Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
28 स्फोटांनी हादरले कीव!

28 स्फोटांनी हादरले कीव!

कीव,

28 explosions rock Kyiv रशियाने युक्रेनविरुद्ध मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करत राजधानी कीवसह अनेक महत्त्वाच्या भागांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या कारवाईत युक्रेनमधील लष्करी तळ, ड्रोन उत्पादन केंद्रे, हवाई तळांचे नेटवर्क आणि इंधन साठवण सुविधा अचूकपणे लक्ष्य करण्यात आल्या.

या हल्ल्यांनंतर युक्रेनमध्ये मोठी हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.रशियाने विशेषतः ओडेसा येथील ड्रोन कॉम्प्लेक्सवर लक्ष्य साधल्याचा दावा केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या मते, या केंद्रात तयार होणारे ड्रोन रशियातील तेल शुद्धीकरण कारखाने आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्यासाठी वापरले जात होते. या कारवाईचे कथित ड्रोन फुटेजही रशियाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

याशिवाय, युक्रेनमधील विविध भागांमध्ये बसवण्यात आलेल्या स्टारलिंक टर्मिनल्सनाही लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. रशियाचा दावा आहे की, या टर्मिनल्सच्या मदतीने युक्रेनचे ड्रोन सॅटेलाइट आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवत होते, ज्यामुळे रशियाच्या सीमेत हल्ले करणे शक्य होत होते. मात्र, या दाव्यांबाबतही स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही.गेल्या 24 तासांत युक्रेनची राजधानी कीवमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोट झाले. स्थानिक वृत्तांनुसार शहरातील तब्बल 28 ठिकाणी हल्ले झाले असून संपूर्ण शहर हादरून गेले. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहेत. अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले असून ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपला आयर्लंड दौरा तातडीने अर्धवट सोडला आणि कीवकडे परतले. सुरक्षा यंत्रणांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच मदतकार्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा अधिक तीव्र होत असल्याचे या हल्ल्यांवरून स्पष्ट होत आहे. सतत वाढणाऱ्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur