Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
​संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राणी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; 'सूर्या'च्या मृत्यूने वाद पेटला

​संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राणी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; 'सूर्या'च्या मृत्यूने वाद पेटला

​मुंबई: (National Park) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंदिस्त वन्यप्राण्यांचे व्यवस्थापन, त्यांचे उपचार आणि देखभालीबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक आरोप प्राणीप्रेमी संस्थांनी केला आहे.

"सूर्या" नावाच्या बिबट्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे हा वाद अधिक चिघळला असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

​'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन', 'अम्मा केअर फाउंडेशन' आणि 'प्लांट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी' (पॉज-मुंबई) यांच्या संयुक्त टीमने यासंदर्भात वन विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संस्थांचे प्रतिनिधी सुनिष सुब्रमण्यन कुंजु यांनी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक यांना पत्र पाठवून यापूर्वीच्या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

​संस्थांनी वन विभागाकडे पाठवलेल्या पत्रात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.

​'सूर्या' बिबट्याच्या अचानक झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित पिंजऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने जतन करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या संवेदनशील प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कुटुंबीयांना अधिकृत माहिती का देण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित केला आहे.

व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी निकेत शिंदे यांच्या कार्यकाळातील प्रकरणांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यमुक्त करू नये. चौकशीपूर्वी बदली झाल्यास महत्त्वाचे दस्तऐवज आणि पुराव्यांमध्ये फेरफार होऊ शकतो, अशी भीती संस्थांनी व्यक्त केली आहे.

कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि अहवाल येईपर्यंत त्यांच्या कराराला मुदतवाढ देऊ नये, असे पत्रात नमूद आहे."वन्यप्राण्यांच्या आरोग्याशी आणि जीविताशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टरांचे जबाब नोंदवून चौकशी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवायला हवी," असे प्राणीप्रेमी संस्थांचे म्हणणे आहे.

​स्थानिक राष्ट्रीय उद्यान तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्याची मागणी करत, या पत्राच्या प्रती वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 'केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणा'कडे पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे आता वन विभाग या मुक्या प्राण्यांच्या हितासाठी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(National Park)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai