Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रक्तपेढ्यांच्या खासगीकरणावरून राजकारण तापले; अमित साटम यांचे आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

रक्तपेढ्यांच्या खासगीकरणावरून राजकारण तापले; अमित साटम यांचे आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

मुंबई : (Aaditya Thackeray) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रक्तपेढ्यांच्या कथित खासगीकरणावरून सुरू झालेला वाद आता राजकीय संघर्षात परिवर्तित झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या सुधार समितीवर मुंबईतील रक्तपेढ्या खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचा आरोप केल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे.

शनिवारी अमित साटम यांनी पालिका रुग्णालयांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या रक्तपेढ्यांची यादी जाहीर करत प्रश्न उपस्थित केला की, रक्तपेढ्या खासगी संस्थांकडे देण्याची सुरुवात स्वतः करणारेच आज जनतेला मिळणाऱ्या सुविधांचा विरोध करत आहेत. साटम म्हणाले की, जे लोक आज रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाला विरोध करत आहेत, त्यांनीच महानगरपालिकेत सत्तेत असताना रक्तपेढ्यांच्या संचालनासाठी पीपीपी धोरण स्वीकारले होते.

साटम यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, २०२१ मध्ये कूपर रुग्णालयातील रक्तपेढी देखील पीपीपी मॉडेलअंतर्गत एका खासगी संस्थेकडे सोपविण्यात आली होती. आता त्याच लोकांकडून या मुद्द्यावर विरोध केला जात असून जनतेमध्ये 'खोटे कथानक' पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांची ही 'दुटप्पी भूमिका' आणि 'ढोंगीपणा' असल्याचेही त्यांनी म्हटले.

साटम यांनी जाहीर केलेल्या यादीत गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा रुग्णालय आणि विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील रक्तपेढ्या पीपीपी तत्त्वावर कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, २६ मे रोजी सुधार समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पालिकेच्या रक्तपेढ्या स्वयंसेवी संस्थांकडे (एनजीओ) सोपविण्याचा प्रस्ताव आणल्याचा आरोप केला होता. त्यांच्या मते, आतापर्यंत या सेवा सार्वजनिक स्वरूपात आणि विनामूल्य उपलब्ध होत्या; मात्र प्रस्ताव अमलात आल्यास रक्ताशी संबंधित सेवांसाठी १,१०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते. 'मुंबईच्या रक्ताचे व्यावसायिकीकरण का केले जात आहे?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

याउलट, भाजपचे म्हणणे आहे की पीपीपी मॉडेल ही कोणतीही नवीन व्यवस्था नसून यापूर्वीही त्याचा वापर करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र झाले आहे.(Aaditya Thackeray)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai