Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शाश्वत मानवी मुल्यांचा शाहिर

शाश्वत मानवी मुल्यांचा शाहिर

"आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे,' असे म्हणत ती मंगल कामना सत्यात उतरावी म्हणून आपले अख्खे आयुष्य साहित्यविचार आणि कार्याला समर्पित केलेले लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे!

आज त्यांच्या जयंतीनिमित्त दै. 'मुंबई तरुण भारत' 'युगप्रवर्तक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे' हा विशेषांक प्रकाशित करीत आहे. त्यानिमित्ताने...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार, कार्य आणि साहित्य म्हणजे जगभरातील तमाम शोषित, वंचित, पीडितांच्या दुःखाची कणव असणारे आणि त्याच वेळी अत्याचाराविरोधात आवाज उठवणारे आहे. मानवी मूल्यांचा उद्घोष करणारे त्यांचे साहित्य हे माणसाच्या माणुसकीचे प्रतिबिंब आहे. अण्णा भाऊंनी स्वतः म्हटले होते, "मी आकाशातील काल्पनिक पंखांनी उडू शकत नाही. मी जे सोसले, पाहिले, तेच लिहितो.' जे पाहिले, ते लिहिताना त्यांनी समाजातील समस्या, प्रश्न यांना शब्दातून जिवंत तर केलेच; पण त्याचबरोबर त्या समस्यांना भिडणार्‍या जनसामान्यातील स्त्री-पुरुषांच्या संघर्षाला आणि समन्वयाला त्यांनी अजरामर केले. त्यामुळेच 'फकिरा' किंवा 'वारणेचा वाघ' यांसारख्या कांदबर्‍यांमध्ये आणि इतरही त्यांच्या कादंबर्‍यांमधला नायक हा काही जन्मजात नेतृत्वाचे चिलखत घालून जन्मलेला नाही, तर वंचिततेच्या जगण्याचे चटके खाऊन, त्या चटक्यांतून तावून-सुलाखून निघून त्यावर मात करणारा नायक आहे. त्यांच्या साहित्यातील नायक आणि नायिका हे विषमतेवर आघात करतात; पण तो आघात करताना समाजावर आणि देशाच्या ऐक्यावर आघात करत नाहीत. त्यांच्या साहित्यात जातीयतेचा रंग नाही की, विद्वेषाची फुटीरता नाही. आहे ते केवळ माणसाने माणसासारखे जगावे आणि जगू द्यावे यासाठीची प्रेरणा!

स्वतःच्या साहित्याबद्दल अण्णा भाऊ साठे म्हणाले होते की, "ज्यांना जगाने दुय्यम ठरवलं, त्यांच्यासाठी माझं काव्य शस्त्र आहे. तसेच शब्दांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असते, फक्त ते शब्द शोषितांचे असावेत.' त्यांच्या या विधानाच्या कसोटीवर त्यांचे सहित्य बावनकशी सोने होऊन झळाळते. या पार्श्वभूमीवर अण्णा भाऊ साठे यांना जातीय विषमतेचे आणि दारिद्य्राचे चटके बसले नाहीत का? तर अर्थातच! तत्कालीन समाजव्यवस्थेचे वास्तव त्यांनीही भोगले. पण, म्हणून सगळी समाजव्यवस्थाच वाईट, देश आणि देशाची संस्कृतीच वाईट, देव-धर्म सगळे सगळे वाईट, असे त्यांच्या लिखाणात आणि विचारांतून कधीच व्यक्त झाले नाही. कारण, समाजव्यवस्था आणि समाजाचे सत्य त्यांना गवसले होते. ते म्हणजे समाजपुरुष हा काळानुरूप बदलतो. तो सगळ्यांना सोबत घेऊन जातो आणि ज्याच्या-त्याच्या गुणवत्तेनुसार संबंधितांना वागवतो. हे सगळे होत असताना समाजातील वाईट चालीरीती, प्रथा तोडायला हव्यात, समाज नाही. हीच संकल्पना त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत उमटते. यामुळेच तर, 'माझी मैना गावाकडं राहिली' किंवा 'मुंबईची लावणी'मध्येही त्यांनी व्यक्त केलेले भाव हे प्रवृत्तीवर आहेत, समाजद्वेषावर नाहीत. मानवाला केंद्रस्थानी ठेवून समाजाचे हित साधत, देशाचे ऐक्य राखण्यासाठी निर्माण झालेले अण्णा भाऊ साठेंचे साहित्य. इथे कोणत्याही भेदाला जागा नाही. सुंदर-कुरूप, सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद नाही. ज्या काळात साहित्यातील नायिका या केवळ सौंदर्यवती, शोभेच्या वस्तू किंवा मुळुमुळु रडणार्‍या, अत्याचार सहन करणार्‍या अशा स्वरूपात प्रतित केल्या जायच्या; त्याच काळातील अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री ही लखलखती विद्युल्लता आहे आणि ती अन्याय-अत्याचाराला जाळून टाकते. त्यांच्या साहित्यातील नायिका अत्याचाराविरोधात लढा उभारण्यासाठी कुणाचीही वाट बघत नाहीत, तर ती स्वतःच्या विचारांनी आणि निर्णयांनी तो लढा उभारते. त्यांच्या नायिका आणि नायकही स्वाभिमानी आणि समाज-संस्कृती अभिमानी आहेत. नीती, तत्त्व, शील जपणारे आहेत. पैशासाठी किंवा भाकरीसाठी अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायक-नायिका कधीही विकले गेले नाहीत; तर त्यांनी सत्य, न्यायाचा सूर्य मिळवण्यासाठी प्राणाचा आणि भौतिक सुखाचाही त्याग केलेला आहे.

हे जे आहे ना, ते अत्यंत मौल्यवान आहे. कारण, मला काहीच मिळाले नाही किंवा मला संधी मिळाली नाही म्हणून कुंठित होऊन उगीचच समाजात विद्वेष पसरवत, आकांडतांडव करणारे लोक आपण आजही पाहतो. पण, अण्णा भाऊ यांच्या विचार आणि कृतीमध्ये अशी कुंठितता, मत्सर आणि द्वेष जराही नाही. 'जग बदल घालुनी घाव मला सांगून गेले भीमराव' म्हणत असताना अण्णा भाऊ अधोरेखित करतात तो, 'माणसाने माणसाला साथ द्यावी,' हा मंत्र. त्यामुळेच तर बंगालमध्ये दुष्काळ पडला, तेव्हा हाहाकार माजला. ते दुःख पाहून अण्णा भाऊ साठेंमधला जाज्वल्य मानवी शाश्वत मूल्य जपणारा शाहीर म्हणतो, 'महाराष्ट्राच्या मर्दा, मदतीचा हात दे रे, बंगालच्या या दुःखाला, तू आपले मानून घे रे!' माणसाच्या कष्टावर, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असलेले अण्णा भाऊ त्यामुळेच तर कष्टकर्‍यांच्या गौरवार्थ म्हणतात की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकर्‍यांच्या तळहातावर तरलेली आहे.' श्रमिक, शोषित आणि अठरापगड जातींना प्रतिनिधित्व देत असतानाही त्यांचे साहित्य विचार आणि कार्य हे जाज्वल्य देशाभिमानाने भारावलेले होते. देशाच्या एकतेशी कसलीच तडजोड नाही, हा बाणा त्यांनी अखंड जपला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही या एकजुटीचा आणि भारतीयत्वाचा मंत्र-संकल्प त्यांनी जपला. पंजाबच्या पोवाड्यात त्याचे प्रतिबिंब जाणवते. ते म्हणतात -

अण्णा भाऊ सांगतो ऐका, हा खेळ थांबवा आता,

एकजुटीनेच वाचेल, आपली भारतमाता!

तर, समाज बांधवांनो! लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या विचारांतला हा भारतमातेला एकजुटीने वाचवण्याचा संकल्प आजही समाजासाठी, देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नेतृत्वाच्या, साहित्याच्या, कलेच्या प्रांतात त्यांच्यासारखा मनस्वी आणि थोर माणूस विरळाच! या युगप्रवर्तक महानायकाला जयंतीनिमित्त दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे विनम्र अभिवादन!

९५९४९६९६३८

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai