Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Movie Review: प्रेमात फसलेला 'डकैत'

Movie Review: प्रेमात फसलेला 'डकैत'

मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‌'धुरंधर : द रिव्हेंज‌'च्या तुफानी यशाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ निर्माण केलं. त्या लाटेत अनेक चित्रपट वाहून गेले. एप्रिल महिना तुलनेने शांत वाटत असतानाच, दि.

10 एप्रिलला ‌'डकैत : ए लव्ह स्टोरी‌'ने मोठ्या अपेक्षांसह एन्ट्री घेतली. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा साहजिकच उंचावलेल्या होत्या. अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता आदिवी सेश यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ॲक्शन, प्रेमकथेने भरलेला आहे. तसेच हा तेलुगू-हिंदी द्विभाषिक चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपट नेमका कसा आहे, हे जाणून घेऊया..

चित्रपटाची कथा 2021 मधील ‌'लॉकडाऊन‌'नंतरच्या उदास आणि अस्थिर काळात सुरू होते आणि हळूहळू 2005च्या भूतकाळात आपल्याला घेऊन जाते. हरिदास (आदिवी सेश) आणि सरस्वती (मृणाल ठाकूर) यांच्या नात्याभोवती ही गोष्ट गुंफलेली आहे. एक अशी प्रेमकथा जी सुरुवातीला निरागस आणि काहीशी उत्कट वाटते; पण पुढे जाऊन गुंतागुंतीच्या वळणांवर येते. सुरुवातीला एकमेकांच्या प्रेमात हरवलेली ही जोडी, काही अनपेक्षित घटनांमुळे वेगळी होते. सरस्वतीच्या एका निर्णयामुळे हरीचं आयुष्यच बदलतं आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागतो. सरस्वती हरीला धोका का देते... इथून पुढे कथा अधिक थरारक होते. हरी तुरुंगातून फरार होतो आणि एक मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीला लागतो. पण, हा दरोडा नेमका कशासाठी आहे? सरस्वती पुन्हा त्याच्या आयुष्यात येते का? आणि त्यांच्या नात्याचं पुढे काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात हळूहळू उलगडत जातात.

‌'कोरोना‌' काळाची पार्श्वभूमी या कथेला अधिक वास्तवदश बनविते. महामारीमुळे निर्माण झालेली असुरक्षितता, वैद्यकीय व्यवस्थेतील गोंधळ, ‌'ब्लॅक फंगस‌'सारख्या भीतिदायक आजारांची छाया आणि वाढलेले हॉस्पिटल खर्च या सगळ्यांचा परिणाम पात्रांच्या आयुष्यावर कसा होतो, हे चित्रपट प्रभावीपणे दाखवतो. प्रत्यक्ष स्थळांवर केलेलं चित्रीकरण दृश्यांना एक वेगळीच नैसर्गिकता आणि प्रामाणिकपणा प्रदान करते. हरी आणि सरस्वती यांच्यातील प्रेम-तिरस्काराच्या टोकांवर असलेलं नातं, त्यात ‌'ॲक्शन‌' आणि भावनिक संघर्ष हे सगळं मिळून चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो.

हा चित्रपट शनेल देव यांनी दिग्दर्शित केलेला आहे, तर लेखनसुद्धा शनेल आणि आदिवी सेश यांनी मिळून केलेलं आहे. जात, प्रेम, गुन्हेगारी आणि ‌'कोविड‌' काळातील निराशा अशा अनेक स्तरांवर उभा असलेला हा चित्रपट पूर्णपणे मनाला भिडत नाही. चित्रपटाच्या पूर्वार्धापासूनच पटकथा काहीशी विस्कळीत आणि भरकटलेली जाणवते. संवाद आणि महत्त्वाची दृश्ये अतिशय तोकडी असून, तितकीशी प्रभावी वाटत नाही. चित्रपटाच्या नावाप्रमाणे ‌'लव्हस्टोरी‌' ही शेवटापर्यंत अजिबातच जाणवत नाही.

चित्रपटात मृणाल ठाकूर, आदिवी सेशसह अतुल कुलकण, प्रकाश राज, जरीना वहाब, वैभव तत्त्ववादी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनयाच्या बाबतीत मृणाल ठाकूर ही चित्रपटाची भावनिक ताकद ठरते; तर आदिवीने साकारलेला हरी त्याची ॲक्शन, हे सगळंच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. कथा भरकटलेली असली, तरीही कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. अतुल कुलकण, प्रकाश राज आणि जरीना वहाब यांसारखे मातब्बर कलाकार चित्रपटात असताना त्यांच्या भूमिका मात्र फार सुंदररीत्या फुलवल्या नाहीत, याची खंत जाणवते. याशिवाय, तांत्रिक बाजूही मजबूत आहे. संगीतकार Bheems Ceciroleo यांची गाणी आणि पार्श्वसंगीत कथेला पूरक ठरतात. सिनेमॅटोग्राफी, प्रॉडक्शन डिझाईन आणि एडिटिंगही प्रभावी आहे.

एकंदरीत, ‌'डकैत : ए लव्हस्टोरी‌' हा सहजपणे आवडणारा किंवा नाकारता येणारा सिनेमा नाही. यात चांगले विचार, व्यक्तिरेखा आणि मांडणी आहे. मात्र, काही कमतरता राहिल्याने तो पूर्णपणे प्रभाव पाडण्यात थोडा कमी पडतो. तरीही, वेगळा अनुभव देणारा हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.

दिग्दर्शन : शनेल देव
लेखन : शनेल देव, आदिवी सेश
कलाकार : मृणाल ठाकूर, आदिवी सेश, प्रकाश राज, अनुराग कश्यप, अतुल कुलकण, वैभव तत्त्ववादी
रेटिंग - 3

- अपर्णा कड


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai