Dailyhunt
आयपीएल सुरू होताच पांढरकवड्यासह ग्रामीण भागात सट्टेबाजीला ऊत

आयपीएल सुरू होताच पांढरकवड्यासह ग्रामीण भागात सट्टेबाजीला ऊत

तभा वृत्तसेवा

पांढरकवडा,

Betting-in-pandharkavda 'इंडियन प्रिमियर लीग' क्रिकेटचा हंगाम सुरू होताच शहरासह पांढरकवडा आणि परिसरातील ग्रामीण भागात क्रिकेट सट्टेबाजीला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.

पूर्वी शहरापुरती मर्यादित असलेली ही प्रवृत्ती आता गावागावांत पोहोचली असून युवकांमध्ये ती आवड बनत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल अ‍ॅप्स, टेलिग्राम व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सच्या माध्यमातून 'लाईव्ह बेटिंग' सुरू असून स्थानिक एजंटमार्फत रोख आणि ऑनलाईन व्यवहार दोन्ही पद्धतीने सट्टा घेतला जात आहे.

विशेष म्हणजे, या सट्टेबाजीचे नियंत्रण मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद आणि थेट दुबई यांसारख्या मोठ्या शहरांतून होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कारवाई करणे कठीण ठरत आहे.दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात सट्टेबाजी उघडपणे सुरू असतानाही पोलिस यंत्रणा अद्याप प्रभावी कारवाई करताना दिसत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गावागावांत सट्टा सुरू आहे, तरी कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

या सट्टेबाजीचे गंभीर सामाजिक परिणामही समोर येत आहेत. यापूर्वी काही व्यक्तींनी कर्जबाजारीपणामुळे आपली घरे, दुकाने तसेच शेती विकल्याच्या घटना घडल्या आहेत. जलद पैसा कमावण्याच्या मोहात अडकलेले अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असून त्यांच्या कुटुंबांवर संकट कोसळत आहे. काही आत्महत्यांच्या घटनांमागेही सट्टेबाजीमुळे आलेला मानसिक व आर्थिक ताण कारणीभूत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून सायबर सेल, आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस यांनी संयुक्त मोहीम राबवून या सट्टेबाजीच्या जाळ्यावर आळा घालावा, असे आवाहन केले आहे.आयपीएल उत्साहाच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेली ही सट्टेबाजी भविष्यात गंभीर सामाजिक समस्या निर्माण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur