Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आरोग्य निर्देशांकात गोंदिया 'टॉप वन'!

आरोग्य निर्देशांकात गोंदिया 'टॉप वन'!

जिल्हा आरोग्य विभागाच्या सांघिक कामगिरीची राज्यस्तरावर दखल

गोंदिया,

Gondia ranks first in the health index जिल्हा आरोग्य विभागाच्या नियोजनबद्ध कामकाजाला आणि आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला राज्यस्तरावर मानांकन मिळाले आहे.

राज्याच्या पहिल्या तिमाहीतील आरोग्य निर्देशांक रँकिंगमध्ये 46.57 गुणांसह गोंदिया जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध राष्ट्रीय कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि निर्धारित उद्दिष्टांची पूर्तता यामुळे गोंदियाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दर तीन महिन्यांनी राज्यस्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रातील विविध आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांकाच्या आधारे जिल्ह्यांचे मानांकन केले जाते. माता व बालक आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, विविध लसीकरण मोहिम, आरसीएच ऑनलाइन पोर्टलवरील नोंदणी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम तसेच आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत दिल्या जाणार्‍या मोफत आरोग्य तपासण्यांसह विविध निकषांचा यात समावेश असतो. दरम्यान, शनिवारी 29 ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय काटकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संचालक रुग्णालये आरोग्य सेवा (मुंबई) डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक प्राथमिक आरोग्य केंद्रे (पुणे) डॉ. विजय कंदेवाड, नागपूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्यासह राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात 45 प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 263 आरोग्य उपकेंद्रे, चार 'आपला दवाखाना' आणि 17 नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे कार्यरत आहेत. या आरोग्य यंत्रणेमार्फत ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना विविध आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत. सुरक्षित प्रसूती, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा पाठपुरावा, कुटुंब नियोजन, विविध लसीकरण मोहिम, 108 व 102 रुग्णवाहिका सेवा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यासह विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच कामगिरीचे प्रतिबिंब राज्यस्तरीय मानांकनात उमटले आहे.

नागपूर, वर्धा, अकोला व गडचिरोलीही टॉपर...

या मानांकनात गोंदिया जिल्ह्याने 46.57 गुण मिळवत प्रथम स्थान मिळविले. तर यानंतर नागपूर जिल्ह्याला 45.79 गुणांसह द्वितीय, वर्धा 45.17 गुणांसह तृतीय, अकोला 44.39 गुणांसह चतुर्थ तर गडचिरोली 44.14 गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिला.

विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून आरोग्य निर्देशांकात मिळालेले प्रथम स्थान हे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍याच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे.

- डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur