Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१४१ विकेट्सचा अनुभवी गोलंदाज पुन्हा येणार?

१४१ विकेट्सचा अनुभवी गोलंदाज पुन्हा येणार?

नवी दिल्ली,

Will the experienced bowler return भारतीय संघाने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी सुरू केली असताना अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला २-१ असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर संघाच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर क्रिकेट तज्ज्ञांकडून भुवनेश्वर कुमारला पुन्हा संघात संधी देण्याची मागणी होत आहे. मात्र, भारतीय संघात पुनरागमनाबाबत भुवनेश्वर कुमारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याने सांगितले की, सध्या तो ज्या परिस्थितीत आहे त्यात आनंदी असून क्रिकेटमधील बदल हा खेळाचा एक भाग असल्याचे त्याला मान्य आहे.

भुवनेश्वर कुमारने आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, "मी खूप शांत आहे आणि याचे श्रेय माझ्या कुटुंबाला जाते. आमच्या घरी कधीही क्रिकेटबद्दल चर्चा होत नाही. मी भारतीय संघात परत येऊ शकतो का किंवा माझी निवड का झाली नाही, यावरही आम्ही बोलत नाही. बदल हा खेळाचा एक मोठा भाग आहे. काळानुसार नवीन पिढी येते आणि तो खेळाचा भाग आहे. सध्या मी जिथे आहे तिथे आनंदी आहे." भुवनेश्वर कुमारने २०२२ मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने खेळत आहे. मागील आयपीएल हंगामातही त्याने प्रभावी गोलंदाजी करत आपली क्षमता दाखवून दिली होती.

पुनरागमनाच्या शक्यतेबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला, "मी भारतीय संघाकडून खेळलो आहे आणि ही गोष्ट आता मिळवायची नाही. जर मला पुन्हा संधी मिळाली तर ती चांगली गोष्ट असेल. मात्र, मला माहित आहे की मला शिस्त कायम ठेवावी लागेल. मी देशांतर्गत क्रिकेट खेळतो, यूपी टी-२० लीगमध्येही खेळतो."

यावेळी त्याने आयपीएलचेही कौतुक केले. आयपीएलने अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज घडवले असून, नव्या खेळाडूंना संधी देणे महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत भारतासाठी १२१ एकदिवसीय सामने खेळले असून, ३५.११ च्या सरासरीने १४१ बळी घेतले आहेत. अनुभवी गोलंदाजाच्या या वक्तव्यानंतर त्याच्या संभाव्य पुनरागमनाबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur