Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आज भारताचा 'गोल्ड मिशन'!

आज भारताचा 'गोल्ड मिशन'!

ग्लासगो,

Commonwealth-games-2026 : राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धेत ३१ जुलैचा खेळ संपला तेव्हा भारताच्या खात्यात एकूण २३ पदके जमा झाली होती. यामध्ये ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा समावेश आहे.

आता १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची मोठी अपेक्षा आहे.

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पदकांची बरसात होणार?

आज सर्वात जास्त नजरा बॉक्सिंगच्या खेळावर खिळलेल्या असतील. वेगवेगळ्या वजन गटांमधील अंतिम आणि पदक फेऱ्यांमध्ये तब्बल १० भारतीय बॉक्सर रिंगमध्ये उतरणार आहेत. त्यामुळे आज भारताच्या सुवर्णपदकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची दाट शक्यता आहे.

ट्रॅक अँड फील्डमध्ये भारतीय अ‍ॅथलीट्स सज्ज

बॉक्सिंग व्यतिरिक्त अ‍ॅथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडू आपले कौशल्य दाखवतील. पोल वॉल्टच्या अंतिम फेरीत देव मीना आणि कुलदीप कुमार हे भारताचे प्रतिनिधित्व करतील. ट्रिपल जंपच्या फायनलमध्ये प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभु थिरुमारन यांच्याकडून पदकाची मोठी आशा आहे.

तसेच, याआधी १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावणारा गुलवीर सिंह आता ५,००० मीटर शर्यतीत दुसऱ्या पदकासाठी शर्यतीत उतरेल. ज्युडोमध्ये महिलांच्या ६३ किलो वजन गटात उन्नति शर्मा एलिमिनेशन फेरीत आपली मोहीम सुरू करेल.

१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारताच्या सामन्यांचा सविस्तर क्रम (भारतीय वेळेनुसार)

दुपारचे सत्र (दुपारी २:३० ते ४:००)

दिवसाची सुरुवात ट्रॅक सायकलिंगने होईल. दुपारी २:३० वाजता पुरुषांच्या स्प्रिंट क्वालिफिकेशन फेरीत डेव्हिड बेकहॅम एल्काटोहचूंगो, रोनाल्डो सिंग लैतोंजम आणि रोजित सिंग यांगलेम उतरतील. त्यानंतर दुपारी २:३५ वाजता पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या F57 शॉट पुट पदक फेरीत शुभम जुयाल आणि सोमन राणा आव्हान सादर करतील.

दुपारी २:४० वाजता अ‍ॅथलेटिक्सच्या पुरुषांच्या ट्रिपल जंप पदक फेरीत प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभु थिरुमारन मैदानात असतील. पाठोपाठ दुपारी २:५० वाजता पॅरा अ‍ॅथलेटिक्सच्या १५०० मीटर T54 पदक फेरीत रमेश शन्मुगम धावेल. दुपारी ३:०० वाजता महिलांच्या १०,००० मीटर रेस वॉकिंग पदक फेरीत प्रियांका गोस्वामी आणि रवीना गायकवाड सहभागी होतील.

दुपारी ३:३० वाजता एकाच वेळी ज्युडो आणि बॉक्सिंगचे सामने सुरू होतील. ज्युडोमध्ये महिलांच्या ६३ किलो गटात उन्नति शर्मा आणि ईस्वातीनीची लमुलेला मगागुला आमनेसामने असतील. पुरुषांच्या ९० किलो गटात करनजीत सिंग मानचा सामना न्यूझीलंडच्या इलियट कोनॉलीशी होईल. पुरुषांच्या ८१ किलो क्वार्टर फायनलमध्ये हर्ष टोकस आणि सायप्रसचा ओडिसियस जॉर्जकिस भिडतील, तर महिलांच्या ७० किलो क्वार्टर फायनलमध्ये इनुंगनबी टखेलंबम मैदानात उतरेल. याच वेळी बॉक्सिंगच्या महिला ५४ किलो पदक फेरीत प्रीती पवार कॅनडाच्या स्कार्लेट सवाना डेलगाडोविरुद्ध खेळेल.

दुपारी ३:४५ वाजता बॉक्सिंगच्या महिला ५७ किलो पदक फेरीत जॅस्मिन लॅंबोरियाचा सामना नॉर्दर्न आयर्लंडच्या मायकेला वॉल्शशी होईल. दुपारी ३:५० वाजता लॉन बॉल्समध्ये पुरुषांच्या पेअर्स सेक्शनल प्लेमध्ये भारत (नवनीत सिंग, दिनेश कुमार) आणि इंग्लंड आमनेसामने असतील.

संध्याकाळचे सत्र (संध्याकाळी ४:१५ ते रात्री १०:००)

संध्याकाळी ४:१५ वाजता बॉक्सिंगच्या पुरुष ५५ किलो पदक फेरीत जादुमणी सिंग ऑस्ट्रेलियाच्या जे डिक्सनशी भिडेल. त्यानंतर संध्याकाळी ४:१९ वाजता ट्रॅक सायकलिंगच्या १० किमी स्क्रॅच रेस क्वालिफायंगमध्ये दिनेश कुमार आणि हर्षवीर सिंग सेखों उतरतील.

रात्रीच्या सत्रात बॉक्सिंगचाचा धमाका पाहायला मिळेल. रात्री ९:०० वाजता महिला ५१ किलो पदक फेरीत साक्षी चौधरी विरुद्ध इंग्लंडची रुबी व्हाईट असा सामना होईल. रात्री ९:१५ वाजता महिला ६० किलो पदक फेरीत प्रिया घांघस कॅनडाच्या मॅरी-बथौल अल-अहमदीहविरुद्ध उतरेल. रात्री ९:३० वाजता महिला ७० किलो पदक फेरीत अरुंधति चौधरी इंग्लंडच्या चँटेल रीडशी दोन हात करेल.

रात्रीचे सत्र (रात्री १०:१५ ते मध्यरात्र)

रात्री १०:१५ वाजता बॉक्सिंगच्या महिला ७५ किलो पदक फेरीत स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन ऑस्ट्रेलियाच्या एम्मा सू ग्रीनट्रीविरुद्ध सुवर्णपदकासाठी उतरेल. रात्री १०:२० वाजता लॉन बॉल्सच्या महिला सिंगल्स सेक्शनल प्लेमध्ये नयनमोनी सैकिया दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिजेट हर्सेलमनविरुद्ध खेळेल.

रात्री १०:४५ वाजता पुरुषांच्या ६० किलो पदक फेरीत सचिन सिवाच नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग न्डेवेलोशी भिडेल. रात्री ११:१५ वाजता पुरुषांच्या ८० किलो पदक फेरीत अंकुश पांघलचा सामना इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूशी होईल. रात्री ११:३५ वाजता अ‍ॅथलेटिक्सच्या पुरुषांच्या पोल वॉल्ट पदक फेरीत देव मीना आणि कुलदीप कुमार आपले कौशल्य दाखवतील.

रात्री ११:४५ वाजता पुरुषांच्या ९०+ किलो पदक फेरीत नरेंद्र बेरवाल इंग्लंडच्या डमार थॉमसशी भिडेल. याच वेळी भारतीय पुरुषांची लॉन बॉल्स पेअर्स टीम पात्र झाल्यास सेमीफायनल सामना खेळेल.

दिवसाचा शेवट मध्यरात्रीनंतर अ‍ॅथलेटिक्सच्या दोन मोठ्या स्पर्धांनी होईल. मध्यरात्री १२:१५ वाजता पुरुषांच्या ५,००० मीटर पदक फेरीत गुलवीर सिंह धावेल, तर मध्यरात्री १:५० वाजता मिक्स ४x४०० मीटर रिले पदक फेरीत विशाल टीके, राजेश रमेश, रशदीप कौर आणि नीरू पाठक ही भारतीय चौकडी भारतासाठी पदक मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur