Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शून्यातून शिखराकडे...

शून्यातून शिखराकडे...

शिक्षणासाठी अफाट संघर्ष करत, बँकेत शिपाई ते थेट मुख्य कार्यकारी अधिकारी असा थक्क करणारा प्रवास करणार्‍या ठाण्याच्या सुरेश मोहन शिंदे यांच्याविषयी...

सुरेश यांचा जन्म दि. १३ मे १९७१ रोजी चेन्नई येथे झाला.

त्यांचे मूळ गाव सांगली. टिपू सुलतान यांना लढण्यासाठी सैन्याची गरज भासत असे. सुरेश हे क्षत्रिय असल्याने, त्यांचे आजोबा चेन्नई येथे स्थायिक झाले. त्यामुळे आजही त्यांचे घर चेन्नई येथेच आहे. त्यांचे नातेवाईकही चेन्नईतच वास्तव्याला आहेत. सुरेश यांचा जन्म चेन्नईत झाला असला, तरी त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईतच गेले. त्यांचे वडील मोहन हे नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, तर आई इंदिरा या गृहिणी होत्या. त्या गृहिणी असल्या तरी, कुटुंबांची जबाबदारी त्या नेटाने सांभाळत. सुरेश यांना दोन भावंडे.

घरात सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, अचानक सुरेश यांच्या आयुष्यात दुःखाची छाया पडली. वडील काम करत असलेल्या कंपनीतील युनियनने, १९७१ साली 'काम बंद आंदोलन' पुकारले. पुढे हा संघर्ष अधिकच वाढत गेला. त्या वाढत्या संघर्षाचे फलित कंपनी बंद पडण्यात झाले. नोकरीवर गदा आल्याने, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठाच प्रश्न सुरेश यांच्या वडिलांसमोर निर्माण झाला. सुरेश हे भावंडांमध्ये मोठे असल्याने, शिक्षण घेत घेत कुटुंबाला ते आर्थिक हातभारही लावत असत.

सुरेश यांचे शालेय शिक्षण के. जे. खिल्लानी हायस्कूल, माहीम येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण अंजुमान इस्लाम महाविद्यालयात झाले. सुरेश हे सातवी-आठवीत असल्यापासूनच छोटी-मोठी कामे करून, कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होते. पण, याकाळातही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. घरोघरी जाऊन वृत्तपत्र पोहोचवणे, दूध पोहोचविणे अशी कामे त्यांनी केली. शिवाय, प्रिंटिंग प्रेसमध्येही ते काम करत असत. हे काम करून, घरी पोहोचल्यावर ते पुन्हा महाविद्यालयातही जात. पण, यामुळे त्यांना सकाळी ७.३० वाजता महाविद्यालय गाठणे मुश्कील होत असे. त्यामुळेच त्यांचा पहिल्या तासिकेचा अभ्यास नेहमीच बुडे.

त्यांना जेमतेम दोनच तासिका महाविद्यालयात बसून, अभ्यास करता येई. १० वाजता मधली सुटी व्हायची आणि मग ते पुन्हा महाविद्यालयातून निघत. त्याकाळात त्यांनी 'प्रताप को. ऑ. बँके'त, शिपायाचेही काम केले.बँकेची वेळ सकाळी ११ ते ३ अशी असल्याने, त्यांना बँक उघडण्यासाठी वेळेवर पोहोचावे लागे. काम झाल्यावर सुरेश घरी येत. या सगळ्यातून जो काही वेळ मिळे, त्यात ते अभ्यास करत होते. पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी ४ वाजेपासून त्यांची, नियमित दिनचर्या सुरू होत होते. सुरेश काम करून शिक्षण घेत असतानाच, प्रताप बँकेत दोन वर्षे सेवा दिल्यावर त्यांना 'शिपाई' पदावर कायम करण्यात आले. याच काळात त्यांनी 'बी.कॉम.' पदवी संपादन केली. बँकेत काम करत असतानाच, त्यांनी कार्यालयीन कामकाजही शिकून घेतले.

एके दिवशी 'नेव्हल डॉकयार्ड बँके'तील नोकरीची जाहिरात त्यांनी वाचली. ही संधी साधण्याच्या हेतूने त्यांनी लगेचच अर्ज केला. त्यावेळी २५ ते ३० जण, जाहिरातीतील पदांच्या मुलाखतीसाठी आले होते. या मुलाखतीच्या तीन फेर्‍या झाल्या. तिसर्‍या फेरीच्या शेवटी तीनजणांची निवड बँकेकडून करण्यात आली. त्या तिघांमध्ये सुरेश यांचे नाव होते. पुढे सुरेश या बँकेत रूजू झाले.

'कोविड' काळात सुरेश यांनाही तीन ते चार महिने घरी राहावे लागले होते. त्यानंतर अभिनव बँकेची जाहिरात त्यांनी वाचली आणि ते मुलाखतीसाठी गेले. त्याठिकाणीही अनेकजण मुलाखतीसाठी आले होते. पण, बँकेचे संचालक आणि माजी आमदार रमेश पाटील यांनी, सुरेश यांची या पदासाठी निवड केली. ज्या दिवशी त्यांची निवड झाली, त्याच दिवशी रमेश पाटील यांनी सुरेश यांना पदाचा पदभार दिला आणि "बँकेत प्रामाणिकपणे काम करा आणि बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा,' असा मोलाचा सल्लाही दिला. त्यानुसारच सुरेश काम करत आहेत. सुरेश यांच्या कार्यामुळेच बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. आता बँकेने ६०० कोटी ठेवीचा टप्पा गाठला असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून बँकेची गणना केली जाते. सुरेश यांच्या कार्यकाळात, बँकेने 'उत्कृष्ट बँक' म्हणून दोनदा पुरस्कार मिळवला आहे. सुरेश सध्या 'अभिनव बँके'त 'मुख्य कार्यकारी अधिकारी' या पदावर कार्यरत आहेत.

सुरेश यांना क्रीडा, पर्यटन, संगीत, संगणक आणि वाचनाची आवड आहे. पण, शालेय जीवनात सुरेश यांना फारसे स्पर्धेत सहभागी होता आले नाही. त्यातूनही एकदा त्यांनी, गोळाफेक स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी दुसरा क्रमांकही पटकावला. सुरेश यांनी २००२ मध्ये डॉ. स्वाती यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना स्तवन आणि अर्पण अशी दोन मुले आहेत. स्तवन सध्या रशियात 'एमबीबीएस'चे तिसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत आहे, तर अर्पण 'सीएफए'चे शिक्षण घेत आहे. सुरेश यांना शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. सुरेश यांना त्यांच्या बँकेतील ठेवी, एक हजार कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे, तर बँकेतील ग्राहकांना डिजिटल सेवा मिळावी आणि बँकेच्या अनेक शाखा उघडाव्या, असाही सुरेश यांचा मानस आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून हार्दिक शुभेच्छा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai