Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काश्मीर पुन्हा हादरलं! दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दोन मजूरांचा मृत्यू

काश्मीर पुन्हा हादरलं! दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दोन मजूरांचा मृत्यू

श्रीनगर: (Kulgam Terror Attack) दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी ३१ जुलै रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील दुसऱ्या जखमी मजुराचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

यासह या अतिरेकी हल्ल्यात प्राणास मुकलेल्या मजुरांची संख्या आता दोन झाली आहे. हे दोन्ही मजूर छत्तीसगडचे रहिवासी असून विटाभट्टीवर काम करत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Kulgam Terror Attack)

किलम गावात थेट गोळीबार; दोन्ही कामगारांचा मृत्यू

कुलगाममधील किलम गावात अतिरेक्यांनी दोन मजुरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. यात दीपक नावाच्या मजुराचा जागीच मृत्यू झाला होता. अतिरेक्यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भूपिंदर या दुसऱ्या मजुरावर अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Kulgam Terror Attack)

ऑक्टोबर २०२४ नंतर स्थलांतरित मजुरांवर पहिलाच हल्ला

दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शुक्रवारी झालेला हा अतिरेकी हल्ला गेल्या दहा दिवसांतील दक्षिण काश्मीरमधील दुसरा मोठा हल्ला आहे. ऑक्टोबर २०२४ नंतर काश्मीर खोऱ्यात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवर झालेला हा पहिलाच हल्ला ठरला आहे. याआधी २२ जुलै रोजी अतिरेक्यांनी अनंतनाग शहरात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती गटात (STG) तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. (Kulgam Terror Attack)


मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून आर्थिक मदतीची घोषणा

या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दोन्ही मृत कामगारांच्या शोकाकुल कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच खोऱ्यातील स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. (Kulgam Terror Attack)


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai