Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'विश्वासघात' तुझे नाव अरविंद केजरीवाल!

'विश्वासघात' तुझे नाव अरविंद केजरीवाल!

राघव चड्ढासहित आम आदमी पार्टीच्या सात राज्यसभा सदस्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. अरविंद केजरीवाल यांना हा मोठा धक्का होता. आपलाही 'उद्धव ठाकरे' होणार का? या भयगंडाने त्यांना नक्कीच पछाडले असणार!

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले, अरविंद केजरीवाल यांचे मुख्यमंत्रिपद जनतेनेच घालविले. पंजाबमध्ये यश मिळाल्यामुळे थोडी-बहुत राजकीय शक्ती राहिली. सातपैकी पाच राज्यसभा खासदार पंजाबमधून निवडले गेलेले आहेत. उद्या पंजाबही हातचा जाणार का? माध्यमात यासंबंधी चर्चा चालू आहे. त्यानिमित्ताने...

राजकीय पक्षांमध्ये फाटाफूट झाली की, ठरावीक वाक्यप्रयोग ऐकायला मिळतात; 'पक्ष सोडून गेलेले गद्दार आहेत', 'त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे', 'त्यांनी पक्षाचा विश्वासघात केलेला आहे', 'भाजपने त्यांना विकत घेतले आहे' अशी 'स्क्रिप्ट' पक्षनेता चालवीत राहातो. पक्षनेत्याच्या दृष्टीने हा मोठा धक्का असतो. अशी फाटाफूट ही पक्षनेता दुर्बळ झाल्याची द्योतक असते. म्हणून, पक्षनेत्याला 'मी वाघ आहे' हे सांगण्यासाठी 'म्यॅव...म्यॅव' करावीच लागते. तो त्याला 'डरकाळी' म्हणतो. नेता म्हणतो की, पक्ष सोडून गेलेल्यांनी विश्वासघात केला. दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत जरा विचार करूया. विश्वासघात त्यांच्या अनुयायांनी केला की, खुद्द अरविंद केजरीवाल यांनी केला? प्रश्नाचे उत्तर असे आहे की, अरविंद केजरीवाल हा राजकारणातील विश्वासघाताचा एक चेहरा आहे. महाराष्ट्रातही असा एक चेहरा आहे, कोण ते वाचकांनी ओळखावे. अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासघाताचा इतिहास खूप बोलका आहे. तो असा -

अण्णा हजारे यांनी २०११ला दिल्लीमध्ये भ्रष्टाचारविरुद्ध उपोषण सुरू केले. अण्णा हजारेंची प्रतिमा राजकारणी नाही. तेव्हाची घोषणा होती, 'अण्णा हजारे आँधी हैं, आज का गांधी हैं|' लोकांनी दिलेली ही घोषणा. तिचा अर्थ होतो, महात्मा गांधींना ज्याप्रमाणे सत्तेच्या कोणत्याही पदाचा लोभ नव्हता, व्यक्तीश: त्यांना काही मिळवायचे नव्हते, तीच गोष्ट अण्णा हजारेंची. या आंदोलनात केजरीवाल घुसले. आंदोलन हे प्रचंड जनजागृती करणारे होत चालले आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांचे राजकीय डोके तसे खूपच सुपीक असल्यामुळे उदंड पीक देणारे झाले. अण्णा हजारे यांचे आंदोलन संपले आणि अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टी'चा जन्म झाला. ते पक्षाचे सर्वेसर्वा झाले. अण्णा हजारेंना हे अपेक्षित नव्हते. 'हेचि फळ काय मम तपाला|' असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. हा पहिला विश्वासघात! चेल्याने गुरूचा केलेला हा विश्वासघात. विश्वासघात हे पापच! त्यात गुरूचा विश्वासघात हे महापाप!!

अरविंद केजरीवाल अतिशय धूर्त, महत्त्वाकांक्षी आणि राजकीय उचापती करण्यात निष्णात होते. त्यांनी आपली प्रतिमा 'मी भ्रष्टाचारमुक्त आहे, मी जनहितासाठी समर्पित आहे, मी सर्वस्वाचा त्याग करण्यात सिद्ध आहे, मी निष्काम कर्मयोगी आहे,' अशी फार उत्तम प्रकारे घडविली. 'सूरत से कीरत बडी, बिना पंख उड़ जाय' या उक्तीप्रमाणे अरविंद केजरीवाल यांची कीर्ती सर्व देशभर पसरत गेली. राजकारणात येण्यापूर्वी ते उच्चपदस्थ सनदी अधिकारी होते. देशात निवृत्त झालेल्या सनदी अधिकार्‍यांची संख्या मोठी आहे, त्यातील अनेकजण कर्तबगार आहेत. समाजात प्रबुद्ध जनांचा एक वर्ग असा होता की, ज्याला असे प्रामाणिकपणे वाटत होते की, देशाला चुकीच्या मार्गाने नेले जात आहे. राज्यघटनेचा उदात्त ध्येयवाद प्रत्यक्षात येत नाही. सगळ्या व्यवस्था सुधारल्या पाहिजेत. असे वाटण्यात निष्णात वकील, ज्येष्ठ पत्रकार, प्रवचनकार, काही उद्योजक अशी संख्या मोठी आहे.

काही नावे सांगायची तर, प्रशांत भूषण, कुमार विश्वास, स्वामी मालीवाल, अशोक मित्तल, हरभजन सिंग, योगेंद्र यादव, कॅप्टन गोपीनाथ, विनोदकुमार बिन्नी, पत्रकार आशुतोष ही सर्व मंडळी केजरीवाल यांना सोडून गेली. त्याचे एकमेव कारण असे की, केजरीवाल हा विश्वासघातकी माणूस आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांची कथनी आणि करणी यात काहीही मेळ नाही. हा लोकांना गंडवण्यात आणि भूलविण्यात तज्ज्ञ आहे. स्वत:चे 'नाममहात्म्य' वाढविण्यात दंग आहे. लोकशाही पद्धतीने पक्ष न चालविता, हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवितो. आपण जो ज्येष्ठ विचार घेऊन आलो, त्याला येथे काहीही पडसाद नाही. एका अर्थाने ते निराश होऊन बाहेर पडले. विश्वासघाताचे हे दुसरे रूप.

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वत:साठी आलिशान बंगला बांधला. त्याचे शौचालय किती लाखांचे, फर्निचर किती लाखांचे हे सर्व वाचकांनी वाचलेले असेल, असे गृहीत धरतो. पंचावर राहाणार्‍या गांधींचा आणि खादीचे कपडे वापरणार्‍या अण्णांचा हा लबाड, धूर्त लोकांना नादी लावणारा, एका अर्थाने भोंदूबाबा दिल्लीच्या निवडणुकीत आपटला. एक उक्ती आहे, 'सर्व लोकांना काही काळ फसविता येतं, काही लोकांना सर्वकाळ फसविता येतं; परंतु सर्व लोकांना सर्वकाळ फसविता येत नाही.' ही उक्ती अरविंद केजरीवालच्या बाबतीत १०० टक्के खरी झाली. अरविंद केजरीवाल यांना सत्तेचा माज इतका चढला, इतका चढला की, ते म्हणू लागले, "मला हरविण्यासाठी मोदींना १०० जन्म घ्यावे लागतील. दिल्लीत मला हरविणे अशक्य आहे.' आपली जनता भोळी आहे. व्यक्तिपूजकही आहे, त्याच वेळी ती तेवढी शहाणीदेखील असते. तिचे शहाणपण घमेंडी राजकीय नेत्यांच्या लक्षात येत नाही आणि जनता शांतपणे काहीही आवाज न करता त्या नेत्याच्या कानाखाली अशी खेचते की, त्याला गाणे म्हणावे लागते, 'ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ...' आणि मग त्याचा 'अरविंद केजरीवाल' होतो.

हे केजरीवाल दिल्ली उच्च न्यायालयात महिला न्यायमूर्ती स्वरणाकांता शर्मा यांना सांगतात, "तुम्ही 'आरएसएस'शी संबंधित आहात. तुम्ही माझ्यावर न्याय करू शकणार नाही. कारण, मी 'आरएसएस'च्या विरोधी विचारधारेचा आहे.' विचारधारा कशाशी खातात याची अक्कल ज्याला नाही, त्याने संघाच्या विचारधारेसंबंधी बोलणे म्हणजे, 'खेकड्याने हत्तीला सरळ चाल' असा उपदेश करण्यासारखे आहे. बरे झाले, केजरीवाल कोर्टात बोलले, त्याला प्रसिद्धी मिळाली आणि दिल्लीमध्ये संघ स्वयंसेवकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. ते केजरीवालला विसरणार नाहीत आणि त्याचे अर्थ पुढील सर्व निवडणुकांमध्ये लक्षात येत राहतील. अशी ही एका राजकारण्याची विश्वासघातकी कथा...

- रमेश पतंगे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai