Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१३ वर्षे उपचाराची प्रतीक्षा अन् तन्वीचा मृत्यू!

१३ वर्षे उपचाराची प्रतीक्षा अन् तन्वीचा मृत्यू!

नवी दिल्ली.

Tanvi passes away दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये उपचारासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर राजस्थानच्या कोटा येथील १६ वर्षीय तन्वीचा १ सप्टेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला.

जन्मापासूनच गंभीर हृदयविकार असलेल्या तन्वीच्या उपचाराबाबत कुटुंबीयांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, तिच्या मृत्यूनंतर शस्त्रक्रिया का होऊ शकली नाही, यावर प्रश्न उपस्थित होत असताना एम्स प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.एम्सच्या अधिकृत माहितीनुसार, तन्वीची पहिली वैद्यकीय तपासणी १० ऑक्टोबर २०१२ रोजी कार्डिओलॉजी ओपीडीमध्ये झाली होती. तपासणीनंतर तिला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणजेच VSD आणि पल्मोनरी अॅट्रेसिया असल्याचे निदान झाले. हे दोन्ही जन्मजात हृदयाशी संबंधित विकार असून, यामुळे हृदयातून फुफ्फुसांकडे रक्त पोहोचण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात.

यानंतर २०१३ मध्ये तन्वीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करता येईल का, यासाठी सविस्तर वैद्यकीय मूल्यांकन करण्यात आले. तिच्या हृदयाची रचना आणि आजाराची स्थिती समजून घेण्यासाठी सीटी अँजिओग्राफी, पारंपरिक अँजिओग्राफी तसेच कार्डियाक कॅथेटरायझेशनसारख्या तपासण्या करण्यात आल्या. या प्रक्रियेतून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे २०१७ मध्ये तिच्या हृदयाची रचना आणि आजाराची गुंतागुंत पाहता शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.त्यानंतर तन्वीला नियमित वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. कुटुंबीयांनी मात्र शस्त्रक्रियेच्या पर्यायाबाबत इतर तज्ज्ञांचे मत घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. गेल्या वर्षी कार्डिओथोरॅसिक अँड व्हॅस्क्युलर सर्जरी अर्थात CTVS विभागाच्या प्रमुखांकडूनही सल्ला घेण्यात आला होता. तेथूनही औषधोपचार सुरू ठेवण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या एका वरिष्ठ कार्डिओथोरॅसिक सर्जनकडून मत घेतले असता त्यांनीही औषधोपचार कायम ठेवण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, तन्वीची प्रकृती खालावत गेल्यानंतर तिला २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले. यावेळी तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिची गंभीर स्थिती लक्षात घेऊन हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपणाची शक्यता तपासण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचार सुरू असतानाच १ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.तन्वीच्या वडिलांनी एम्समधील उपचार प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे. मुकेश कुमार यांनी आपण गेल्या १४ वर्षांपासून दिल्लीमध्ये मुलीच्या उपचारासाठी ये-जा करत असल्याचे सांगितले. केवळ औपचारिकता किंवा कारणे नकोत, तर संबंधित डॉक्टरवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. तीन वेळा तक्रार करूनही आपल्या मुलीला वाचवता आले नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रकरणावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एम्सने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसोबतच उपचारातील पारदर्शकता, पुराव्यावर आधारित वैद्यकीय निर्णय आणि उत्तरदायित्व यांना संस्थेचे प्राधान्य असल्याचे एम्सने स्पष्ट केले आहे. तन्वीच्या मृत्यूबाबत शवविच्छेदनातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही एम्स प्रशासनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur