जंतरमंतरवरील आंदोलनानंतर जसा 'जेन झी' शब्द चर्चेत आला, तसेच त्यांच्या मानसशास्त्राची चर्चाही रंगली. यामध्ये त्यांचे वर्तन, विचार करण्याची पद्धत, त्यांच्या सभोवतालाची परिस्थिती आणि त्याचा त्यांच्यावर न कळत वाढत जाणार दबाव या दृष्टीनेही त्यांच्या वर्तनाच विचार होताना दिसत आहे.
'जेन झी'च्या मानसिकतेचा आढावा घेणारा हा लेख...
आजची मुले खूपच लवकर 'स्ट्रेस'मध्ये जातात. आमच्या काळात एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आम्ही विचलित होत नव्हतो!' अलीकडे तरुणांविषयी हे वाय सर्रास ऐकायला मिळते. त्यामागे एका पिढीचा अनुभव आहेच, परंतु मानसशास्त्राच्या दृष्टीने हा प्रश्न इतका सोपा नाही. आजची तरुण पिढी, विशेषतः 'जेन-झी' खरोखरच कमी लवचिक आहे का, की ती आपल्या भावना, मानसिक आरोग्य आणि ताण यांविषयी पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा अधिक जागरूक आहे? कोणती पिढी अधिक लवचिक आहे, यापेक्षा दोन्ही पिढ्यांनी ताण कोणत्या वेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिस्थितीत अनुभवला, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरेल. कारण 'स्ट्रेस' ही केवळ बाहेर घडणार्या एखाद्या घटनेची प्रतिक्रिया नसते. तो व्यक्तीचे विचार, तिची सामाजिक परिस्थिती, तिचे संबंध, उपलब्ध आधार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ती त्या घटनेचा अर्थ कसा लावते, यांचा एकत्रित परिणाम असतो. म्हणूनच, 'जेन-झी'च्या 'स्ट्रेस'कडे पाहताना केवळ आजची मुले अधिक 'स्ट्रेस' घेतात, असे म्हणणे पुरेसे नाही. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, आजच्या तरुणांमध्ये 'स्ट्रेस' निर्माण कसा होतो, त्याचा अर्थ कसा लावला जातो आणि तो कसा व्यक्त केला जातो.
'जेन-झी'चा 'स्ट्रेस' वेगळा का वाटतो?
पूर्वीच्या पिढ्यांत 'स्ट्रेस' हा, अनेकदा जीवनविषयक एखाद्या विशिष्ट घटनेशी जोडलेला असे. यामध्ये परीक्षा, नोकरी, आर्थिक अडचण, लग्न, कौटुंबिक संघर्ष किंवा आजार अशा विषयांचा समावेश होई. आज तरुणांच्या आयुष्यातही या समस्या आहेत; मात्र त्यांच्यासोबतच इतर ताणतणावही असतात. शैक्षणिक स्पर्धा, करिअरची अनिश्चितता, आर्थिक असुरक्षितता, सततची सामाजिक तुलना, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, स्वतःच्या ओळखीविषयीचा दबाव आणि भविष्यातील अनिश्चितता हे सर्व घटक एकमेकांपासून स्वतंत्र राहात नाहीत उलट, ते एकमेकांना वाढवणारे ठरतात. उदाहरणार्थ, करिअरची अनिश्चितता ही सुरुवातीला आर्थिक चिंतेचा विषय असू शकते. 'मला नोकरी मिळेल का,' हा प्रश्न पुढे, 'माझे भविष्य सुरक्षित आहे का' आणि त्यानंतर नकळत 'मी पुरेसा सक्षम आहे का,' अशा वैयक्तिक प्रश्नात बदलू शकतो. अशा वेळी बाह्य परिस्थितीचा ताण केवळ परिस्थितीपुरताच मर्यादित राहात नाही; तो व्यक्तीच्या अस्मितेशीही जोडला जातो. म्हणजेच, हा तणाव हळूहळू मानसिक तणावामध्ये, मानसिक तणाव पुढे व्यक्तित्वाशी संबंधित उद्वेगामध्ये रूपांतरित होण्याची भीती असते.
यामुळेच आज तरुणांच्या 'स्ट्रेस'कडे केवळ त्यांच्या समस्या, या दृष्टिकोनातूनच पाहणे पुरेसे नाही. त्याऐवजी या समस्या एकमेकांशी कशा गुंतत जातात आणि त्या तरुणांच्या सर्वांगिण प्रगतीवर कसा परिणाम करतात, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण, एखादी समस्या जेव्हा अधिक तीव्र होते, तेव्हा ती व्यक्तीला आपल्या मूल्याबद्दल, क्षमतेबद्दल आणि भविष्यातील अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारायला लावते. 'स्ट्रेस' म्हणजे केवळ घटना नव्हे; त्या घटनेचा अर्थही यात आहे.
मानसशास्त्रात आकलनविषयक मूल्यमापन (कॉग्निटिव्ह अप्राईझल) ही संकल्पना, 'स्ट्रेस' समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाची. एखादी परिस्थिती स्वतःहून किती 'स्ट्रेस' निर्माण करेल हे निश्चित नसते; व्यक्ती त्या परिस्थितीचे मूल्यांकन कसे करते आणि ती परिस्थिती आपल्या क्षमतेपेक्षा मोठी आहे असे तिला वाटते का, यावरच तिचा 'स्ट्रेस' अवलंबून असतो. उदाहरणार्थ, माझी परीक्षा कठीण आहे, हा अडचणीचा स्वीकार आहे. परंतु, या परीक्षेत मी अपयशी झाल्यास माझे संपूर्ण आयुष्य संपेल, हा त्या अडचणीला दिलेला मानसिक अर्थ आहे. पहिल्या विचारातून चिंता निर्माण होऊ शकते; परंतु दुसर्या विचारातून ती चिंता अधिक व्यापक होऊन, आपत्तीजनक विचारांकडे जाते. म्हणूनच दोन व्यक्तींना एकच परीक्षा, एकच नोकरीची मुलाखत किंवा सारखेच अपयश आले, तरी त्यांची मानसिक प्रतिक्रिया सारखी असेलच असे नाही.
यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे तणाव बाहेर असतो; पण त्याचा अनुभव मनात आकार घेतो. त्यामुळे 'जेन-झी'च्या 'स्ट्रेस'चा अभ्यास करताना, केवळ त्यांच्या कोणत्या समस्या किती तणावजन्य आहेत, हा प्रश्न पुरेसा नाही. याबरोबरच, ते तणावाचा अर्थ कसा लावतात, हेदेखील समजून घ्यावे लागेल.
माझे भविष्य की माझी ओळख?
आजच्या तरुणांसाठी शिक्षण, किंवा करिअरचा प्रश्न, केवळ रोजगाराचा किंवा भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न राहिलेला नाही. तो त्यांच्या ओळखीचाही प्रश्न होऊ लागला आहे. मी कोण आहे, मी समाजात कुठे उभा आहे, माझ्या मित्रांपेक्षा मी मागे का आहे, माझे आयुष्य योग्य दिशेने चालले आहे का, असे प्रश्न त्यांच्या मनात येतात. अशा वेळी कामगिरी आणि स्वतःची अस्मिता यांच्यातील अंतर कमी होते. परीक्षेतील गुण हे मुळातच केवळ शैक्षणिक कामगिरीचे मोजमाप असतात; परंतु जेव्हा तेच गुण व्यक्तीच्या स्वतःच्या मूल्याचे मोजमाप होतात, तेव्हा परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलते. मला कमी गुण मिळाले हे एका प्रसंगाचे वर्णन आहे; पण मी कमी आहे, हे स्वतःच्या अस्तित्वाविषयीचेच विधान होते. त्याचप्रमाणे, अपयश ही एक घटनाच आहे. ती बदलता येते, तिच्यातून शिकता येते आणि पुन्हा प्रयत्नही करता येतो. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती त्या अपयशालाच आपल्या ओळखीचा भाग मानते, तेव्हा अपयशाची वेदना अधिक खोलवर जाते. प्रश्न मग 'मी या परीक्षेत अपयशी झालो,' एवढाच राहात नाही; तो 'मी अपयशीच आहे,' या भावनेपर्यंत तो पोहोचतो. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने या दोन विधानांमधील अंतर अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, परिस्थिती बदलण्याची शयता असते; परंतु स्वतःबद्दल तयार झालेली नकारात्मक ओळख बदलणे अधिक कठीण असू शकते. (क्रमशः)
- डॉ.शुभांगी पारकर

