Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'हायकमांड'ला जाग येईना...

'हायकमांड'ला जाग येईना...

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी राजकीय पटलावरील बलाढ्य शक्ती म्हणून ओळखली जाई, ती आज एका वेगळ्याच वावटळीत सापडली आहे. एकेकाळी देशाच्या राजकारणावरील वर्चस्व, पक्षांतर्गत अनास्थेमुळेच नामशेष होत आहे.

पक्षातील नेत्यांची घुसमट, त्यातून होणारी पक्षांतरे आणि याकडे डोळेझाक करण्याच्या 'हायकमांड' संस्कृतीमुळेच आज काँग्रेसची अवस्था दयनीय झाली. प्रश्न असा की, इतया मोठ्या पडझडीनंतरही काँग्रेस आत्मपरीक्षणास का तयार नाही? गेल्या काही वर्षांत काँग्रेसने एकेक करून आपले अनेक दिग्गज, अनुभवी आणि जनमानसात पकड असलेले नेते गमावले. गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, मिलिंद देवरा, कपिल सिब्बल, अमरेंद्र सिंह आणि अनिल अ‍ॅन्टनी यांसारख्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हे नेते काँग्रेसच्या वैचारिक व राजकीय शक्तीचे खांब होते. असे असूनही, या नेत्यांचीही पक्षात घुसमटत होत होतीच. यास कारण म्हणजे, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत कार्यकर्ता,नेतेमंडळींना कोणतेही स्थान उरलेले नसून, फक्त एकाधिकारशाही चालत असल्याचा गंभीर आरोपही अनेकदा झाला आहे. पक्षाच्या या दुर्दशेसाठी प्रामुख्याने राहुल गांधी यांची कार्यशैली आणि वर्तन जबाबदार धरले जाते. राहुल गांधी यांच्या स्वभावावर, त्यांच्या अहंकारयुक्त वर्तनावर कायम टीकाही झाली आहे.

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक चित्रफित खूप प्रसिद्ध झाली, ज्यात एका रॅलीदरम्यान राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कोपर मारताना दिसले. ही चित्रफित केवळ एका घटनेपुरती मर्यादित नसून, ती हायकमांडच्या सामान्य कार्यकर्त्यांकडे पाहण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे. ज्या पक्षात कार्यकर्त्यांना सन्मानच मिळत नाही, तिथे निष्ठा कशी टिकेल? यापूर्वीही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडताना, राहुल गांधींच्या मानसिकतेवरच आणि वर्तनावर अतिशय गंभीर आरोप केले होतेच. राहुल गांधी पाळीव श्वानाला ज्या ताटातून बिस्किट खाऊ घालायचे, त्याच ताटातून नेते आणि कार्यकर्त्यांना चहा-नाश्ता ऑफर करायचे, असा संतप्त आरोप करुन हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या अंतर्गत संस्कृतीची एकप्रकारे पोलखोलच केली होती. नेत्यांची अशीच मानहानी होत असेल, तर स्वाभिमानी नेते पक्ष सोडणारच, यात नवल ते काय?

आधी तुटलेले घर जोडा!

राहुल गांधींचे समर्थक त्यांना सत्ताधार्‍यांच्यविरोधात आवाज उठवणारे, सामाजिक आणि आर्थिक मुद्दे उपस्थित करणारे नेतृत्त्व मानतात. असे असले, तरी वस्तुस्थिती हीच आहे की, पक्षातील ज्येष्ठांशी संवाद, संघटनात्मक जबाबदार्‍यांचे वाटप आणि अंतर्गत मतभेद हाताळण्यासाठी अधिक समावेशक नेतृत्वाची आवश्यकता काँग्रेसला आहे. या दोन भूमिकांमधील फरक समजून घेतल्यास काँग्रेससमोरील खरा प्रश्न समजतो, तो म्हणजे नेतृत्वाची सार्वजनिक प्रतिमा आणि पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धती यांच्यात सुसंगती आहे का? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही याच मुद्द्यावर बोट ठेवले. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सध्याच्या धोरणांना आणि पक्षीय कामकाजाला पूर्णपणे कंटाळले असून, ते लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा त्यांनी केला. हा केवळ राजकीय टोमणा नसून, काँग्रेसच्या अंतर्गत असंतोषाची पावती आहे.

पक्षात वरिष्ठांचे ऐकले जात नाही, वैचारिक स्पष्टता उरलेली नाही आणि केवळ एका विशिष्ट कुटुंबाच्या भजनातच पक्ष व्यस्त आहे, याविषयी नेत्यांमध्ये कमालीचा रोष आहे. सर्वांत मोठी शोकांतिका हीच की, प्रत्येक पराभवानंतर, प्रत्येक मोठ्या पक्षांतरानंतर काँग्रेसने केवळ पोकळ आश्वासने दिली. पण, आत्मपरीक्षण केले नाही. पराभवाचे खापर 'ईव्हीएम'वर किंवा जनतेच्या समजुतीवर फोडणे, ही काँग्रेसची आता जुनी सवय झाली आहे. जोपर्यंत नेतृत्व अहंकार सोडत नाही, घराणेशाहीचा पाश तोडत नाही आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना मानसन्मान देत नाही; तोवर काँग्रेस पडझडीतून सावरणार नाही. आज काँग्रेसची अवस्था एका अशा जहाजासारखी आहे, ज्याचा कॅप्टन दिशाहीन आहे आणि प्रवासी जीवाच्या भीतीने समुद्रात उड्या मारत आहेत. राजकारणात हार-जीत नित्याचीच. मात्र, पराभवातून धडा घेणे आणि पक्षात संरचनात्मक बदल करणे, कोणत्याही पक्षासाठी अत्यंत गरजेचेच. इतिहास साक्षी आहे की, जे पक्ष आत्मपरीक्षणाचे दरवाजे कायमचे बंद करतात, त्यांना जनता आणि वेळ दोन्ही माफ करत नाहीत. जर काँग्रेसला अस्तित्वाचा लढा जिंकायचा असेल, तर 'भारत जोडो'च्या घोषणांपूर्वी स्वतःचे 'तुटलेले घर' जोडावे लागेल. अन्यथा, अहंकाराच्या ओझ्याखाली इतिहासजमा व्हायची वेळ येईल, यात शंका नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai