Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घोडचूक नव्हे, बेजबाबदारपणाच!

घोडचूक नव्हे, बेजबाबदारपणाच!

माजमाध्यमांवरील इन्फ्लुएन्सर असलेल्या प्रसाद वेदपाठक यांनी, त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीतील रस्त्यावर मारलेल्या पांढर्‍या पट्ट्यांवरून उठवलेले वादळ सर्वदूर पोहोचले. जैन मुनींना चालणे सोयीस्कर व्हावे म्हणून तयार करण्यात आलेल्या या पांढर्‍या मार्गांवर, स्थानिक रहिवासी म्हणून त्यांनी घेतलेला आक्षेप एका अर्थाने योग्यच.

मात्र, त्यांनी समाजमाध्यमांवर याचा उल्लेख 'जैन जिहाद' असा केला, हे निश्चितच चुकीचे होते. जरी त्यांनी दि. २ जून रोजी केलेली ती 'पोस्ट' नंतर 'डिलीट' केली असली, तरी विशिष्ट धर्माविरोधात केलेले हे वक्तव्य जैन समुदायाच्या मनातून सहजासहजी पुसले जाणे कठीणच. कडक उन्हात सिमेंट किंवा डांबरी रस्त्यावरून जैन मुनींना अनवाणी चालणे सुसह्य व्हावे, म्हणून जमिनीवर तात्पुरता पांढरा रंग किंवा चुना लावला जातो. असाच एक पट्टा संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात मारण्यात आला होता. एखाद्या सोसायटीमध्ये सर्वांच्या संमतीशिवाय सार्वजनिक जागेवर किंवा मार्गांवर कोणतेही कायमस्वरूपी वा तात्पुरते बदल केले जात असतील, तर त्याला रहिवासी म्हणून विरोध करण्याचा अधिकार प्रसाद वेदपाठक किंवा इतर कोणत्याही सोसायटीच्या सदस्याला नक्कीच आहे. मूळ आक्षेप जर नियमांवर किंवा संमतीवर होता, तर त्याला कायद्याच्या चौकटीत किंवा संवादाच्या माध्यमातून विरोध होणे आदर्श ठरले असते. मात्र, याला 'जैन जिहाद'सारखे प्रक्षोभक नाव देणे ही केवळ घोडचूक नसून, अत्यंत बेजबाबदार भूमिकाही आहे.

जनमानसात 'जिहाद' हा शब्द धार्मिक कट्टरता आणि हिंसक विचारसरणीशी जोडला गेला आहे. याउलट, जैन धर्म हा जगातील सर्वांत शांतताप्रिय आणि अहिंसक धर्म मानला जातो. पण काय आहे, शांतपणे केलेल्या कायदेशीर विरोधाला समाज माध्यमांवर सहसा 'व्ह्युज' किंवा 'लाईस' मिळत नाहीत, हेही तितकेच खरे. मग, अशा प्रकरणांना धार्मिक रंग दिल्यास, लोकांच्या भावना चटकन भडकतात आणि तो व्हिडिओ 'अल्गोरिदम'मध्ये वर येतो. 'जिहाद' हा शब्द ज्या हिंसक आणि कट्टरतावादी इतिहासाशी जोडला गेला आहे, त्याची तुलना ज्याचा पाया 'अहिंसा परमो धर्मः' तत्त्वावर आधारलेल्या जैन धर्माशी करणे अत्यंत निंदनीय असेच. त्यामुळे कोणतीही 'पोस्ट' करण्यापूर्वी सारासार विचार केला, तर नंतर ती 'डिलीट' करण्याची नामुष्की ओढवणार नाही, हे वेळीच समजून घेतलेले बरे!

विकृत कॉमेडीचा 'नंगानाच'

सध्या समाजमाध्यमांवर 'स्टॅण्ड-अप कॉमेडी'च्या नावाखाली जे काही चालले आहे, ते पाहून एकच प्रश्न पडतो की, आपण नक्की कोणत्या सुसंस्कृत समाजात जगत आहोत? विनोद आणि विकृती या दोन्हीमध्ये एक पुसटशी रेषा असते. पण, सध्याच्या काही 'क्रिएटर्स'नी आणि प्रेक्षकांनी, ती रेषाच पुरती पुसून टाकली आहे. प्रणीत मोरे याच्या शोमधील '३७०ची बिर्याणी' आणि एका महिला डॉक्टरने सांगितलेला मृतदेहांचा किस्सा म्हणजे केवळ अश्लीलता नसून, समाजाच्या नैतिक अधःपतनाचाही कळस आहे. गुरुग्रामचा तथाकथित सुशिक्षित तरुण हिमांशू जांगरा एका शोमध्ये येतो आणि अत्यंत अभिमानाने सांगतो की, त्याने एका महिलेला ३७० रुपयांची बिर्याणी खाऊ घातली. पुढे ती महिला निघून जात असताना त्याच्या मनात विचार आला; ३७० रुपयांची बिर्याणी अजून वसूलच झाली नाही! येथे 'वसूल करणे' म्हणजे काय, हे न समजण्याइतपत सामान्य जनता काही मूर्ख नाही.

इतकेच नाही, तर या वासनांध मानसिकतेला पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊनही गौरवण्यात येते. ही गोष्ट इतयावरच थांबत नाही. मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात शिकत असल्याचा दावा करणारी विद्यार्थीनी, तिच्या सहकारी विद्यार्थ्यांबरोबर रुग्णालयात शवविच्छेदन शिकताना मृत पुरुषांच्या गुप्तांगांच्या आकाराची तुलना करत त्यावर विनोद करतात; हे ती हसत-हसत प्रणित मोरेच्या कार्यक्रमात सांगते. ज्या पेशाला देव मानले जाते, तिथली ही कसली नैतिकता? कॉमेडीच्या नावाखाली कोणाचीही अब्रू वेशीवर टांगणे, महिलांना उपभोग्य वस्तू समजणे आणि मृतदेहांची विटंबना करणे हे जर 'कूल' किंवा 'मॉडर्न' असण्याचे लक्षण असेल, तर आपल्याला अशा आधुनिकतेची गरजच नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे, विकृतीचे प्रदर्शन करण्याचा परवाना नव्हे. आज इंटरनेटच्या आणि 'व्ह्युज' मिळवण्याच्या हव्यासापोटी तरुण पिढी कोणत्या थराला जात आहे, याचे हे विदारक चित्र आहे. प्रेक्षकांनीही अशा घाणेरड्या आणि अश्लील कन्टेन्टवर टाळ्या वाजवणे बंद केले पाहिजे. कारण, जोपर्यंत तुम्ही अशा गोष्टींना 'टीआरपी' द्याल, तोपर्यंत हे विकृतीचे दुकान असेच सुरू राहील. अशा विकृतांवर कडक कारवाईची आज खर्‍या अर्थाने गरज आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai