Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळून भीषण अपघात! १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळून भीषण अपघात! १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

नाजका: (Peru Tourist Plane Crash) दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ऐतिहासिक आणि पुरातत्व स्थळ 'नाजका लाईन्स' पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारे एक लहान विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शनिवारी इका / पिस्को विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि हे विमान वाळवंटी भागातील कोरड्या शेतात कोसळले. (Peru Tourist Plane Crash)

'एरोडियाना' कंपनीचे सेसना विमान कोसळले

अपघातग्रस्त विमान पेरूतील 'एरोडियाना' या खाजगी विमान कंपनीचे होते. ही कंपनी गेल्या १४ वर्षांपासून 'सेसना ग्रँड कॅराव्हॅन' विमानांचा वापर करून पर्यटकांना हवेतून नाजका लाईन्स दाखवण्याची सफारी आयोजित करते. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंनुसार, अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर धूर निघत होता आणि विमानाचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पेरूच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. (Peru Tourist Plane Crash)

खराब हवामान अन् कमी दृश्यमानता

अपघाताच्या आधीच्या दिवशी या भागात हवामान अत्यंत खराब होते. ताशी ४० किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती. खराब हवामानामुळे जवळच्या मारिया रिचे विमानतळावरील हवाई उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली होती, तर काही विमाने मार्कोना विमानतळाकडे वळवण्यात आली होती. या प्रतिकूल हवामानाचा अपघाताशी संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Peru Tourist Plane Crash)


काय आहे 'नाजका लाईन्स'चे वैशिष्ट्य?

नाजका लाईन्स हे पेरूतील एक जगप्रसिद्ध पुरातत्व स्थळ आहे. शेकडो वर्षांपूर्वी स्थानिक लोकांनी वाळवंटातील जमिनीवर प्राण्यांच्या आणि विविध भौमितिक आकृत्यांच्या भव्य रेषा कोरल्या आहेत. या विशाल आकृत्या केवळ विमानातून किंवा उंच मनोऱ्यावरूनच स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे दरवर्षी १ लाखांहून अधिक पर्यटक लहान विमानांमधून ही विहंगम दृश्ये पाहण्यासाठी येतात. (Peru Tourist Plane Crash)



Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai