ठाणे, : (India Jewellery Park Mumbai)मुंबईच्या झवेरी बाजाराच्या पिढ्यानपिढ्यांच्या वारशाला आता महापेच्या आधुनिक औद्योगिक क्षमतेची जोड मिळणार आहे. महापे येथे २२ एकरावर इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
या प्रकल्पातून २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "महाराष्ट्राला केवळ ज्वेलरी व्यापाराचे नव्हे, तर उत्पादन, संशोधन, डिझाईन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवायचे आहे. आमचे सरकार स्थगितीचे नव्हे, तर प्रगतीचे सरकार आहे. या प्रकल्पासाठी आम्ही रेड कार्पेटची भूमिका घेतली आहे."(India Jewellery Park Mumbai)
जेम्स अँड ज्वेलरी उद्योग देशासाठी परकीय चलन आणि रोजगार निर्माण करणारा महत्त्वाचा क्षेत्र आहे. देशभरातील ५० लाखांहून अधिक कारागीर या उद्योगाशी जोडलेले असून, भारतातून दरवर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांच्या जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचा या क्षेत्रातील वाटा मोठा असून राज्यातील निर्यात दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राच्या जेम्स अँड ज्वेलरी धोरणातून १ लाख कोटी गुंतवणूक आणि ५ लाख रोजगारांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. AI, थ्री-डी डिझायनिंग, लॅब ग्रोन डायमंड आणि ऑनलाइन ट्रेडिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला पारंपरिक कारागिरीची जोड देण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिक युवक-युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि कामगारांच्या निवासाचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे.(India Jewellery Park Mumbai)
'सोने तिजोरीत ठेवले तर संपत्ती साठते; पण सोने उद्योगात गुंतले तर रोजगार निर्माण होतो, अर्थव्यवस्था वाढते आणि देश समृद्ध होतो,' असे शिंदे म्हणाले. विकसित भारताच्या संकल्पनेत उत्पादन, निर्यात, रोजगार आणि उद्योजकतेची भूमिका महत्त्वाची असून, महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेण्यात अशा उद्योगांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

