Dailyhunt
अचानक नदीकाठी लाखो मृत माशांचा खच

अचानक नदीकाठी लाखो मृत माशांचा खच

बारामती

Neera River पुणे आणि सातारा जिल्ह्यांची जीवनवाहिनी असलेल्या नीरा नदीचे पाणी गंभीर प्रकारे दूषित झाले असून, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळे हा प्रकोप निर्माण झाला आहे.

कारखान्याने प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्यानंतर लाखो माशांचा मृत्यू झाला असून, कोऱ्हाळे बुद्रुक येथे नदीकाठी मृत माशांचा खच दिसून आला आहे. या घटनेमुळे नदीतील जैवविविधतेवर गंभीर धोका निर्माण झाला आहे.

कोऱ्हाळे बुद्रुक आणि आसपासच्या गावांमध्ये मृत माशांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या भयंकर वासामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवाशांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

नदीतील Neera River जलचरांचा बळी घेणाऱ्या सोमेश्वर साखर कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) या घटनेची तातडीने दखल घेऊन कारखान्याला नोटीस बजावावी आणि संबंधित गुन्हे दाखल करावेत.नीरा नदीतील मासे केवळ जैवविविधतेचा भाग नसून, अनेक स्थानिक मच्छिमार कुटुंबांची उपजीविका यावर अवलंबून आहे. कारखान्याच्या या हलगर्जीपणामुळे मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नदीतील परिसंस्था संपूर्ण कोलमडली आहे.स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या गंभीर घटनेवर कोणती पावले उचलणार आहेत, याकडे बारामती तालुक्याचे सर्व लक्ष लागले आहे. रहिवाशांची मागणी आहे की, भविष्यात अशा प्रकारच्या प्रदूषणावर कठोर निर्बंध घालून पर्यावरणाची सुरक्षा सुनिश्चित करावी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur