Monday, 13 Jul, 6.00 pm तरुण भारत मुंबई

महाराष्ट्र
कोरोनाचा कहर असतानाही विक्रोळीत पालिकेचे रुग्णालय बंद!

डागडुजीसाठी पालिका रुग्णालय गेले ३ वर्ष बंदच!

मुंबई : कोरोनाचा वाढता कहर वाढत असताना मुंबई महापालिका प्रशासन रुग्णसेवेसाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेत आहे. मात्र विक्रोळीतील पालिकेचे क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले हॉस्पिटल बंद आहे. नागरिकांनी त्याविरोधात रविवारी ऑनलाईन आंदोलन छेडले. सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी विक्रोळी कन्नमवार येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलला मुंबई महापालिका प्रशासनाने टाळे ठोकले. मात्र तीन वर्षे उलटली तरी अद्याप रुग्णालय बंदच आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये असलेले महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल हे विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि भांडुपमधील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचे होते. हॉस्पिटलची काही वर्षांपासून दुरवस्था झाल्याने त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. परंतु पालिकेने डागडुजी करण्याऐवजी जुने हॉस्पिटल पाडून त्याजागी नवे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येईल, असे सांगत २०१८ मध्ये हॉस्पिटलची इमारत रिकामी केली. हॉस्पिटलमधील काही विभाग हे टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केला. तीन वर्षे होऊनही महात्मा फुले हॉस्पिटलचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. त्यातच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कन्नमवार नगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त रुग्ण कन्नमवार नगरमध्ये आढळले असून, कन्नमवार नगर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. फुले हॉस्पिटल बंद असल्याने येथील नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागत आहे. परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे हॉस्पिटल सुरू असते तर कोरोनाच्या संकटात नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत झाली असती. त्यामुळे हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करावे यासाठी विक्रोळीतील तरुणांनी एकत्र येऊन रविवारी ऑनलाईन आंदोनल करत आपला आवाज पालिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai
Top