Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रंगभूमीवरील 'अजयपर्व'...

रंगभूमीवरील 'अजयपर्व'...

रंगभूमीवर काम करण्याचे स्वप्न, ध्येयासक्ती आणि मेहनत; या त्रिसूत्रीच्या आधारे रसिकसेवा करणार्‍या अजय पाटील यांच्याविषयी...

रंगमंचावर पडदा वर जातो आणि एखादा माणूस दुसर्‍या माणसाचे आयुष्य जगायला सुरुवात करतो.

गंमत अशी की, प्रेक्षकाला तो अभिनय वाटतो; पण कलाकाराला मात्र त्याक्षणी ते जगणे अगदी खरे असते. नाटक संपते, टाळ्या थांबतात, रंगमंचावरचे दिवे मालवतात आणि कलाकार पुन्हा आपल्या नेहमीच्या आयुष्यात परततो. मात्र, प्रत्येक भूमिकेतून तो स्वतःमध्ये काहीतरी घेऊन जातो. कधी एखाद्या व्यक्तिरेखेचा स्वभाव, कधी एखादे वाक्य, तर कधी स्वतःच्याच आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन. रंगभूमी ही अशी शाळा आहे की, इथे गुणपत्रिका नसते; पण प्रत्येक प्रयोगानंतर कलाकार थोडा अधिक शहाणा होतो आणि कधीकधी थोडा अधिक वेडादेखील! अशाच रंगभूमीच्या या वेडाने यशस्वी झालेला एक कलाकार म्हणजे अजय पाटील!

ठाण्यातल्या मध्यमवर्गीय घरात अजय यांचा जन्म झाला. वडील महानगरपालिकेत नोकरीला, आई गृहिणी. आदर्श बाल विद्यामंदिरातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभिनयाची आवड अजय यांना बालपणापासूनच होती. सद्गुरू वामनराव पै यांच्या 'जीवनविद्या मिशन'च्या सत्संगांमध्ये लहान मुलांना 'नाटुकली' सादर करण्याची संधी मिळते. अजय यांनीही त्यात भाग घेतला. त्यांच्या सादरीकरणाचे कौतुकही झाले. कौतुकाच्या चार टाळ्या कधीकधी माणसाला पुढच्या चार पायर्‍या चढण्याचे बळ देतात. या कौतुकाने अजय यांचा आत्मविश्वास वाढला. पुढे शाळेनेही त्यांना प्रोत्साहन दिले.

शाळेत असताना अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. शाळेच्या कॅम्पला नाट्य सादर करणे, हा अजय यांचा शिरस्ताच. इयत्ता आठवीत तर त्यांनी हुंडाबळीसारख्या गंभीर विषयाला, विनोदाची फोडणी देण्याचे शिवधनुष्यच उचलले. मित्रांकडूनच स्त्रीपात्र करून घेतले. संहिता लिहिली, दिग्दर्शन केले आणि मुख्य व्यक्तिरेखाही साकारली. म्हणजे नाटकाच्या बाबतीत 'हे तू कर, ते मी करतो' अशी विभागणी करण्याऐवजी, अजय यांनी जवळपास सगळा कारभारच स्वतः सांभाळला. त्यांची ही कलाकृती संपूर्ण शाळेत गाजली. त्यामुळे नाट्यकलेविषयीचा जिव्हाळा आणखीच वाढला. त्यामुळे अजय यांनी पुढे यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.

दहावीनंतर अभिनयासाठी मुंबईतील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा अजय यांचा विचार होता. पण, विज्ञान शाखेत प्रवेश घेत असल्याने अधिक प्रवास टाळण्याच्या हेतूने घरच्यांनी जवळच्या महाविद्यालयाचा सल्ला दिला. अजय यांनीही तो ऐकत, ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, बारावीनंतर विज्ञान शाखा सोडून त्यांनी कला शाखेची निवड केली.

ज्ञानसाधना महाविद्यालयाला एकांकिकांचा इतिहास तसा जुनाच. पण, अजय तिथे पोहोचले आणि त्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला. 'मिस्टर आणि मिसेस हप्ता' ही एकांकिका त्यांनी केली आणि तब्बल एका दशकानंतर ज्ञानसाधना महाविद्यालयाने 'आयएनटी'ची उपांत्य फेरी गाठली. एका यशानंतर दुसरे यश येते म्हणतात, तसेच झाले. ज्ञानसाधनामध्ये पुन्हा सुरू झालेल्या एकांकिकांच्या सत्रात अजय यांचा वाटा मोलाचा होता. त्यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाच्या जोरावर महाविद्यालयाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत यशही मिळवले.आजवर जवळपास ३२ एकांकिकांचे लेखन त्यांनी केले असून, जवळपास तेवढ्याच एकांकिकांमध्ये अभिनयही केला आहे. सकारात्मक भूमिका असो वा नकारात्मक, दोन्ही तितयाच ताकदीने साकारण्याची अजय यांची क्षमता आहे. त्यांच्या अभिनयावर शिबिरातील संस्कारांचा रंग नाही; तो अनुभवातून शहाणा झालेला आहे. त्यामुळे चुकांतून शिकण्याची सवय लागली आणि प्रयोग करण्याची भीतीही राहिली नाही.

मात्र, अजय यांच्या या प्रवासामागे घराच्यांचीही भूमिका मोठी आहे. इयत्ता सातवीतच पितृछत्र हरपले. त्यानंतर आईने कंबर कसली. सुरुवातीला अजय यांच्या निवडीला त्यांनीही भीतिपोटी विरोध केला होताच. पण, मुलाचे यश दिसू लागल्यावर तो मावळला. या प्रवासात आजवर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 'इप्ता' या हिंदी नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकाचा सन्मान त्यांना मिळाला. मराठी 'आयएनटी' स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिकही मिळाले. 'यूथ फेस्टिव्हल' आणि विद्यापीठीय स्पर्धांमध्येही अभिनय आणि दिग्दर्शनासाठी त्यांना बक्षिसे मिळाली.

रंगमंचावरच्या एकांकिकांपुरता अजय यांचा प्रवास थांबलेला नाही. वेबसीरिज आणि शॉर्ट फिल्म्सही ते करत आहेत. 'फुलपाखरू', 'तुझं माझं सपान' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. पडदा बदलला, माध्यम बदलले; पण रंगमंचाशी असलेली नाळ मात्र तुटली नाही. आजही ते व्यावसायिक रंगभूमीवर सक्रिय आहेत. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही गोष्टींवर अजय यांचे सारखेच प्रेम! त्यामुळे पुढच्या काळात या तिन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. प्रत्येकासाठी ठरवून वेळ द्यावा लागणार असल्याचे ते सांगतात. नटराजाची सेवा करत प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्याचा अजय पाटील यांचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहो, याच दै. 'मुंबई तरुण भारत'च्या शुभेच्छा!

- कौस्तुभ वीरकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai