Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विश्वशांतीची रंगपूजा

विश्वशांतीची रंगपूजा

जैन कमल म्हणजे कलेच्या प्रांतातील अध्यात्माचा वारकरी! कलेच्या क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ मुशाफिरी करताना, जैन कमल यांच्या मनाच्या डोहामध्ये अध्यात्माचा विचार सातत्याने तरळत होता.

या अध्यात्माची अभिव्यक्ती ज्या वेळेला त्यांनी कागदावर उतरवली, त्यावेळी त्याला असलेल्या सत्याचं, सत्वाचं आणि स्वत्वाचं भान रसिकांना मोहवून टाकणारं ठरवलं. त्यांच्या अध्यात्मिक ऊर्जेचा धगधगता स्रोत 'विश्व शांति के लिए णमोकार महामंत्र' या प्रदर्शनात दर्शकांना अनुभवायला मिळतो. जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि. १ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये प्रेक्षकांना हे प्रदर्शन बघता येणार आहे. या चित्रप्रदर्शनाचा मागोवा घेणारा हा लेख..

भारतीय संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, ही संस्कृती विश्वशांतीचे सनातन मूल्य जपणारा विचार देते. हिंसाचार, रक्तपात, आक्रमकता हा ज्यावेळी काही विशिष्ट धर्मांचा स्वभावधर्म झाला होता, त्या काळात जगाला महावीरांचा आणि बुद्धाचा विचार आपल्या राष्ट्राने दिला. ही मूल्यं मूळातच चिरंतन असल्यामुळे त्यांना कुणी या मातीतून वेगळे करु शकले नाही. काळाच्या ओघात विविध प्रभावांनी समाजाची रचना सातत्याने बदलत गेली. मात्र, हा सत्वशील विचार तसूभर सुद्धा कमी झाला नाही. एक कलाकार ज्यावेळी आपल्या कुंचल्यातून हाच विचार लोकांसमोर ठेवतो, त्यावेळी समाजाला दिशा देणारी कलाकृती निर्माण होते, अस्थिरतेच्या, दिशाहीन प्रभावांच्या जंजाळात न अडकता, नेमका कुठला रस्ता योग्य आहे, याची प्रचिती लोकांना येते. 'णमोकार महामंत्रा'च्या माध्यमातून हा विचार आपल्या समाजाचा भाग झाला आहे. या विचारांची सुलेखनातून, चित्रांमधून साकारलेली कल्पक अभिव्यक्ती आकर्षक तर आहेच, मात्र त्याच बरोबर कलेला अध्यात्मिक मूल्यांचं कोंदण देणारं आहे.

'णमोकार महामंत्र' हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र, अनादी आणि मूळ मंत्र. या महामंत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे किंवा देवाचे नाव घेतलेले नसून, सर्वोच्च गुणांची पूजा बांधली गेली आहे. माणसाचं जीवन त्याच्या सद्गुणांवर अवलंबून असतं. या सद्गुणांच्या मार्गावरुन जर तो ढळला, तर त्याच्या जीवनाचे पतन सुरु होते. विविध अक्षरचित्रांच्या माध्यमातून, भाषा, लिपी यांच्यातील सीमांना छेद देत एक अमूर्त अशा स्वरुपाची कलाकृती तयार करण्यात जैन कमल यशस्वी ठरले आहेत. यातील एका चित्रामध्ये विश्वाच्या केंद्रस्थानी असलेला नाद आणि त्यातून निर्माण होणारी निर्मिती, अशा संकल्पनेचा एक सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. केंद्रस्थानी असलेला गडद निळा-जांभळा आणि तपकिरी वर्तुळ, असीम अवकाशाचे आणि त्यातील आदिम शक्तीचे प्रतीक वाटते. त्याभोवती असलेले फिके निळे पार्श्वभूमी, शांती आणि विशालता दर्शवते. या पार्श्वभूमीवर अत्यंत नाजूक आणि गोलाकार पद्धतीने मांडलेली अक्षरे, जणू काही 'णमोकार महामंत्रा'च्या ध्वनीलहरी आहेत, ज्या संपूर्ण विश्वात घुमत आहेत. अक्षरांच्या रंगांमधील विरोधाभास-केंद्रस्थानी गडद आणि बाहेर फिकट-जणू काही मंत्राचा प्रभाव आणि त्याची व्याप्ती अधोरेखित करतो. ब्राम्ही लिपीपासून ते रोमन लिपीपर्यंत विविध लिपींच्या माध्यमातून सबंध काळाला कवेत घेणारा 'णमोकार महामंत्र' या चित्रांच्या केंद्रस्थानी आहे. कोट्यवधी 'णमोकार मंत्रां'चे दर्शन म्हणजे असीम ऊर्जेचा सागर. अक्षरे जेव्हा स्वतःची ओळख गमावून केवळ एक सुंदर आकार बनतात, तेव्हा ती 'अमूर्त' बनतात. ही अमूर्तता चित्रकाराने केवळ जपलीच नाही, तर या अक्षरचित्रांच्या महायज्ञात रुजवली आहे.

या चित्रप्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कुठलीही भिडभाड न ठेवता, आपल्या कलेतून जैन कमल यांनी मांडलेला आपला राजकीय विचार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीच्या तपपूर्तीच्या पार्श्वभूमीवर या चित्रप्रदर्शनाला म्हणूनच वेगळे महत्त्व आले आहे. या चित्रप्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ एका कलाकृतीचे विषय म्हणून आपल्यासमोर येत नाही, तर 'राष्ट्र प्रथम' या भूमिकेचा विश्वास म्हणून या वेगवेगळ्या कलाकृती आपल्या समोर येतात. ' ये नया हिंदुस्तान हैं, घर में घुसेगा भी और मारेगा भी' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वाय म्हणजे केवळ भारताच्या सुरक्षिततेबद्दलचं भाष्य नसून, भारताचं सामर्थ्य जगाला ठणकावून सांगणारं आहे. कमल जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंचावलेल्या बोटासह ठाम निर्धार व्यक्त करणारी आकृती 'पॉप-आर्ट' शैलीत रेखाटली आहे. जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणि 'विश्वबंधुत्व' किंवा जागतिक शांततेचा संदेश अधोरेखित करणारे चित्र सुद्धा यामध्ये आहे. ओबामा-ट्रम्प-बायडन यांच्या प्रतिमांमधून भारत-अमेरिका संबंध आणि जागतिक भू-राजकारण दर्शवले आहे. वृत्तपत्राच्या कात्रणांचा वापर हा दर्शवतो की, इतिहास रोज लिहिला जात आहे आणि या जागतिक घडामोडींमध्ये 'शांतता' हाच अंतिम हेतू असला पाहिजे. ब्राह्मी लिपी ही सर्व भारतीय लिपींची जननी आहे; तिला आधुनिक नेत्याच्या प्रतिमेसोबत जोडणे म्हणजे 'प्राचीन वारसा आणि आधुनिक नेतृत्व' यांचा मेळ घालणे होय. काळ्या पार्श्वभूमीवरील केशरी रंगाचा 'वन्दे मातरम्' हा शब्द राष्ट्रवादाची ठसठशीत जाणीव करून देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'विकास' आणि 'विरासत' यांच्या संगमाचा मंत्र जो कोट्यवधी भारतीयांना दिला आहे, त्याची आपल्याला या चित्रातून आठवण होते.

जैन कमल यांच्या कलाकृती विश्वबंधुत्वाची साक्ष देणार्‍या आणि भारतीय संस्कृतीचे प्राचीन मूल्यं अधोरेखित करणार्‍या आहेत. एकेकाळी कमल स्वत: सत्यजित रे यांना गंगेच्या घटावर भेटले होते, काळाच्या ओघात जैन कमल यांच्या कलाकृतींची तुलना सत्यजित रे यांच्या कलात्मक साधनेशी, कलाकृतींशी करण्यात आली. एकाप्रकारे नियतीने यानिमित्ताने त्यांच्या कामाला दिलेली ही दाद आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

"अक्षरांच्या माध्यमातून मंत्रांना आणखी सौंदर्याने कसे लोकांसमोर ठेवता येईल, याचा विचार मी सातत्याने करत होतो. हे काम पूर्ण करण्यासाठी मी अनेक मंत्रांवर संशोधन केले. मात्र, यातील 'णमोकार मंत्रा'चे वैशिष्ट्य म्हणजे, हा मंत्र गुणांना नमन करणारा मंत्र आहे. या मंत्राची अभिव्यक्ती वेगवेगळ्या भाषेच्या माध्यमातून मी लोकांसमोर मांडली. त्याचबरोबर मी या प्रवासात ब्राम्ही लिपीसुद्धा शिकलो. या माझ्या प्रवासातून एक वेगळा कलाकृती उभी राहिली असं मला वाटतं" - जैन कमल, ज्येष्ठ चित्रकार तथा अक्षरशिल्पी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai