Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
होरपळलेल्या 'जीवा'ची कहाणी

होरपळलेल्या 'जीवा'ची कहाणी

व्यावसायिक पातळीवर मराठी चित्रपटांचा उत्कर्ष कधी होणार, कोट्यवधींच्या घरात आपल्या चित्रपटांचे आकडे कधी जाणार, असा विचार करत असताना; दुसर्‍या बाजूला सर्जनशीलता आणि कलात्मकतेच्या पातळीवर होणार्‍या नवनवीन प्रयोगांकडे दुर्लक्ष करणे, हा अक्षम्य गुन्हा ठरावा.

रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' या गाजलेल्या चित्रपटासह रवींद्र जाधव दिग्दर्शित 'जीव' या चित्रपटाने 'कान्स'ची वारी केली. कथनशैली, मांडणी, भाषा अशा विविध स्तरांवर नवीन अनुभूती देणारा हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीच्या विस्तारलेल्या दिशांची जाणीव प्रेक्षकांना करून देणारा आहे.

भय, भूक, मैथुन या माणसाच्या आदीम प्रेरणा आहेत. त्याचसोबत समूहामध्ये राहणं, कळपात राहणं ही माणसाची गरज. पुढे या समूहांचं रूपांतर भौगोलिक स्थानबद्धतेत राहण्यात झालं. त्या-त्या काळातील परिस्थितीनुसार समाजाची एक विशिष्ट रचना तयार झाली. त्यातून पुढे समाजरचना बदलत गेली. कालौघात संस्कृती जन्माला आली. काही विशिष्ट प्रथा, परंपरा, रूढी यांच्या माध्यमांतून समाजाचा गाडा पुढे सरकू लागला. याच काही परंपरांनी माणसाला जगण्याचा आधार दिला, तर काहींनी जगणंच नकोसं करून टाकलं. मात्र, समूहाचा भाग म्हणून जगायचं असेल, तर हातावर जळका निखारा ठेवून जगण्याची तयारी पाहिजे. माणसाच्या याच होरपळण्याचं अद्भुत चित्रण करणारा सिनेमा म्हणजे 'जीव.'

'जीव' हा सिनेमा म्हणजे मिरू नावाच्या आदिवासी बांधवाची व त्याच्या घरच्यांची गोष्ट. होळीच्या दिवशी मिरूच्या वडिलांना आलेलं मरण आणि या मृत्युपायी मिरूच्या कुटुंबीयांची झालेली होरपळ, हा या चित्रपटाचा गाभा. होळीच्या दिवशी झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना लागलेलं सुतक, नंतर या सुतकाचं सामाजिक अवहेलनेमध्ये झालेलं रूपांतर, या पार्श्वभूमीवर सिनेमा पुढे सरकत जातो. आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाने बहिष्कृत करू नये, यासाठी मिरूच्या मनात विचारांचं काहूर माजतं. अशाप्रसंगी भाऊबंदकीने सोडलेली साथ, परिस्थितीपायी निर्माण झालेली हतबलता आणि या सार्‍या वादळामध्ये त्याला साथ देणारं त्याचं कुटुंब, यांच्या नात्यातली गुंतागुंत त्याला असलेले विविध पदर दिग्दर्शकाने अत्यंत सक्षमपणे मांडलेले आहेत. आपल्या कुटुंबावर आलेलं संकट टळावं, यासाठी चतुराईने वागणारी मिरूची बायको, आभाळातलं नक्षत्र पाहून सणवार सांगणारी त्याची आई, बालपणाचं कुतूहल घेऊन जगणारा त्याचा मुलगा या सार्‍या पात्रांचा वावर सहज, सुलभ आणि कथासूत्राला पूरक अशा पद्धतीचा राहिला आहे.

सणावाराच्या दिवशी व देवीच्या जत्रेमध्ये वाजवलं जाणारं 'पावरी' हे वाद्य परंपरेचं, आठवणींचं, न तुटणारं बंधन म्हणून रसिकांसमोर येतं. ही 'पावरी' एकाच वेळेला मिरूची ओळख आहे आणि त्याच्या वडिलांच्या आठवणीचा स्रोतसुद्धा. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मिरूला त्रास देणारा ढवळ्या, पैसे न मिळाल्याची अडगळ मनात ठेवत वचपा काढत राहतो. परंपरा आणि मानवी नातेसंबंधांमधील संघर्ष अशा विविध प्रसंगांतून अत्यंत नेमकेपणाने दिग्दर्शकाने लोकांपर्यंत पोहोचवला आहे. कुटुंबावरचं वाळीत टाकण्याचं संकट टळावं म्हणून एका जीवासाठी चाललेली सगळी होरपळ प्रेक्षकांच्या मनालासुद्धा वेदनेच्या कवेत बंदिस्त करते. माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, घरातला कर्ता पुरुष म्हणून ही सगळी जबाबदारी पार पडताना त्याच्या मनातला कोलाहल केवळ त्याच्या शब्दांमधूनच नव्हे, तर त्याच्या चेहर्‍यावरूनसुद्धा झळकत राहतो. एकाच वेळेला नैराश्याच्या गर्तेत अडकत असताना, आपण परिस्थितीशी दोन हात करत राहू, ही जिद्द ठेवून हे कुटुंब जगत राहतं. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे सबंध कुटुंब धरून ठेवणारा एक आधारस्तंभ असतो. मिरूची आई खमकी आहे. मात्र, तिचं सामर्थ्य बाह्यस्वरूपात प्रकट होणारं नसून, अंतरंगात घराला तोलून धरणारं आहे. नात्यांमधलं माप कमी-जास्त होऊ द्यायचं नाही. पण, त्याच वेळेला आपल्या कुटुंबावर होणारा अन्यायसुद्धा सहन करायचा नाही, याचा समतोल तिने बरोबर साधला आहे.

चित्रपटातील संगीत हे चित्रपटातचं बलस्थान आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, योग्य त्या ठिकाणी कुठल्याही सुरावटींपेक्षा इथे शांततेला अधिक महत्त्व आहे. चित्रपटाच्या संगीतामध्ये कुठेही कृत्रिमपणा आढळून येत नाही. गावाच्या भौगोलिक स्थानाचा विचार करता, त्याच भागातील आवाजाचा अंतर्नाद सिनेमामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. मिरू ज्यावेळी जीव ओतून 'पावरी' वाजवतो, त्यावेळी भोवताल कवेत घेणार्‍या या चित्रपटाचा परमोच्च बिंदू प्रेक्षकांना नादवून ठेवतो.

'जीव' हा चित्रपट एक प्रयोग म्हणून अनेक पातळ्यांवर यशस्वी ठरला आहे. मात्र, या चित्रपटातील भाषा हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा. धुळ्याच्या साक्री तालुयातील रोहड गावाच्या जवळ या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. तिथल्या आदिवासी बांधवांची 'कोकणी' (कोंकणी नाही) भाषा या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळते. 'अहिराणी' बोलीच्या जवळ जाणारी ही भाषा मनाचा ठाव घेणारी आहे. संवाद असो किंवा संगीत, कुठल्याही प्रकारचा कृत्रिमपणा नसल्यामुळेच चित्रपटाचा आशय थेट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालतो.

'दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा'च्या माध्यमातून या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग प्रभादेवीच्या 'पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी'च्या लघू नाट्यगृहात काही दिवसांपूर्वी संपन्न झालं. 'कान्स'सारख्या मोठ्या पडद्यापासून ते थिएटरच्या लोकप्रिय सिल्हवर स्क्रीनपर्यंतचा प्रवास व्यावसायिकदृष्ट्या आजही प्रायोगिक चित्रपटांसाठी अवघड असतो. एका बाजूला दिग्दर्शकाला तळमळीने आपला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो, लोकांनासुद्धा सिनेमा बघण्याची उत्सुक्ता असते. अशा परिस्थितीमध्ये दर्जेदार, आशयघन चित्रपट युवा पिढीसह सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सुजाण प्रेक्षकवर्ग घडविण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने राबवलेला हा उपक्रम कौतुकास पात्र आहे. 'जीव' चित्रपटाचं सर्वांत मोठं बलस्थान म्हणजे, चित्रपटकर्त्यांनी जीव ओतून जपलेला अस्सलपणा! हाच अस्सलपणा त्यांच्या यशाची नवी कारकीर्द रचणार, यात शंका नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai