Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निर्मल गिरीत विसावला...

निर्मल गिरीत विसावला...

निसर्गाची विशालता आणि मानवी जिद्दीचा संघर्ष जिथे टोकाला पोहोचतो, त्या उंच, बर्फाच्छादित शिखरांवर मृत्यू आणि यश यांच्यात एकाच श्वासाचे अंतर असते. एका बाजूला पाहिल्यास अथांग सौंदर्य आणि दुसर्‍या बाजूला क्षणात घात करणारा निसर्गाचा कोप; अशा अत्यंत धोकादायक वातावरणातही ज्यांनी आपल्या जिद्दीने आणि धैर्याने इतिहास घडवला, ते जगातील अलौकिक आणि जागतिक कीर्तीचे गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांच्या निधनाची वार्ता निश्चितच संपूर्ण जगभरातील गिर्यारोहणप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ठरली.

काराकोरम पर्वतरांगेतील ८ हजार, ०५१ मीटर उंच असणार्‍या आणि जगातील सर्वांत आव्हानात्मक मानल्या जाणार्‍या 'ब्रॉड पीक'वर आलेल्या प्रचंड हिमस्खलनाने एका महान योद्ध्याची जीवनयात्रा अचानक थांबवली. ज्या पर्वतांना त्यांनी आपले घर मानले, ज्या शिखरांवर त्यांनी विजयाची पताका फडकवली, त्याच पर्वतांच्या कुशीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

निर्मल पुर्जा यांची ही जीवनगाथा केवळ गिर्यारोहणापुरती मर्यादित नव्हती; ती एका जिद्दीची, देशभक्तीची आणि पराक्रमाची गाथा होती. व्यावसायिक गिर्यारोहक होण्यापूर्वी त्यांनी तब्बल १६ वर्षे ब्रिटिश सैन्यात सेवा बजावली. प्रथम 'ब्रिगेड ऑफ गुरखाज' आणि त्यानंतर 'ब्रिटिश रॉयल नेव्ही'च्या अतिशय कठीण मानल्या जाणार्‍या 'स्पेशल बोट सर्व्हिस'मध्ये त्यांनी बजावलेली कामगिरी त्यांच्या अफाट शारीरिक आणि मानसिक क्षमतेची साक्ष देते. २०१८ मध्ये त्यांच्या या उल्लेखनीय लष्करी सेवेसाठी ब्रिटनच्या राजाकडून त्यांना 'मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला होता. २०१२ मधील 'एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक'ने त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. बर्फाच्छादित पर्वतांच्या शांततेत आणि कठीण वाटांवर त्यांना आपल्या आयुष्याचे ध्येय सापडले. त्यांनी सैन्यातील सुरक्षित भविष्य बाजूला सारून पर्वतांच्या कठीण आणि अनिश्चित प्रवासाची निवड केली.

गिर्यारोहणाच्या इतिहासात आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची १४ शिखरे सर करणे, हे कोणत्याही गिर्यारोहकाचे स्वप्न असते. यापूर्वी, दक्षिण कोरियाच्या किम चांग-हो यांनी हा विक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षे लावली होती. पण, निर्मल पुर्जा यांनी 'प्रोजेट पॉसिबल'अंतर्गत अवघ्या सहा महिने आणि सहा दिवसांत जगातील सर्व १४ अतिउंच शिखरे सर करून संपूर्ण जगाला अचंबित केले. त्यांच्या या विक्रमी प्रवासावर बनलेली 'नेटफ्लिस'वरील '१४ पिस : नथिंग इज इम्पॉसिबल' ही माहितीपट मालिका फक्त त्यांच्या कामगिरीचे प्रदर्शन नव्हती; तर माणूस मनाने ठरवेल, तर कोणतीही गोष्ट अशय नाही, हे जगाला सांगणारा एक जिवंत संदेश होती.

हिमस्खलनाच्या कठीण आणि दुर्दैवी अपघातात यापूर्वीही अनेक नामांकित, जागतिक कीर्तीच्या आणि अनुभवी गिर्यारोहकांनी आपले प्राण गमावले आहेत. भारताची तरुण महिला गिर्यारोहक सविता कंसवाल हिचा २०२२ मध्ये उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील 'द्रौपदी का डांडा-२' शिखरावर आलेल्या भीषण हिमस्खलनात मृत्यू झाला होता. अमेरिकेचे अ‍ॅलेस लोवे जे १९९९ मध्ये तिबेटमधील ८ हजार, ०१३ मीटर उंच असणार्‍या 'शिषापांगमा' शिखरावर हिमस्खलनात सापडले. तब्बल १६ वर्षांनंतर २०१६ मध्ये त्यांचा आणि त्यांच्या सहकार्‍याचा देह बर्फात सापडला होता. 'द स्विस मशीन' म्हणून जगभरात प्रसिद्ध असणारे स्वित्झर्लंडचे उली स्टेक यांचादेखील २०१७ मध्ये 'एव्हरेस्ट-ल्होत्से' मोहिमेच्या तयारीदरम्यान 'नुप्त्से' शिखरावर सराव करताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

कुठलेही गिर्यारोहक जेव्हा अशा मोहिमांवर निघतात, तेव्हा त्यांना ठाऊक असते की, प्रत्येक पाऊल हे शेवटचे ठरू शकते. तरीही, अथांग आकाशाला स्पर्श करण्याची आस, पर्वतांचे गूढ सौंदर्य आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची जिद्द त्यांना वारंवार त्या बर्फाळ वाटांवर घेऊन जाते. निर्मल पुर्जा यांच्या 'निम्सदाई फाऊंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी केवळ शिखरे सर केली नाहीत, तर स्थानिक नेपाळी शेरपांना जगभरात ओळख मिळवून दिली आणि पर्वतीय पर्यावरणाच्या रक्षणासाठी मोठे कार्य केले. आज पुर्जा आपल्यात नसले, तरी त्यांनी प्रस्थापित केलेले जागतिक विक्रम, त्यांचा संघर्ष आणि त्यांची 'नथिंग इज इम्पॉसिबल' ही विचारसरणी येणार्‍या अनेक पिढ्यांना, गिर्यारोहकांना आणि कठीण प्रसंगात लढणार्‍या प्रत्येक माणसाला प्रेरणा देत राहील!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai