Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुनश्च 'ओरायन'

पुनश्च 'ओरायन'

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली प्रदीर्घ खगोलशास्त्रीय संशोधनाच्या आधारे 'ओरायन' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला होता. विशेष म्हणजे, आज 'आर्टेमिस' मोहिमेअंतर्गत अमेरिकी अंतराळयानाचे नामकरण 'ओरायन' असे केल्यामुळे टिळकांच्या खगोलविषयक संशोधनाची पुन्हा आठवण होते.

तेव्हा आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या कार्याला अप्रत्यक्षपणे वाहिलेला मानवंदनेचा हा गौरवशाली क्षण असल्याचे म्हणता येईल.

सर्वज्ञानी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात मनापासून काम करते, तेव्हा उत्कृष्ट फलप्राप्तीच होते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक! चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या लोकमान्य टिळकांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग, व्यापार, अर्थकारण, शेती, धर्मशास्त्र, इतिहास, ज्योतिर्गणित आणि 'वेद' अशा अनेक विषयांवर विपुल लेखन व अभ्यासपूर्ण भाषणे केली. आयुष्यभर 'कर्मयोग' साधत असताना त्यांनी 'ज्ञानयोग' सोडला नाही. कर्मयोगातून सवड मिळताच ते ज्ञानयोगाकडे आपसूकच वळायचे, याचीच प्रचिती म्हणजे त्यांनी लिहिलेला महान ग्रंथ अर्थात, - ''The Orion or Researches into The Antiquity of the Vedas '. या ग्रंथातून त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेविषयी आदरयुक्त कुतूहल वाटल्यावाचून राहात नाही.

लोकमान्य टिळकांना खगोलशास्त्र व पंचांग संशोधनकार्याविषयी आवड व तळमळ होती. खगोलशास्त्राचा उपयोग त्यांनी वेदांचा कालखंड निश्चित करण्यासाठी केला. वैदिक संदर्भ गोळा करून आणि त्याचे सूक्ष्म अध्ययन करून लोकमान्य टिळकांनी वेद केव्हा रचले गेले असतील, याची कल्पना मांडली होती. १८८९ साली 'गीते'च्या 'विभूती विस्तार' या दहाव्या अध्यायातील श्लोक क्रमांक ३५ 'मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकर:॥' अर्थात, 'महिन्यांतला मार्गशीर्ष महिना मी' हे वचन वाचून त्यांच्या मनात कुतूहल जागृत झाले. लोकमान्य टिळकांनी आपल्या संशोधनाला सुरुवात करण्याअगोदर सुमारे १०० वर्षे युरोपियन पंडितांनी वैदिक वाङ्मयावर केलेले संशोधन समजून-समजावून घेतले. 'ओरायन' हा शब्द आज ग्रीक समजला जात असला, तरी जेव्हा ग्रीक आणि वैदिक आर्य एकत्र राहायचे, तेव्हा तो 'आग्रयण' या शब्दापासून जन्मास आला असला पाहिजे, असे लोकमान्य टिळकांना वाटत असे. वेदांमधील अगणित संदर्भ सूचक व खगोलशास्त्रीय खुणांचा काळजीपूर्वक अभ्यास त्यांनी केला. नक्षत्रांपैकी 'मृगशीर्ष' या नावाची व्युपत्ती व अर्थ व 'मृगशीर्ष'चे दुसरे नाव 'आग्रहायणी' यावर रचलेल्या कथा, ग्रीक पुराणातील 'ओरायन' वरील कथा व त्याचा 'आग्रहायणी' कथांशी असलेले साम्य वगैरे गोष्टींचा त्यांनी विचार केला आहे. 'ओरायन' संशोधनाच्या वेळी लोकमान्य टिळकांना असे वाटू लागले की, केवळ भाषाविषयक पुराव्यांच्या आधारे 'ऋग्वेदा'चा रचनाकाल ठरवणे बरोबर नाही. ऋग्वेदात आढळणार्‍या खगोलशास्त्रविषयक उल्लेखांची सांगड लावून, त्याद्वारे ऋग्वेदाचा काळ ठरवणे जास्त अचूक ठरेल, असे मानून टिळकांनी त्या दिशेने संशोधन सुरू केले. आपल्या प्रमेयांना आधार मिळावा म्हणून आपले बुद्धिसामर्थ्य पणास लावले. त्यासाठी 'संहिता', 'उपनिषदे', 'आश्वलायन', आपस्तंबादी, 'श्रौत-गुह्य' सूत्रे, 'स्मृती', दर्शनांपैकी 'पूर्वमिमान्सा' सूत्रे, त्यावरील भाष्य व टीका, संस्कृत अमरकोश, पाणिनीचे व्याकरण एवढेच नव्हे; तर वैदिक ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास केला.

त्यांच्या संशोधक स्वभावाप्रमाणे तीन वर्षे अखंड अध्यास करून 'The Orion or Researches into The Antiquity of the Vedas' या नावाचा प्रबंध त्यांनी लिहिला. उपरोक्त सार्‍या पुराव्यांवरून, तसेच अयनचलनावरून लोकमान्यांनी ऋग्वेदरचनेचा अंतिम काल इ. स. पूर्वी साडेचार हजार वर्षे ठरविला असून, स्वतः अवलंबिलेली 'ज्योतिर्गणितीय' पद्धती ही 'कधी न चुकणार्‍या, तसेच कधीही बंद न पडणार्‍या सृष्टीच्या घड्याळावर आधारित आहे' असे ते आत्मविश्वासाने म्हणतात. हा सिद्धान्त मांडतांना त्यांनी ज्योतिष, भूगर्भ, भाषा, खगोलशास्त्रातील इतके बिनतोड पुरावे पुढे मांडले की, युरोपीय अभ्यासकांना तो मान्य करण्यावाचून गत्यंतरच उरले नाही. १८९१ साली त्यांनी पुण्यास यावर दोन व्याख्याने दिली. १८९२ मध्ये तो प्रबंध लंडनला भरणार्‍या 'प्राच्यविद्या परिषदे'च्या नवव्या अधिवेशनामध्ये वाचला जाण्याकरिता त्यांनी पाठवला. वास्तविक, तो परिषदेच्या अहवालात संपूर्ण छापला जायचा. परंतु, तसे करण्याच्या दृष्टीने तो फार मोठा वाटल्यावरून परिषदेच्या व्यवस्थापकांनी त्याचा सारांश अहवालात प्रसिद्ध केला. परंतु, तो निबंध पुस्तकरूपाने संपूर्णपणे विद्वानांसमोर जावा, अशी टिळकांची मनीषा असल्याने त्यांनी हा प्रबंध १८९३ साली ग्रंथरूपात छापून प्रसिद्ध केला. प्रस्तावनेखाली ऑटोबर महिना नमूद आहे. दुसरी आवृत्ती काढण्याची वेळ येईल, तेव्हा त्यामध्ये फेरफार व दुरुस्त्या कराव्या, असे त्यांच्या मनात होते. परंतु, १८९३ नंतर या कामात डोके घालायला त्यांना मंडालेच्या तुरुंगात जाईपर्यंत १५-१६ वर्षे सवडच झाली नाही. तेथे 'गीतारहस्य' लिहून झाल्यावर उरलेल्या तीन वर्षांत जे लेखनकार्य त्यांनी मनावर घेतले, त्यात प्रस्तुत पुस्तकाच्या पुनर्लेखनाचा उल्लेख त्यांनी मंडालेहून लिहिलेल्या पत्रात आहे. वैदिक कालगणना (वैदिक क्रॉनोलॉजी) यावर त्यांनी तेथे लिहिलेली दोन प्रकरणे याच संदर्भातली आहेत. पण, त्या प्रकरणांपुढे त्यांची लेखणी गेली नाही. तर्कावर न विसंबत, वेद आणि वैदिक वाङ्मयाबरोबर नक्षत्रांच्या खगोलशास्त्रीय ज्ञानातून जे निष्पन्न झाले, तेच लोकांपुढे साधार मांडण्याचा 'ओरायन' या प्रबंधातून त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. 'ओरायन' हे पुस्तक पाहावे तर लहान आकाराच्या जेमतेम अडीचशे पानांचे. परंतु, त्याकरिता त्यांना इतर ग्रंथांची अंदाजे कमीत कमी २५ हजार पाने तरी चाळावी किंवा अभ्यासावी लागली, असे निःशंकपणे म्हणता येते. हा सिद्धान्त मांडतांना त्यांनी ज्योतिष, भूगर्भ, भाषा इत्यादी शास्त्रांतले इतके बिनतोड पुरावे पुढे मांडले की, युरोपीय अभ्यासकांना तो मान्य करण्यावाचून गत्यंतरच उरले नाही आणि तसा तो मान्य झाल्याचे भारतीयांना कळू लागले, तसतशी त्यांची मरगळलेली अस्मिता पुन्हा प्रफुल्लित होऊ लागली. अस्मितेचे हे तेज हाच राष्ट्रनिष्ठेचा मूलाधार होय.

लोकमान्य टिळक 'मासानां मार्गशीर्षोऽहम्' या वचनाला धरून साडेचार हजार वर्षांपर्यंत ख्रिस्तजन्मामागे गेले. तसे करताना २०-२२ हजार वर्षे मागे जाण्याची शयता असूनही प्राचीनत्वाच्या अवास्तव अभिमानास बळी न पडता साडेचार हजार वर्षांवर ते थांबले, यावरून त्यांचा संयमही ध्यानात येतो. लोकमान्य टिळकांच्या या संशोधनामुळे 'वेद' वाङ्मयावरील सर्व ग्रंथ आता नव्या दृष्टिकोनातून पाहणे विद्यावानांना क्रमप्राप्त झाले. लोकमान्य टिळकांनी 'ओरायन' ग्रंथामधून मांडलेले सिद्धान्त आज सर्वमान्य असतील-नसतील; पण त्यांनी केलेले संशोधन म्हणजे ज्ञानसाधनेच्या प्रदीर्घ प्रवासातील मैलाचे दगड नक्कीच आहेत आणि हेच खर्‍या ज्ञानोपासकाचे मोठे यश आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील विद्वद्दल डॉ. ब्लूमफील्ड यांनी एका वार्षिकोत्सवाच्या प्रसंगी भाषण करताना 'ओरायन' ग्रंथाबद्दल पुढील आशयाचा अभिप्राय व्यक्त केला- "सुमारे दोन-अडीच महिन्यांपूर्वी मजकडे हिंदुस्थानांतून एक छोटेखानी पुस्तक संपादकांकडून सप्रेम भेट म्हणून आले. ग्रंथकर्त्याचे नांव बाळ गंगाधर टिळक, लॉ-लेचरर व वकील पुणे. हे नाव मी पूर्वी कधीच ऐकले नव्हते. पुस्तकाचा आकार छोटा, बांधणी गचाळ व छपाई सदोष असून, ते राधाबाई आत्माराम सगुण कंपनी, मुंबई यांनी छापिले आहे. 'ओरायन' अथवा 'वेदकालाच्या प्राचीनत्वाविषयी शोध' असे निबंधाचे नाव आहे. ग्रंथकार सर्वस्वी अप्रसिद्ध, पुस्तकाबद्दल कोणत्याहि कारणांने अनुकूल असा पूर्वग्रह माझे ठिकाणी असण्याचा संभवच नाहीं. अर्थातच, मी ते पुस्तक वामकुक्षीच्या वेळी पाहून जे इतर पुष्कळ भारूड विद्वानांकडे टपालाचे द्वारे जमते त्याप्रमाणेच याचीहि वासलात लावणार होतो. प्रस्तावना वाचली, तो त्यात लेखकाने बेधडक लिहिलेले आढळले की, ऋग्वेदाचा काळ कमीतकमी ख्रि. पू. ४००० पर्यंत नेला पाहिजे. ग्रंथकार पडला हिंदू, तेव्हा काल्पनिक गणना करण्यात कुशल असणारच असे म्हणून पुस्तक चाळून पाहू लागलो. मनातून खुळ्या धर्मभोळेपणाला हसत होतो. परंतु, इतयात सर्व रंग एकदम पालटत चालला. ते मनातले हसू जाऊन, मन जरासे बावचळू लागले. काहीसेच वाटू लागले. वेदवाङ्मय व त्यासंबंधी पाश्चिमात्यांनी लिहिलेले ग्रंथ यांची खडान्खडा माहिती ग्रंथकाराला आहे, असा पहिला जबर संस्कार मनावर उठला. अर्थातच ग्रंथ नुस्ता चाळून पाहण्याचे सोडून देऊन त्याचा मननपूर्वक अभ्यास केला. तो तो पूर्वीचा सर्व पूर्वग्रह व विरोध मावळू लागला व मी हळूहळू ग्रंथकाराच्या मतौघाबरोबर वाहू लागलो. त्या मतांची सत्यता मला पटली. चालू साली सदर ग्रंथ म्हणजे वाङ्मयांत मोठीच क्रांति घडवून आणणारा होय. टिळकांच्या या ग्रंथामुळे जो नवीन दृष्टिकोन उत्पन्न झाला आहे, त्याप्रमाणे सर्व प्राचीन इतिहासाची घडी आता बसविणे जरूर आहे.'

वर्तमानकाळात १३५ वर्षांनंतर 'ओरायन' पुनश्च चर्चेत आहे. चालू वर्षात बुधवार, दि. १ एप्रिल रोजी फ्लोरिडा येथून प्रक्षेपित झाल्यापासून आपल्या 'ओरियन' कॅप्सूलमधून प्रवास करणार्‍या अंतराळवीरांनी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून काही संदर्भ गोळा केले. 'नासा'च्या 'आर्टेमिस-२' मोहिमेतील चार अवकाशयात्रींनी या अभूतपूर्व प्रवासाचे अनुभव सांगतानाच वातावरणात 'फायरबॉल' (अग्निगोळा) म्हणून प्रवेश करण्याच्या तयारीबद्दल माहिती दिली. हा मोहिमेचा अत्यंत जोखमीचा टप्पा होता, जिथे वातावरणातील घर्षणामुळे 'ओरियन'च्या 'हीटशील्ड'ची खरी परीक्षा असेल. 'आर्टेमिस' ही ग्रीक पुराणकथांतील प्रकाशदेव 'अपोलो'ची बहीण. ग्रीक कथांत 'ऑलिम्पस' पर्वतावर वास्तव्य असलेले १२ मुख्य ऑलिम्पिअन्स पूजनीय मानले जातात. 'आर्टेमिस' ही त्यातील एक. चंद्राच्या आतापर्यंत कधीही जवळ न गेलेल्या पृष्ठभागास अनुभवणार्‍या अंतराळ मोहिमेस 'आर्टेमिस'चे नाव देऊन तेथील वैज्ञानिक समुदायाने आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले. या अवकाश मोहिमेतील सर्वांत कठीण, जीवघेणा टप्पा होता तो 'नासा'ची पृथ्वीवरील नियंत्रण केंद्रे आणि अन्य कोणत्याही संपर्क यंत्रणांपासून पूर्णपणे तुटलेपण अनुभवण्याचा! या जवळपास पाऊण तासात हे यान आणि त्यातील चार यात्रिक यांचे काय झाले, काय होणार आहे आणि तसे काही अघटित घडल्यास त्यांना शोधायचे तरी कसे आणि कोठे, याचे उत्तर कोणाहीकडे नव्हते. या मोहिमेमुळे चार अवकाशयात्रींना चंद्राची प्रभा दुसर्‍या बाजूने पाहावयास मिळाली.

सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी अंतराळवीरांनी पृथ्वीपासून साधारण २ लाख, ५२ हजार मैलांचे अंतर गाठून नवा विक्रम प्रस्थापित केला. पृथ्वीपासून इतया लांब अंतरावर कोणीही अद्याप जाऊ शकलेला नाही. 'आर्टेमिस'चा हा विक्रम! सर्व अंतराळवीरांनी शुक्रवारी दि. १० एप्रिलच्या सायंकाळी सॅन डिएगोच्या किनारपट्टीवर समुद्रात उतरून आपली दहा दिवसांची मोहीम पूर्ण केली. त्यांनी चंद्राच्या अंधार्‍या बाजूने प्रवास केला, याद्वारे ते इतिहासातील सर्वांत लांबवर प्रवास करणारे मानव ठरले आहेत.

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली परिश्रमपूर्वक खगोल संशोधनातून प्रकाशित केलेला 'ओरायन' हा ग्रंथ आणि वर्तमानात अमेरिकी अंतराळवीरांचे अंतरिक्ष निवासस्थानाचे नामकरण 'ओरायन' हा योगायोग म्हणजे, लोकमान्यांच्या खगोलविषयक संशोधनाला दिलेली अप्रत्यक्ष मानवंदनाच म्हणावी लागेल.

- शैलेंद्र रिसबूड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai