Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
थरार की मृत्यूचा सापळा?

थरार की मृत्यूचा सापळा?

ल्पना करा... १३० फूट उंचावर तुम्ही आहात. खाली खोल दरी दिसतेय. हवेत एक साहसी झेप घेतलीत आणि अचानक लक्षात आले की, शरीराला सुरक्षा दोरी बांधलेलीच नाही! ही कोणत्याही हॉलीवूडपटातील अंगावर काटा आणणारी पटकथा नाही, तर ब्राझीलमध्ये २१ वर्षांच्या मारिया एडुआर्डासोबत घडलेली एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण वास्तव घटना.

शिक्षिका बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या एका निष्पाप तरुणीचा उमेदीच्या काळात झालेला हा अंत केवळ एका अपघाताची कथा नाही, तर साहसी खेळांच्या नावाखाली चालणार्‍या निष्काळजीपणाचा एक जळजळीत पुरावा आहे.

या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला, तो यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची साक्ष देतो. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी मारियाला सुरक्षा दोरी न बांधताच लिमेइरा येथील 'स्केलेटन ब्रिज'वरून खाली ढकलून दिले. १०० फुटांहून अधिक उंचीवरून जमिनीवर आदळल्यानंतरही मारियाचा श्वास सुरू होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या परिचारिका रेजा डायस हिने दाखवलेली तत्परता आणि मारियाला दिलेला मानसिक धीर कौतुकास्पद होता. परंतु, दुसरीकडे ज्या कर्मचार्‍यांवर सुरक्षेची जबाबदारी होती, त्यांनी माणुसकीला काळिमा फासला. मुलगी खाली पडताच स्वतःची सुटका करण्यासाठी कपडे बदलून पळून जाण्याचा नीच प्रयत्न त्यांनी केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्या खर्‍या. मात्र, 'सुरक्षा दोरी बांधण्याची जबाबदारी कोणाची होती?' या पोलिसांच्या प्रश्नावर आरोपींचे 'आम्हाला आठवत नाही' हे उत्तर त्यांच्या अतीव निष्काळजीपणाची आणि बेफिकिरीची परिसीमा दाखवते. एका जंपमागे पैसे कमवायचे; पण सुरक्षेची जबाबदारी विचारल्यावर आठवत नाही, असे उत्तर देणे ही क्रूरतेची आणि बेजबाबदारपणाची पराकाष्ठाच म्हणावी लागेल.

ब्राझीलमधील या कंपनीकडे 'बंजी जंपिंग' आयोजित करण्याची अधिकृत परवानगीच नव्हती, असा दावा समोर आला आहे. त्यामुळे कोणताही थरार अनुभवण्यापूर्वी संबंधित कंपनीकडे शासनाचा अधिकृत परवाना आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रमाणपत्रे आहेत की नाही, याची ग्राहकांनी स्वतः खात्री केली पाहिजे. कर्मचार्‍यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. उडी मारण्यापूर्वी आपली सुरक्षा दोरी, हार्नेस आणि लॉक व्यवस्थित लावले आहेत की नाही, हे स्वतः तपासा किंवा दुसर्‍या तज्ज्ञाकडून पुन्हा तपासून घेतले पाहिजे. खेळ आयोजित करणारे मार्गदर्शक किंवा ऑपरेटर प्रशिक्षित आहेत का? त्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे का? याचीही खात्री केली पाहिजे. स्थानिक प्रशासनाने अशा पर्यटनस्थळांवर आणि साहसी खेळांच्या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेटी देऊन 'सुरक्षा ऑडिट' करणेदेखील बंधनकारक केले पाहिजे.

मारियाच्या दुर्दैवी अपघातातून संपूर्ण जगाने, विशेषतः तरुणाईने आणि साहसी खेळ आयोजित करणार्‍या कंपन्यांनी मोठा बोध घेण्याची गरज आहे. क्षणभराचा आनंद आणि थरार हा आयुष्यापेक्षा मोठा असू शकत नाही. मारिया अपघाताच्या काही तास आधी सोशल मीडियावर अत्यंत उत्साहात 'पोस्ट' करत होती. अनेकदा या उत्साहाच्या भरात आपण सभोवतालच्या धोयांकडे दुर्लक्ष करतो. साहसी खेळ खेळताना डोळे आणि कान उघडे ठेवणे सर्वांत महत्त्वाचे. त्याचबरोबर बेकायदेशीरपणे चालणार्‍या अशा कंपन्यांवर आणि त्यांच्या मालकांवर केवळ सदोष मनुष्यवधाचा नाही, तर कठोर दंडात्मक गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही पर्यटकांच्या जीवाशी खेळण्याचे धाडस करणार नाही.

'नॅशनल सेफ्टी काऊन्सिल'च्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत स्पोर्ट्स आणि 'रिक्रिएशनल इंज्युरीज'मध्ये १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडसारख्या देशांनी 'साहसी पर्यटनविषयक नियमन'अंतर्गत प्रत्येक ऑपरेटरला कडक ऑडिटमधून जाणे बंधनकारक केले आहे. तसे कायदे जगभर हवेत. 'अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स'च्या नावाखाली अवैधरीत्या सुरू असलेला हा 'मौत का कुआँ' आता ठेचून काढण्याची वेळ आली आहे. मारियाच्या आईचा आक्रोश हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर 'सिस्टम'च्या नाकर्तेपणाविरुद्धचा संताप आहे. शेवटी, निसर्गाचा आनंद आणि साहसाचा थरार हा केवळ नियमांचे काटेकोर पालन आणि सर्वोच्च सुरक्षेच्या पायावरच अनुभवला पाहिजे. कारण, धाडस हे कौतुकास्पद असू शकते. पण, सुरक्षेशिवाय केलेले धाडस म्हणजे आत्महत्येचेच निमंत्रण!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai