मुंबई : ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पात आज महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. 'नायक' या पहिल्या टनेल बोरिंग मशीननंतर प्रकल्पाचे कंत्राटदार मेघा इंजिनीअरींग यांनी दुसरे महाकाय यंत्र 'अर्जुन' (TBM Arjuna) कार्यान्वित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरस्थपणे (रिमोटद्वारे) बटण दाबून ठाणे बाजूच्या 'टीबीएम अर्जुन'चे काम सुरू केले.
हा 11.84 किमी लांबीचा प्रकल्पात 10.25 किमी दुहेरी बोगदा आणि 1.59 किमी जोडरस्त्यांचा समावेश आहे. यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडपासून बोरीवली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत थेट भूमिगत जोडणी मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी 60-90 मिनिटांवरून फक्त 15 मिनिटांवर येईल आणि 2029 पर्यंत दररोज सुमारे 80,000 वाहने या मार्गाने प्रवास करतील.
तांत्रिक वैशिष्ट्ये:
• भारतातील सर्वात मोठी हार्ड-रॉक टीबीएम: 13.34 मीटर व्यास, 86 मीटर लांबी, 2,500 टन वजन
• जर्मनीतील Herrenknecht कंपनीने MEIL साठी विशेषतः डिझाइन केलेले सिंगल-शील्ड, ओपन-टाईप टीबीएम
• कमाल खोली: 23 मीटर
'नायक' आणि 'अर्जुना' ही दोन्ही यंत्रे भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी सिंगल-शील्ड हार्ड-रॉक टीबीएम आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होऊन हवेतील व ध्वनी प्रदूषण घटेल आणि शाश्वत शहरी विकासाला मोठी गती मिळेल.

