Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सावरकर आणि संघाचे सामाजिक हिंदुत्व : एक चिंतन...

सावरकर आणि संघाचे सामाजिक हिंदुत्व : एक चिंतन...

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही हिंदुत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक समरसतेच्या तत्वावर आधारित दिसतो. त्यादृष्टीने सावरकरांनी जातिभेदाच्या अंतासाठी, अस्पृश्यतेविरोधात केलेले कार्य हे सर्वस्वी दीपस्तंभ ठरावे.

रा. स्व. संघानेही सावरकरांची ही भूमिका अधिक व्यापकपणे स्वीकारली आणि समाजात राबविली. त्याअनुषंगाने चिंतन करणारा हा लेख...

जन्मजात जातिभेदांचे उच्चाटन म्हणजे, जन्मजात म्हणून केवळ गृहीत धरलेल्या उच्च-नीचतेचे उच्चाटन. - वि. दा. सावरकर.

भारतीय समाजात 'हिंदुत्व' हा शब्द उच्चारला की, अनेक अर्थ एकाच वेळी समोर येतात. काहींसाठी तो संस्कृतीचा प्रश्न असतो, काहींसाठी राष्ट्रभावनेचा, तर काहींसाठी तो राजकारणाशी जोडलेला विचार असतो. पण, या सगळ्या अर्थांच्या मागे एक मोठा सामाजिक संदर्भ दडलेला आहे. 'हिंदुत्व' ही केवळ धार्मिक ओळख नाही; ती समाजाला एकत्र आणण्याची कल्पना म्हणूनही मांडली गेली. या विचाराला आकार देणार्‍यांमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे स्थान विशेष मानले जाते. 'सामाजिक हिंदुत्व' म्हणजे हिंदू समाजातील जातिभेद, अस्पृश्यता, प्रांतीय आणि सामाजिक दुरावा कमी करून समाजात एकात्मता निर्माण करण्याची संकल्पना! या विचारात 'हिंदुत्व' केवळ धार्मिक ओळख म्हणून न पाहता, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा आधार मानले जाते.

सावरकरांनी हिंदुत्वाकडे धर्माच्या चौकटीतून पाहिले नाही. त्यांच्या मते, हिंदुत्व म्हणजे समान इतिहास, समान सांस्कृतिक स्मृती आणि राष्ट्रभावनेने जोडलेला समाज. त्यांना वाटत होते की, हिंदू समाज जर जातिभेद, अस्पृश्यता आणि परस्पर दुराव्याने विभागलेला राहिला; तर राष्ट्राची शक्ती कमी होईल. म्हणूनच, त्यांनी सामाजिक एकात्मतेला राष्ट्रनिर्मितीचा पाया मानले.

रत्नागिरीतील त्यांचे कार्य याचे महत्त्वाचे उदाहरण ठरते. पतितपावन मंदिर सर्व जातींसाठी खुले करणे, हा त्या काळातील धाडसी निर्णय होता. मंदिरप्रवेशाचा प्रश्न केवळ धार्मिक नव्हता, तर तो मानवी सन्मानाशी संबंधित होता. सावरकरांना समाजातील भिंती मोडून समानतेची भावना निर्माण करायची होती. सहभोजन, सामाजिक संवाद आणि जातिभेदाविरोधातील त्यांची भूमिका यामागेही हीच भावना होती.
सावरकरांचा दृष्टिकोन बुद्धिनिष्ठ आणि विज्ञानवादी होता. त्यांनी परंपरा आंधळेपणाने स्वीकारल्या नाहीत. विज्ञान, तर्क आणि आधुनिक विचारांवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व कर्मकांडांपेक्षा समाजसंघटन आणि राष्ट्रभावनेशी अधिक जोडलेले दिसते. त्यांच्या विचारात धर्मापेक्षा समाज आणि राष्ट्र यांना अधिक महत्त्व होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विचारांना वेगळ्या प्रकारे समाजात नेले. संघाची स्थापना झाली, तेव्हा देश गुलाम होता आणि समाजात विभागणी मोठ्या प्रमाणात होती. संघाने शाखा, शिस्त आणि सामूहिक कार्य यांच्या माध्यमातून समाजसंघटनावर भर दिला. संघासाठी 'हिंदुत्व' ही केवळ वैचारिक संकल्पना नव्हती; ती सामाजिक व्यवहाराची पद्धत होती.
संघाच्या कार्यात 'समरसता' या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. जाती, भाषा, प्रांत आणि आर्थिक स्तर यांच्या पलीकडे जाऊन समाजाला जोडण्याचा प्रयत्न संघ करत आला आहे. शाखांमध्ये एकत्र खेळणे, बसणे, प्रार्थना करणे, यांतून समानतेची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. 'शाखा' ही फक्त शारीरिक प्रशिक्षणाची जागा नसून, सामाजिक संवादाचे माध्यम मानली जाते.

सावरकर आणि संघ यांच्या विचारांतला सर्वांत महत्त्वाचा समान धागा म्हणजे, समाजाशी प्रत्यक्ष जोडलेले कार्य. सावरकरांनी हिंदुत्वाला केवळ भाषणांमध्ये मर्यादित ठेवले नाही; तर त्यांनी त्याला सामाजिक कृतीची दिशा दिली. संघानेही पुढे हीच दिशा अधिक व्यापक स्वरूपात स्वीकारली.
आज संघाशी संबंधित अनेक संस्था शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, वनवासी कल्याण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत काम करताना दिसतात. 'सेवा भारती', 'वनवासी कल्याण आश्रम' आणि 'विद्या भारती' यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. पूर, भूकंप किंवा महामारीसारख्या संकटांच्या काळात स्वयंसेवकांनी केलेले कार्य अनेकदा चर्चेत आले आहे.

या सेवाकार्यांकडे पाहताना सावरकरांच्या विचारांची आठवण होते. सावरकरांना वाटत होते की, समाजातील दुर्बल घटक मुख्य प्रवाहापासून दूर राहिले, तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकणार नाही. म्हणूनच, त्यांनी अस्पृश्यता आणि सामाजिक दुराव्याविरोधात काम केले. संघाच्या सेवा प्रकल्पांतही हीच भावना दिसते; समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची!

दोघांच्या विचारांत 'सेवा' ही दानधर्माची कृती नसून, सामाजिक कर्तव्य आहे, अशी भावना आढळते. सावरकरांसाठी समाजसुधारणा म्हणजे राष्ट्रनिर्मितीचा मार्ग होता; संघासाठी सेवाकार्य हे समाजसंघटनाचे साधन आहे. त्यामुळे 'राष्ट्रभक्ती' आणि 'समाजसेवा' या संकल्पना दोघांच्या विचारांत परस्परांशी जोडलेल्या दिसतात.

संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अस्पृश्यतेला समाजावरचा 'कलंक' म्हटले होते. पुढे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी, 'मंदिर, पाणवठे आणि स्मशानभूमी सर्वांसाठी खुले असावेत,' असे स्पष्टपणे सांगितले. या विधानांतून सामाजिक समरसतेचा आग्रह दिसतो. हाच विचार 1924 साली सावरकरांनी नाशिकमधील 'स्वातंत्र्य' या पत्राला मुलाखत देताना मांडला होता. या मुलाखतीत सावरकर म्हणतात, 'सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याची नि सार्वजनिक देवालयात जाऊन देवदर्शन घेण्याची अस्पृश्यांना अनुज्ञा असली पाहिजे. ही मागणी अत्यल्प नि न्याय्य आहे. या मागणीचा पाठपुरावा करणार्‍यांवर लोक आरंभी बहिष्कार टाकतील, त्याला तोंड दिले पाहिजे. त्या विरुद्ध सत्याग्रह केला पाहिजे. अशा आपापसातील वादात सत्याग्रह प्रभावी ठरेल. पण, वेळप्रसंग पडल्यास डोकी फोडून घेण्यासही सज्ज असले पाहिजे.'

संघशाखा आणि संघाशी संबंधित असलेल्या संस्थांमध्ये आपल्याला असे दिसते की, वर्षानुवर्षे एकत्र काम करणार्‍यांना एकमेकांची जात कोणती आहे, हे माहीत नसते. संघाचा हा संस्कार स्वयंसेवकांच्या जीवनावर नकळत झालेला असतो. त्याचा प्रत्यय स्वयंसेवकाच्या व्यवहारी जगातल्या वागणुकीतून येत असतो. हाच व्यवहार हिंदू समाजाकडून सावरकरांना अभिप्रेत होता, असे दिसते.

दि. 9 डिसेंबर 1930च्या 'द टाईम्स'च्या अंकात सावरकरांनी तरुणांना सांगितलेला संकल्प पुढील शब्दांत मांडला आहे- 'आजपासून जाती-जातीची उच्च-नीचता मी मानणार नाही. कोणत्याही जातीच्या हिंदूंबरोबर मी सहभोजन करीन. यापुढे मी कोणतीही जात न सांगता, स्वतःला केवळ हिंदूच म्हणवून घेईन.'

तथापि, सावरकर आणि संघ यांच्या विचारांत काही फरकही आहे. सावरकरांची मांडणी अधिक वैचारिक आणि राजकीय स्वरूपाची होती. ते विज्ञानवादी आणि बुद्धिनिष्ठ भूमिकेकडे झुकणारे होते. संघाची वाटचाल मात्र संघटनात्मक आणि सांस्कृतिक स्वरूपाची आहे. सावरकरांनी सिद्धांत मांडला; संघाने तो समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला, असे म्हणता येईल.

सावरकर एके ठिकाणी म्हणतात, 'युरोप चार शतकांपूर्वीपर्यंत धर्माच्या अपरिवर्तनीय सत्तेचा असाच दास झालेला होता आणि त्यापायी आपल्यासारख्याच दुर्गतीस पोचला होता. पण, त्याने 'बायबला'स दूर सारून विज्ञानाची कास धरताच, 'श्रुतिस्मृतिपुराणोक्ता'ची बेडी तोडून अद्यावतच बनताच, 'अप टु डेट' बनताच युरोप चारशे वर्षांत आपल्यापुढे चार हजार वर्षे निघून गेला! त्रिखंडी विजयी झाला! तसे आपल्या भारतीय राष्ट्रास होणे असेल, तर पुरातनी युगाचा ग्रंथ मिटून, ही प्राचीन 'श्रुतिस्मृतिपुराणादी' शास्त्रे गुंडाळून... विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. त्या ग्रंथांचा- काल काय झाले इतकेच सांगण्याचा अधिकार. आज काय योग्य आहे, हे सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम विज्ञानाचा!'
हाच विचार सरसंघचालक बाळासाहेब देवरस मांडताना म्हणतात, 'फंडामेंटलिस्ट तोच असू शकतो, जो कोणत्याही एका पुस्तकाला त्रिकालाबाधित सत्य समजतो, त्यातील एकेका अक्षराला जो प्रमाण मानतो, एकच प्रेषित मानतो व त्याने जे काही सांगितले असेल, ते सर्वकाळी उपयुक्त आहे, असे समजतो. आम्ही संस्कृतीची गोष्ट करतो, हे खरे आहे. परंतु, संस्कृती गतिशील असते, संस्कृती म्हणजे रीतिभातींचे किंवा विश्वासांचे साचलेले डबके नव्हे. संस्कृतीची गतिशीलता ही आमची मान्यता आहे. आम्ही कालोचित परिवर्तन स्वीकारणारे आहोत. आम्हाला आमच्या भूतकाळाचा अभिमान आहे. पण, आम्ही भूतकाळाकडे तोंड करून चालणारे नाही. ते अशक्य आहे. असंभवनीय आहे. जुन्या शाश्वत मूल्यांचा स्वीकार करीत, नव्याची चिकित्सा करीत आणि जुन्याशी त्याची सांगड घालीत हिंदू समाज आणि त्याची संस्कृती हजारो वर्षांपासून आजतागायत चालत आलेली आहे.'

आज समाजात विभागणी आणि अविश्वास वाढताना दिसतो, अशा वेळी सामाजिक एकात्मतेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. सावरकर आणि संघ यांच्या विचारांकडे पाहताना केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक संदर्भातून पाहण्याची गरज आहे. कारण, कोणतीही विचारसरणी शेवटी समाजाला जोडते की तोडते, यावरच तिचे खरे मूल्य ठरत असते.

- प्रणव पाटील
9850903004


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai