून १५ कला आहेत- महात्रिपुरसुंदरी, कामेश्वरी, भगमालिनी, नित्यलिन्ना, भेरुंडा, वह्निवाहिनी, महाविद्येश्वरी, त्वरिता, कुलसुंदरी, नित्या, नीलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वालामालिनी आणि चित्रा. तत्त्वतः 'त्रिपुरसुंदरी' म्हणजेच, यातील पहिली (प्रतिपदा) किंवा सर्वोच्च चंद्रमंडलातील सोळावी कला असून, तीच या सर्व १६ कलांचे एकत्रित स्वरूप असल्यामुळे ती 'षोडशी'! या सर्वच कला षोडशीच्या ठायी नित्य निवास करीत असल्याने, त्यांना 'नित्या' म्हणूनही ओळखले जाते.
'त्रिपुरा' या नावाचे अनेक गर्भितार्थ 'वामकेश्वरदर्शन' तंत्रात स्पष्ट केलेले आहेत,
त्रिमूर्तिसर्गाच्च पुराभवत्वात् तेन सा त्रिपुरा स्मृता ॥
यानुसार, ब्रह्मा-विष्णू-महेश या 'त्रयी'ला जन्माला घालणारी आद्य - 'पुरा' शक्ती; 'त्रयी'चे अर्थात तीनही वेदांचे स्वरूप असलेली; स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 'त्रैलोया'ला 'पूरक' होत अंतकाळी त्यांचे 'पुर' अर्थात आश्रयस्थान ठरणारी; विश्वनिर्मितीचे कारण असलेल्या शिव, शक्ती आणि एकत्रित शिव+शक्ती (आत्मतत्त्व) या तीन तत्त्वांचे स्वरूप असलेली आणि त्रैलोक्याची जननी म्हणून ती 'त्रिपुरा'. 'त्रिपुरार्णव'नुसार मात्र 'ईडा', 'पिंगला' आणि 'सुषुम्ना' या तीन नाड्यांच्या ठिकाणी ('पुर') वास करणारी म्हणून ती 'त्रिपुरा'. पण, या सर्वांहूनही तिच्या भक्तांना प्रिय असलेले नाव म्हणजे, 'त्रिपुरसुंदरी'. अर्थात, 'तिन्ही लोकांमध्ये सगळ्यात सुंदर असलेली' हेच होय! 'षोडशी'चा भैरव 'पंचवक्त्र-शिव' हा असून, तिचे ध्यान असे आहे,
बालार्कमण्डलाभासां चतुर्बाहान्त्रिलोचनाम् |
पाशाङ्कुशशरान्श्चापन्धारयन्तीं शिवाम्भजे ॥
अतिशय मंगल अशा या महाविद्येचे तेज नुकत्याच उगवलेल्या सूर्यमंडलासारखे आहे. ती चतुर्बाहू, त्रिनयना, पाश, अंकुश, बाण आणि धनुष्य धारण केलेली अशी आहे. 'मुण्डमालातंत्रा'नुसार 'षोडशी' आणि विष्णूचा 'कल्की' अवतार एकच होत.
भुवनेश्वरी
संपूर्ण सृष्टजगतावर अधिराज्य करणारी, त्याचे पालन-पोषण-चालन करणारी महाविद्या म्हणजेच, 'भुवनेश्वरी'. म्हणूनच, ती 'राजराजेश्वरी' आहे. तिच्याशी संबंधित भैरव 'त्र्यंबक' होय. काली हे 'काल' या संकल्पनेचे मूर्त रूप, तर भुवनेश्वरी हे 'दिक्' अर्थात दिशा या संकल्पनेचे.
'देवीभागवत' पुराणामध्ये (१२.९.१००-१२.१२.१३) सुधासागरातील मणिद्वीपावर असलेल्या 'चिंतामणी' नामक अप्रतिम सुंदर, वैभवशाली प्रासादाचे वर्णन येते. त्या भव्य प्रासादात शक्तितत्त्वरूपी दहा पायर्या असलेल्या ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव अशा 'पंचब्रह्म'मय मंचकावर महेश्वर बसलेले असून, त्यांच्या डाव्या अंकावर 'भुवनेश्वरी' विराजमान आहे. या पंचब्रह्माहून श्रेष्ठ अशा वस्तूला वेदांमध्ये 'अव्यक्त' म्हटले असून, त्यानेच हे संपूर्ण विश्व ओतप्रोत भरलेले, व्यापलेले आहे. त्यामुळे अर्थात, ते 'अव्यक्त' ब्रह्म म्हणजेच 'भुवनेश्वरी' होय, असेही या पुराणात (स्कंध ७) म्हटले आहे .तिचे 'भुवनेश्वरीतंत्रा'त पुढीलप्रमाणे ध्यान आहे -
उद्यद्दिनद्युतिमिन्दुकिरीटां तुङ्गकुचां नयनत्रययुक्ताम्|
स्मेरमुखीं वरदाङ्कुशपाशाभीतिकरां प्रभजे भुवनेशीम्॥
उगवत्या सूर्यासारखे तेज असलेली, चंद्रकोरीने युक्त असा मुकुट धारण करणारी, उन्नत स्तनयुग्म आणि तीन नेत्र असलेली, जिच्या चेहर्यावर मंदस्मित झळकते आहे, अशी ही चतुर्बाहू भुवनेश्वरी आपल्या दोन हातांनी 'वरदमुद्रा' आणि 'अभयमुद्रा' दर्शवत असून, इतर दोन हातांमध्ये तिने पाश आणि अंकुश धारण केले आहे. 'मुण्डमालातन्त्रा'नुसार विष्णूचे 'वराह' रूप आणि 'भुवनेश्वरी' यांचे ऐय आहे.
बगला
'यजुर्वेद' आणि 'अथर्ववेदा'मध्ये ज्या 'वल्गा' शक्तीचे संदर्भ सापडतात, तीच 'आगम' साहित्यातील 'बगला' ('वगला') अथवा 'बगलामुखी' ही विद्या. 'वल्गा' म्हणजे 'लगाम' अर्थात नियंत्रणाचे एक साधन. शत्रूच्या हालचाली बाधित, नियंत्रित करणारी ही 'स्तंभनविद्या' असून, विशेषतः शत्रूच्या वाणीवर, मनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी तिची उपासना केली जाते.
'शिवपुराणा'नुसार, (३.१७) शिवाचा आठवा अवतार 'बगलामुख' असून, त्याची शक्ती 'बगलामुखी' होय. बगलामुखीचे ध्यान पुढीलप्रमाणे आहे,
मध्ये सुधाब्धिमणिमण्डपपरत्रवेदीसिंहासनोपरिगतां परिपीतवर्णाम्|
पीतांबराभरणमाल्यविभूषिताङ्गीन्देवीन्नमामि धृतमुद्गरवैरिजिह्वाम्॥
जिह्वाग्रमादाय करेण देवीं वामेन शत्रून्परिपीडयन्तीम्|
गदाभिघातेन च दक्षिणेन पीताम्बराढ्यान्द्विभुजान्नमामि॥
पिवळसर वर्णाची ही द्विभुजा देवी सुधासागरातील मणिमंडपात सिंहासनावर विराजित असून, तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळ्या माळा, आभूषणे धारण केली आहेत. डाव्या हाताने आपल्या वैर्याची (असुराची) जीभ ती हासडून बाहेर खेचते आहे, तर उजव्या हातातील गदेने ती इतर असुरांवर प्रहार करीत आहे. इथे असुराची जीभ खेचण्याची तिची कृती, शत्रूच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याच्या शक्तीचे द्योतक आहे. पिवळ्या रंगाच्या साहचर्यामुळे तिला 'पितांबरी'ही म्हणतात. 'विष्णुयामल' ग्रंथात 'बगलामुखी'चे विष्णूच्या दाही अवतारांशी अद्वैत दाखवलेले असले, तरी विष्णूचा 'कूर्मावतार' म्हणजे 'बगला' असे 'मुण्डमालातंत्र' म्हणते.
'जिनेश्वरप्रिया' अशा तिच्या एका उल्लेखावरून, ही महाविद्या बौद्ध आणि जैन संप्रदायातदेखील मान्यता पावलेली दिसते. 'जिन' हे विष्णूचेदेखील उपनाम असून, 'बगला' ही त्याचीच शक्ती असल्याचे 'सर्वेश्वरीविद्यास्तोत्र' म्हणते. 'स्वतंत्रतंत्रा'नुसार, कृतयुगात एकदा प्रचंड वादळ आले. चराचरसृष्टीच्या काळजीने विष्णूने तपस्या आरंभली. तेव्हा सौराष्ट्र प्रांतातील 'हरिद्राख्य' सरोवरातील पिवळ्या पाण्यात जलक्रीडा करणार्या 'बगलाशक्ती'ने, त्या वादळाचे स्तंभन केले आणि जगाला वाचवले.
मातंगी
वैदिक परंपरेतील सरस्वती म्हणजेच, तांत्रिक परंपरेतील 'मातंगी' होय, असे विविध 'मातंगीस्तोत्रां'मध्ये वर्णिलेल्या, 'वागधिदेवता', 'विद्याप्रदा', 'वीणावादनतत्परा' अशा तिच्या गुणवैशिष्ट्यांवरून सिद्ध होते. तिच्या साधनेमुळे वशीकरणादी सिद्धींखेरीज विविध प्रकारचे ज्ञान, संगीतादी कला, वाणीवरील प्रभुत्वांचीही प्राप्ती होते.
'शक्तिसंगमतंत्र', तसेच 'स्वतंत्रतंत्रा'तील कथनानुसार, प्राचीनकाळी मतंग मुनींनी घनदाट कदम्बवनात क्रूर प्राणिमात्रांना वश करण्याच्या हेतूने, हजारो वर्षे तप केले. तेव्हा प्रसन्न झालेल्या त्रिपुरसुंदरीच्या नेत्रातून एक तेजाचा पुंज बाहेर पडला आणि त्यातूनच सावळ्या वर्णाची 'राजमातंगिनी' उद्भवली,
तत्र तेजः समुत्पन्नं सुन्दरीनेत्रतः शिवे |
तेजोराशिरभूत्तत्र तत्र श्रीकालिकाम्बिका ॥१४॥
श्यामलं रूपमास्थाय राजमातङ्गिनी भवेत् |
राजमातङ्गिनी विद्या त्रैलोयवशकारिणी ॥ १५ ॥
त्यामुळे 'मतंगशिव' हा तिच्याशी संबंधित भैरव असला, तरी काही ठिकाणी मात्र अशाप्रकारे मतंग ऋषींमुळे तिचा जन्म झालेला असल्याने, ती त्यांची कन्याही म्हणवली जाते. 'स्कन्दपुराणा'तील (३.१८) वर्णनानुसार, वेदाध्यायी विप्रांना, व्यापार्यांना, नवविवाहितांना छळणार्या कर्णाट/कर्णाटक नावाच्या राक्षसाचा, 'मातंगी'ने निःपात केला. या संदर्भावरूनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी मातंगीची उपासना फलदायी मानलेली आहे.
मातंगीचे अन्य एक रूप 'उच्छिष्टमातंगी' असून, तिचा उद्भव विष्णू, लक्ष्मी, शिव आणि पार्वती यांच्या भोजनप्रसंगी सांडलेल्या अन्नातून झाला ('शक्तिसंगमतंत्र', खंड ४, अध्याय २७). 'दक्षिणामूर्ती' संहितेतील 'मातंगीहृदयस्तोत्रा'त सांगितलेले तिचे ध्यान पुढीलप्रमाणे आहे,
श्यामां शुभ्रांशुभालां त्रिकमलनयनां रत्नसिंहासनस्थाम्|
भक्ताभीष्टप्रदात्रीं सुरनिकरकरासेव्यकञ्जाङ्घ्रियुग्माम्॥
नीलाम्भोजांशुकान्तिं निशिचरनिकरारण्यदावाग्निरूपाम्|
पाशं खड्गं चतुर्भिर्वरकमलकरैः खेटकञ्चाङ्कुशञ्च |
मातङ्गीमावहन्तीमभिमतफलदां मोदिनीं चिन्तयामि॥
निळ्या कमळाच्या तेजाप्रमाणे कांती असलेली, श्यामल वर्णाची, कमळासारखे सुंदर असे तीन नेत्र असलेली, माथ्यावर चंद्र धारण करणारी, भक्तांना हवे ते प्रदान करणारी अशी ही 'मातंगी' रत्नजडित सिंहासनावर बसली असून, तिच्या चरणकमलांचे पूजन देवदेखील करतात. ती म्हणजे, असुरगणरूपी अरण्य जाळून टाकणारा जणू दावानल आहे. आपल्या चार हस्तकमलांमध्ये तिने पाश, खङ्ग, गदा आणि अंकुश अशी आयुधे धारण केली आहेत. उपासकांच्या मनात असलेले फळ देणारी, त्यांना आनंद देणारी अशी ती आहे. 'मुण्डमालातंत्रा'नुसार 'मातंगी' ही विष्णूच्या 'बुद्ध' या रूपाशी जोडली गेली आहे.
कमला
वैदिक परंपरेतील 'लक्ष्मी' हीच तांत्रिक परंपरेतील 'कमला' अथवा 'कमलात्मिका'. समुद्रमंथनाच्या वेळी क्षीरसागरातून लक्ष्मी उत्पन्न झाल्यावर तिने, महात्रिपुरासुंदरीशी सायुज्य प्राप्त व्हावे, यासाठी तप केले. प्रसन्न झालेल्या त्रिपुरसुंदरीने दिलेल्या आशीर्वादामुळे ती तिच्याशी एकरूप झाली आणि महाविद्या म्हणून तिचा उदय झाला. 'सदाशिव-विष्णू' हा 'कमला' महाविद्येशी संबंधित भैरव आहे. 'कमलात्मिकातंत्रा'त वर्णिलेले तिचे ध्यान पुढीलप्रमाणे,
कान्त्याकाञ्चनसंनिभां हिमगिरिप्रख्यैश्चतुर्भिर्गजैर् |
हस्तोत्क्षिप्तहिरण्मयामृतघटैरासिच्यमानां श्रियम् ॥
बिभ्राणां वरमब्जयुग्ममभयं हस्तैः किरीटोज्ज्वलाम् |
क्षौमाबद्धनितम्बबिम्बवलितां वन्देऽरविन्दस्थिताम्॥
कमरेभोवती रेशमी वस्त्र धारण केलेली, सुवर्णकांती असलेली, तेजाने झळकणारा मुकुट धारण केलेली अशी ही कमला कमलासनावर बसली असून, तिच्यावर चारही बाजूंनी हिमालयासारखे भव्य आणि शुभ्र हत्ती सुवर्णमय अमृतकलशातून अभिषेक करीत आहेत. आपल्या दोन हातांमध्ये तिने दोन कमलपुष्प धरलेले असून, इतर दोन हातांनी ती 'वरदमुद्रा' आणि 'अभयमुद्रा' दर्शवित आहे.
सर्वप्रकारच्या संपत्तीप्रमाणेच तिच्या व्यक्तिमत्त्वातील 'ज्ञानरूपी लक्ष्मी' म्हणजेच, 'विद्या' हा पैलू अतिशय महत्त्वाचा असल्याने तिच्या अनेकविध स्तोत्रांमध्ये विशुद्धज्ञान देणारी, अज्ञानाचा नाश करणारी, निःसंदिग्ध वाणी प्रदान करणारी अशी तिची विशेषणे वर्णिली आहेत. इतकेच नव्हे, तर तिच्या कृपेने इंद्रियांची ओजस्विता, शारीरिक बळ, आध्यात्मिक बळ, दक्षता, बुद्धिवैभव इत्यादी प्राप्त व्हावे, असे तिच्या 'उपनिषदा'त म्हटलेले आहे. 'शाक्तप्रमोदा'तील स्तोत्रानुसार तर, 'कमला' म्हणजे आन्वीक्षिकी (तर्क किंवा न्यायशास्त्र, तसेच आत्मविद्या), त्रयी ('ऋग्वेद', 'यजुर्वेद' आणि 'सामवेद'), वार्ता (कृषी आणि व्यापार) आणि दंडनीती (राज्यशास्त्र) यांचेच मूर्तस्वरूप आहे. समाधी, भावना, मैत्री आणि करुणा या योगदर्शन आणि बौद्ध तत्त्वज्ञानात महत्त्वपूर्ण असलेल्या तत्त्वांचे; तसेच दीक्षा, वीक्षा, परीक्षा आणि समीक्षा या बुद्धीच्या विशेष क्षमतांचेही मूर्तरूप असल्याचे म्हटले आहे. थोडयात, सुखी आणि यशस्वी मानवी जीवनाला आवश्यक ते सर्व पुरवणारी महाविद्या म्हणजेच, 'कमला' होय. विष्णूचा 'मत्स्यावतार' आणि 'कमला' एकच होत, असे 'मुण्डमाला'तंत्र सांगते.
-रंजना नायगावकर
९९६९७८९४३२

