Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मारुती पहिलवानांचा वारसा : हिंदू वडार समाजाची नवी आशा

मारुती पहिलवानांचा वारसा : हिंदू वडार समाजाची नवी आशा

दि. ३१ ऑगस्टचा 'भटके-विमुक्त दिन' नुकताच राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा झाला. त्याआधी दि. २५ ऑगस्टला वडार समाजाचे भूषण आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पहिलवान कै. मारुती चव्हाण वडार यांची ९३वी जयंती झाली.

मुंबईतील जुहू येथील त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात ही जयंती साजरी करण्यात आली. पहिलवानांच्या कर्तृत्वाचे स्मरण आणि त्यांच्या नावाने सुरू झालेल्या महामंडळाच्या कामकाजाकडे पाहता, समाजाच्या अपेक्षा प्रत्यक्षात कितपत उतरल्या, याचा आढावा घेणारा हा लेख...

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोपर्डे येथे दि. २५ ऑगस्ट १९३३ रोजी मारुती चव्हाण यांचा जन्म झाला. आण्णा चव्हाण आणि आवडाबाई आण्णा चव्हाण यांच्या कुटुंबात वाढलेल्या मारुती पहिलवानांचे शिक्षण कोपर्डे हवेली येथील जिल्हा परिषद शाळेत दुसरीपर्यंत झाले. पुढे शिक्षण थांबले; मात्र कुस्तीच्या आखाड्यात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सहा फूट दोन इंच उंची आणि सुमारे १२५ किलो वजनाची धिप्पाड शरीरयष्टी, ताकद आणि कुस्तीतील डावपेच यांमुळे त्यांचे नाव पुढे आले. कोल्हापूर येथे त्यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. ढाक डावात त्यांचे गुरू बेलीफ होते, तर आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या प्रवासात दारा सिंह यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

दि. ६ मार्च १९६५ रोजी कोल्हापूरच्या खासबाग मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीत पाकिस्तानी पहिलवान बाला रफी यांना काही क्षणांत चितपट केल्याचे त्यांच्या कारकिर्दीबाबत सांगितले जाते. या कामगिरीची दखल तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतली आणि त्यांचा सत्कार केला. यावेळी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

परदेशातील कुस्तीच्या मैदानावरही त्यांनी भारताचे नाव गाजवले. ४० पैकी ३९ कुस्त्यांमध्ये विजय मिळवल्याची माहिती त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित नोंदींमध्ये आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरही त्यांच्या कुस्त्यांची चर्चा होती. सुनील गावस्कर, शत्रुघ्न सिन्हा, मुमताज, हेलन आणि मेहमूद यांसारख्या नामवंत व्यक्ती त्यांच्या कुस्त्या पाहण्यासाठी येत असत, अशा आठवणी आजही सांगितल्या जातात.

स्वतःचे शिक्षण दुसरीपर्यंत झाले असतानाही मारुती पहिलवानांनी कुटुंबाच्या शिक्षणाला महत्त्व दिले. त्यांच्या पत्नी शशिकला यांनी 'बीए'पर्यंत शिक्षण पूर्ण केले. ज्येष्ठ सुपुत्र प्रमोद यांनी 'बीएस्सी'पर्यंत शिक्षण घेतले असून दुसरे सुपुत्र रुपेश यांनी पदविका पूर्ण केली आहे. त्यांचे कुटुंब कराड येथे वास्तव्यास आहे. दि. ६ मे २०११ रोजी सौदापूर, कराड येथे त्यांचे निधन झाले. आखाड्यातील त्यांचा प्रवास थांबला असला, तरी त्यांचे नाव वडार समाजासाठी आजही अभिमानाचे आहे.

पहिलवान कै. मारुती चव्हाण वडार यांच्या नावाने 'आर्थिक विकास महामंडळा'ची दि. २० जानेवारी २०२४ रोजी कंपनी 'अधिनियम, २०१३'अन्वये नोंदणी झाली. महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी रुपये असून दरवर्षी पाच कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असल्याची माहिती आहे. समाजप्रतिनिधींच्या माहितीनुसार, शासनाकडून महामंडळाकडे ११ कोटी ९६ लाख रुपये वर्ग झाले असून ८३ लाभार्थ्यांना ७८ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. सुमारे ११ कोटी १९ लाख ६० हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. उपलब्ध निधीच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या कमी असणे, हीच समाजाची मुख्य चिंता आहे. वडार समाजातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आजही रोजंदारी, पारंपरिक कामे आणि छोट्या व्यवसायांवर आहे. बांधकाम, वाहतूक, हातगाडी किंवा स्वयंरोजगारासाठी भांडवलाची गरज असते. महामंडळाच्या थेट कर्ज, गट कर्ज आणि बीज भांडवल कर्ज योजनांमधून ही गरज पूर्ण होऊ शकते. मात्र, जामीनदार कागदपत्रे आणि कार्यालयीन प्रक्रियेतील अडचणींमुळे पात्र अर्जदारांची प्रकरणे रखडत असल्याची समाजाची तक्रार आहे. विशेषतः ज्याच्याकडे भांडवल नाही, त्यालाच सक्षम जामीनदार मिळणे कठीण जाते.

महामंडळासाठी मंजूर झालेल्या १५ अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पदांवर अद्याप भरती झालेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे कामकाजाचा वेग कमी होत असल्याचे समाजप्रतिनिधींचे म्हणणे आहे. बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयाचे कामही रखडल्याची तक्रार आहे. मनुष्यबळ आणि कार्यालयीन व्यवस्था सक्षम झाल्यास अर्जांची छाननी, कर्जप्रकरणांचा पाठपुरावा आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे अधिक सोपे होईल.

महामंडळ केवळ कर्जवाटप करणारी यंत्रणा न राहता, युवक, महिला आणि छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शन देणारे केंद्र बनावे, अशीही अपेक्षा आहे. कर्ज मिळाल्यानंतर व्यवसाय कसा सुरू करायचा, तो टिकवायचा कसा आणि बाजारपेठ कशी मिळवायची, याचे मार्गदर्शन मिळाल्यास योजनांचा प्रत्यक्ष परिणाम अधिक दिसू शकतो. महामंडळाच्या नेतृत्वाबाबतही समाजातून अपेक्षा आहेत. वडार समाजातील सक्षम आणि अनुभवी व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास समाजाच्या अडचणी थेट निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचतील, अशी भूमिका मांडली जात आहे. तसेच २०१९ मध्ये सोलापूर येथील वडार समाजाच्या महामेळाव्यात राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळासाठी १०० कोटी रुपयांच्या भागभांडवलाची घोषणा केली होती, असा समाजप्रतिनिधींचा दावा आहे. त्यामुळे सध्याचे ५० कोटी रुपयांचे भागभांडवल १०० कोटी रुपये करण्याची मागणी आहे.

पहिलवानांच्या नावाने महामंडळ सुरू झाले असल्याने त्यांच्या कर्तृत्वाची आठवणही जपली जावी, अशी समाजाची अपेक्षा आहे. महामंडळाच्या माहितीपत्रकात आणि अधिकृत पत्रव्यवहारावर त्यांचे बोधचिन्ह, तसेच संकेतस्थळावर त्यांच्या जीवनकार्याची माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी आहे. महामंडळाच्या योजनांची माहिती घेण्यासाठी वडार समाजातील नागरिकांनी www.vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. कर्जयोजना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रियेची अधिकृत माहिती तपासून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मारुती पहिलवानांच्या नावाला खरा अर्थ तेव्हाच मिळेल, जेव्हा त्यांच्या समाजातील कष्टकरी कुटुंबाला व्यवसायासाठी भांडवल मिळेल, एखादा युवक स्वतःच्या पायावर उभा राहील आणि एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलेल. जयंतीनिमित्त अभिवादन झाले; आता त्यांच्या नावाने उभ्या राहिलेल्या महामंडळाच्या कामातून प्रत्यक्ष बदल दिसण्याची समाजाची अपेक्षा आहे.

हिंदू वडार समाजाच्या प्रमुख मागण्या

  • प्रलंबित कर्जप्रकरणांचा तातडीने निपटारा करावा.
  • थेट कर्जमर्यादा एक लाखांवरून तीन लाख रुपये करावी.
  • जामीनदाराची जाचक अट शिथिल अथवा दूर करावी.
  • कर्जासाठी शासनाची हमी उपलब्ध करून द्यावी.
  • मंजूर १५ अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पदांवर तातडीने भरती करावी.
  • बेलापूर, नवी मुंबई येथील महामंडळाचे कार्यालय तातडीने सुरू करावे.
  • महामंडळाचे भागभांडवल ५० कोटींवरून १०० कोटी रुपये करावे.
  • वडार समाजातील सक्षम व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती करावी.
  • महामंडळाच्या योजनांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी.
  • कर्जासोबत युवक, महिला व व्यावसायिकांना व्यवसाय मार्गदर्शन द्यावे.
  • महामंडळाच्या संकेतस्थळावर पहिलवानांचे जीवनकार्य प्रसिद्ध करावे.
  • महामंडळाच्या अधिकृत पत्रव्यवहारावर पहिलवानांचे बोधचिन्ह वापरावे.

महामंडळातून नवी दिशा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिक्षणाची ताकद समाजाने शिकली पाहिजे. शिक्षणासोबत आर्थिक सुबत्ता आली, तरच समाजाची खरी प्रगती होईल. पहिलवान मारुती चव्हाण यांच्या नावाने उभारलेले महामंडळ वडार समाजातील गरजू कुटुंबांना व्यवसाय, रोजगार आणि आर्थिक उभारी देण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने समाजाच्या विकासासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना या महामंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिणाम मिळाला, तर वडार समाजाच्या पुढील पिढीसाठी ही मोठी संधी ठरेल. - प्रमोद मारुती चव्हाण, पहिलवान मारुती चव्हाण यांचे ज्येष्ठ सुपुत्र

विकासासोबत अस्मिताही जपा

वडार समाजाच्या विकासासाठी महामंडळ अधिक प्रभावीपणे कार्यरत होणे गरजेचे आहे. निधी उपलब्ध असूनही लाभार्थ्यांची संख्या कमी राहणे, जामीनदाराची अट, प्रलंबित कर्जप्रकरणे आणि अपुरे मनुष्यबळ यावर तातडीने उपाय झाले पाहिजेत. थेट कर्जमर्यादा वाढवून शासनाने कर्जाला हमी द्यावी. महामंडळाचे भागभांडवल वाढवावे आणि समाजातील सक्षम व्यक्तीला नेतृत्वाची संधी द्यावी. आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन होणारे धर्मपरिवर्तन रोखण्यासाठी समाजाला सक्षम करणे, तसेच हिंदू वडार समाजाची ओळख, परंपरा आणि अस्मिता जपणेही तितकेच आवश्यक आहे. - गोविंदा कस्तुरी यल्लाप्पा गुंजाळकर, प्रदेश उपाध्यक्ष, विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद, अखिल भारतीय

सूचनांवर सकारात्मक पाठपुरावा

पहिलवान कै. मारुती चव्हाण वडार यांच्या नावाने सुरू असलेले महामंडळ वडार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रभावीपणे कार्यरत राहावे, यासाठी समाजाकडून येणार्‍या सूचना आणि अपेक्षांचा शासनाकडे सकारात्मक पाठपुरावा सुरू आहे. महामंडळाच्या कामकाजात आवश्यक सुधारणा आणि समाजाच्या हिताच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. या सूचनांचा सकारात्मक विचार होऊन संबंधित बाबींवर अपेक्षित कार्यवाही लवकरच होईल, अशी आशा आहे. - प्रताप पवार, व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ

९९६७०२०३६४

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai