पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानुसार, तामिळनाडूमधून सत्ताधारी द्रमुक, तर केरळम्मधून डाव्यांची सत्ता अक्षरश: भुईसपाट झाली. त्यानिमित्ताने या दोन्ही दक्षिणेकडील राज्यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे विश्लेषण करणारा हा लेख...
कालच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता, दक्षिणेकडील तामिळनाडू राज्याने प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या 'द्रविडी' राजकारणास तिलांजली दिली असून, तरुण अभिनेता जोसेफ विजय यांनी स्थापन केलेल्या 'तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) या पक्षाच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात मतदान केले. असे असले तरी 'टीव्हीके' पक्षाचे बहुमत अगदी थोडक्यात हुकले. पूर्ण बहुमत मिळाले नसले, तरी सर्वांत मोठा पक्ष म्हणून 'टीव्हीके' पक्ष सत्तेवर येण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. फक्त आपल्याला कमी पडणार्या जागा लहान पक्षांकडून घ्यायच्या की, मोठ्या पक्षाकडून याबाबत त्या पक्षाचा खल सुरू आहे. पण, अभिनेता विजय तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार, हे नक्की झाले आहे. केवळ औपचारिकताच बाकी आहे. 'टीव्हीके' पक्षाने सत्तेवर असलेल्या द्रमुकचा माज उतरविला, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही, तर शेजारच्या केरळम्मध्ये मतदारांनी डाव्यांची सत्ता उलथवून टाकली. देशात डाव्यांचा जो एकमेव गड राहिला होता, तोही या निवडणुकीत ढासळला. आता त्या राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येऊ घातले आहे. काँग्रेस नेते वेणुगोपाल मुख्यमंत्री होणार की, आणखी कोणी हे मात्र सर्वस्वी 'काँग्रेस हायकमांड'वर अवलंबून आहे.
तामिळनाडू या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा आढावा सर्वप्रथम घेऊ. या राज्यात दिवंगत मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांचे आघाडी सरकार सत्तेवर होते. देशात लोकशाही अस्तित्वात असली, तरी या राज्य सरकारचा कारभार एखाद्या हुकूमशहाप्रमाणे चालत होता. राज्यपालपद हे घटनादत्त पद असताना त्या पदाचा त्या सरकारकडून आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून अपमान करण्याचे प्रकार घडले. सनातन धर्माचा अपमान करण्यामध्ये तर या पक्षाच्या नेत्यांची चढाओढ लागत असल्याचे दिसून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विजयादशमीनिमित्त काढल्या जाणार्या संचलनांना मोडता घालण्यामध्ये हेच सरकार आघाडीवर असायचे. तामिळनाडूच्या अशा या माज चढलेल्या द्रमुक सरकारला झिडकारले, तसेच द्रमुक आघाडीच्या विरोधात लढत असलेल्या अण्णाद्रमुक आघाडीलाही मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले.
तामिळनाडूत आतापर्यंत एकतर द्रमुकचे किंवा अण्णाद्रमुकचे सरकार असायचे. अभिनेता जोसेफ विजय यांनी दोन वर्षांपूर्वी दि. २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी 'टीव्हीके'ची स्थापना केली. अवघ्या दोन वर्षांमध्ये त्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आणि आता तर हा पक्ष तामिळनाडूत सत्तेवर येणार आहे. तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागा असून, बहुमतासाठी ११८ जागा हव्या आहेत. अभिनेता विजय यांच्या पक्षास काही जागा कमी पडत असल्या, तरी हाच पक्ष सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तामिळनाडूत आपण पुन्हा सत्तेवर येणार, अशा मानसिकतेत असणार्या द्रमुक आघाडीने विजयाची तयारी करण्यासाठी पक्ष मुख्यालयासमोर मांडवाची उभारणी केली होती. पण, जसजसे कल समोर येऊ लागले, ते लक्षात घेऊन मांडव उतरविण्यात आला. मतमोजणीचा कल आणि कौल पाहून आपला पराभव होणार, हे त्या पक्षाच्या नेत्यांनी आधीच जाणले असावे! मतमोजणीचा कौल पाहता, 'टीव्हीके' नेता विजय यांच्या निवासस्थानी जल्लोष करण्यास प्रारंभ झाला. त्यात अभिनेता विजय याचे आई-वडीलही सहभागी झाले होते. आपल्याला एकहाती सत्ता मिळेल, असा विश्वास विजय यांना वाटत होता. पण, तसे मात्र घडले नाही.
"आम्हाला हा निकाल अपेक्षितच होता. राज्यामध्ये एक छुपी अशी 'विजय लाट' आहे, असे आम्हाला वाटत होते. तामिळनाडू राज्य बदलाची प्रतीक्षा करीत होते, असे या निकालावरून दिसून येत आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांवर लोक नाराज होते; तसेच ते या पक्षांना वैतागले होते,' असे 'टीव्हीके'चे नेते फेलिस गेराल्ड यांनी म्हटले आहे. आपला पक्ष द्रमुक किंवा अण्णाद्रमुक या पक्षांशी युती करणार नसल्याचे 'टीव्हीके'ने प्रचारादरम्यान स्पष्ट केले होते. 'द्रविडी' राजकारणापेक्षा वेगळे राजकारण करण्याचा मानस अभिनेते विजय यांनी बोलून दाखविला होता.विजय यांचा पक्ष काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा 'व्हीकेसी' पक्षांची मदत घेऊ शकतो. हे पक्ष सध्या द्रमुक आघाडीचे घटक आहेत किंवा 'पत्तली मक्कल कातची' (पीएमके) या पक्षाची मदत घेऊ शकतो. कोणाला जवळ करायचे, हे आता 'टीव्हीके'च्या हाती आहे. पाहूया पुढे काय होते ते!
तामिळनाडूच्या राजकारणात सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत किंवा कमल हसन यांना आपला प्रभाव पाडता आला नाही. पण, अभिनेता विजय यांनी हे करून दाखविले. एम. जी. रामचंद्रन यांच्यानंतर ४९ वर्षांनी एक अभिनेता तामिळनाडू राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. १९७७ साली 'एमजीआर' सत्तेवर आले आणि त्यांनी पुढील दहा वर्षे म्हणजे १९८७ पर्यंत सत्ता ताब्यात ठेवली होती. त्यानंतर आता एक अभिनेता तामिळनाडू राज्याचे राजशकट हाकणार आहे. या नेत्यास राजकारणाचा, प्रशासनाचा अनुभव नाही. चित्रपटात भूमिका करणे वेगळे आणि राजकारण करणे वेगळे, अशा प्रतिक्रिया आतापासूनच विरोधक व्यक्त करू लागले आहेत. अभिनेता विजय सत्ता कशी सांभाळतात, ते पुढील काळात दिसून येईलच! या निवडणुकीत अण्णाद्रमुक समवेत असलेल्या भाजपला आपला प्रभाव दाखविता आला नाही. तामिळनाडूमध्ये विविध हिंदू संघटना कार्य करीत असल्या आणि भाजपचेही काम त्या राज्यात असले, तरी तेथील राजकारणात मुसंडी मारण्यासाठी भाजपला आणखी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.
केरळम्चा काँग्रेसला कौल!
तामिळनाडूप्रमाणे केरळम् राज्याचे राजकारण हे आतापर्यंत डावी आघाडी किंवा काँग्रेसप्रणीत आघाडी यांच्याभोवती फिरत आले आहे. पण, अलीकडे भारतीय जनता पक्षाचा प्रभावही केरळम्च्या काही भागांत पडू लागला आहे. राजधानी तिरुवनंतपुरमच्या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला, हे त्याचेच द्योतक. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर हे नेमोम मतदारसंघातून विजयी झाले आहेत. असे असले तरी केरळम्मध्ये प्रामुख्याने डावी आघाडी आणि काँग्रेसप्रणीत आघाडी यांच्यातच ही निवडणूक झाली. या निवडणुकीत डाव्या आघाडीचा धुव्वा उडाला असून, काँग्रेसप्रणीत आघाडीला जनतेने आपला कौल दिला आहे. आता काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. डाव्या आघाडी सरकारविरुद्ध आणि त्या सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध जनतेने दिलेला हा स्पष्ट कौल आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे धर्माडोम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार व्ही. पी. अब्दुल रशीद यांचा पराभव करून विजयी झाले. केरळम् विधानसभेच्या १४० जागा असून, त्या राज्यात काँग्रेसप्रणीत आघाडी सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सदैव 'पाठराखण' करणारे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांचे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतले जात आहे. पण, 'हायकमांड' ठरवील तो मुख्यमंत्री, अशी त्या पक्षाची परंपरा राहिली आहे. पाहू कोण होते मुख्यमंत्री ते!
याआधी उल्लेख केल्याप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर हे विजयी झाले आहेत. याचप्रमाणे बी. बी. गोपकुमार हे चाथानूर मतदारसंघामधून आणि व्ही. मुरलीधरन हे काझाक्कुटम मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजपचे हे तीन विजय लक्षात घेता, त्या पक्षाचा पाया राज्यामध्ये विस्तारत आहे, हे लक्षात येते. या विजयाचे श्रेय पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजप सरकारचे सुशासन आणि विकासकेंद्रित राजकारण यास मतदारांनी पाठिंबा दिला असल्याचे या निकालावरून प्रतिबिंबित होते, असे राज्यातील भाजप नेत्यांनी म्हटले आहे. भाजपने विधानसभेच्या जिंकलेल्या तीन जागा म्हणजे केरळम् राज्याच्या राजकारणातील मैलाचा दगड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दोन प्रमुख आघाड्यांचे प्रभुत्व असलेल्या या राज्यात भाजपचा पाया विस्तारत चालला आहे, हे या निकालांवरून दिसून येत आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत केरळम् आणि तामिळनाडू राज्यातील मतदारांनी विद्यमान सरकारच्या विरोधात कौल दिला आहे. या दोन्ही राज्यांतील मतदारांच्या अपेक्षा ही सरकारे पूर्ण करतात का, ते आता पाहायचे!

