Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचीही न्यायव्यवस्थेने दखल घ्यावी;सीजेपी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच बोलले जखमी पोलिसांचे कुटुंबीय

पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचीही न्यायव्यवस्थेने दखल घ्यावी;सीजेपी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच बोलले जखमी पोलिसांचे कुटुंबीय

मुंबई : (CJP Movement) दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि 'संसद चलो' मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी प्रथमच सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडली.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत जखमी पोलिसांच्या नातेवाईकांनी त्या दिवसाच्या घटनांची आठवण सांगत आपली वेदना व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की, आंदोलनानंतर केवळ एका बाजूचीच कथा समोर आली, मात्र कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. पोलिसांच्या हक्कांबाबत आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांबाबत संसद आणि न्यायव्यवस्थेनेही गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. (CJP Movement)

पत्रकार परिषदेदरम्यान अनेक कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. एका जखमी पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने सांगितले, त्या दिवशी ड्युटी संपवून वडील जेव्हा घरी आले तेव्हा त्यांची खाकी वर्दी पूर्णपणे रक्ताने माखलेली होती. त्यांच्या डोक्यावर आणि हातांवर गंभीर जखमा होत्या. दिल्ली पोलिसांतील एका एसीपींच्या पत्नी अवनीत कौर यांनी त्या रात्रीचा प्रसंग सांगताना म्हटले, २० जुलैच्या रात्री माझे पती जखमी अवस्थेत घरी आले. त्यांची अवस्था पाहून माझा थरकाप उडाला. माझ्यासाठी आणि आमच्या दोन वर्षांच्या मुलीसाठी तो अत्यंत वेदनादायी आणि मानसिक धक्का देणारा क्षण होता. माझी चिमुकली मुलगी आपल्या वडिलांना त्या अवस्थेत पाहून घाबरून गेली होती. पुढे त्या म्हणाल्या, लोक हे विसरतात की पोलिस अधिकारी म्हणजे केवळ गणवेशातील व्यक्ती नसतो. त्यामागे त्याची पत्नी, लहान मुले, वृद्ध आई-वडील असे संपूर्ण कुटुंब असते, जे प्रत्येक क्षणी त्याच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत असते. (CJP Movement)

जखमी पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलीने सांगितले की, पोलीस दलात दाखल होण्यापूर्वी तिचे वडील भारतीय नौदलात मरीन कमांडो म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी १५ वर्षे देशसेवा केली होती. ती म्हणाली, त्या दिवशी माझे वडील बॅरिकेड्सवर तैनात होते. ते नेहमी सांगायचे की हे आता केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेले नाही, तर त्यात काही समाजविघातक घटक घुसले आहेत. प्रदर्शनादरम्यान जमावाने माझ्या वडिलांना जबरदस्तीने ओढून नेले आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना जवळपास ठारच मारण्यात आले होते. हल्ल्यानंतर ते चार तासांहून अधिक काळ घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत पडून होते. नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवून घरी आणले. त्यावेळी त्यांची संपूर्ण वर्दी रक्ताने माखलेली होती. एका बाजूला माझे वडील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते, तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर त्यांनाच गुन्हेगार आणि खलनायक म्हणून दाखवले जात होते. हे पाहून मला मोठा धक्का बसला.' (CJP Movement)

पत्रकार परिषदेत उपस्थित कुटुंबीयांनी सांगितले की, 'संसद चलो' मोर्चादरम्यान १४८ हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. काही जखमी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. कुटुंबीयांनी शेवटी असे नमूद केले की, कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेदना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हक्कांवरही तितक्याच गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक पोलीस गणवेशामागे त्याच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहणारे एक कुटुंब उभे असते. (CJP Movement)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai