Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई ते सूबेदारगंज प्रवास आता 'अमृत'मय; लांब पल्ल्याचा प्रवास होणार अधिक आरामदायी

मुंबई ते सूबेदारगंज प्रवास आता 'अमृत'मय; लांब पल्ल्याचा प्रवास होणार अधिक आरामदायी

मुंबई : (Amrit Bharat Express) मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-सूबेदारगंज-एलटीटी विशेष रेल्वेसेवेचे 'अमृत भारत एक्सप्रेस'मध्ये श्रेणी सुधारणा करून नियमित सेवेत रूपांतर केले आहे.

वातानुकूलित नसलेल्या या गाडीमुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील प्रवाशांना परवडणाऱ्या दरात अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुविधायुक्त लांब पल्ल्याचा प्रवास उपलब्ध होणार आहे.(Amrit Bharat Express)

नवीन नियमित गाडी क्रमांक १४१२२/१४१२१ अंतर्गत ही साप्ताहिक सेवा चालविण्यात येणार आहे. एलटीटीहून गाडी क्रमांक १४१२२ शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ पासून रात्री १०.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता सूबेदारगंज येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १४१२१ गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ पासून सूबेदारगंजहून दुपारी १२.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.५० वाजता एलटीटीला पोहोचेल.(Amrit Bharat Express)

१७ स्थानकांवर थांबा

या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रागौल, भरुआ सुमेरपूर, गोविंदपुरी आणि फतेहपूर या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.(Amrit Bharat Express)

२२ डब्यांची गाडी

अमृत भारत एक्सप्रेसमध्ये एकूण २२ डबे असतील. यामध्ये ८ शयनयान, ११ सामान्य श्रेणी, १ पॅन्ट्री कार आणि २ लगेज-कम-दिव्यांगजन ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे. या गाडीमधून प्रत्येक फेरीत १,८०० हून अधिक प्रवाशांची वाहतूक होऊ शकणार आहे. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये सामान्य प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. 'पुश-पूल' तंत्रज्ञानामुळे गाडी सुरू करताना आणि ब्रेक लावताना होणारे झटके कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी होतो. शरीरशास्त्रानुसार डिझाइन केलेल्या आसन व बर्थ, प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाइल चार्जिंग पॉइंट, एलईडी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही आणि स्वयंचलित उद्घोषणा व प्रवासी माहिती प्रणाली यामुळे प्रवाशांच्या सोयीमध्ये वाढ होणार आहे.(Amrit Bharat Express)

डब्यांदरम्यान सुरक्षित हालचालीसाठी सील्ड वेस्टिब्युल्स, आधुनिक व्हॅक्यूम-इव्हॅक्युएशन प्रणाली, दुर्गंधी नियंत्रण व्यवस्था आणि दिव्यांग-स्नेही शौचालयेही उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने 'कवच' स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली, आग-प्रतिरोधक पडदे आणि एरोसोल आधारित अग्निशमन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या नव्या सेवेमुळे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या अमृत भारत गाड्यांची संख्या २० झाली आहे. यापैकी १४ गाड्या मध्य रेल्वेवरून सुटतात किंवा तेथेच शॉर्ट टर्मिनेट होतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी परवडणाऱ्या आणि आधुनिक रेल्वेसेवेचा विस्तार करण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे.(Amrit Bharat Express)

आरक्षण आणि प्रवासी माहिती

प्रवासी अद्ययावत वेळापत्रक आणि आरक्षणासाठी IRCTCच्या ऑनलाइन सुविधेचा वापर करू शकतात. अनारक्षित तिकिटांसाठी RailOne ॲपचा वापर करता येईल. गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती NTES ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या चौकशी प्रणालीवर उपलब्ध आहे. (Amrit Bharat Express)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai