Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'अल्फा'मधील काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री

'अल्फा'मधील काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री

मुंबई

Alpha यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुचर्चित 'अल्फा' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचे जोरदार प्रमोशन सुरू असून, अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी वाघ विविध ठिकाणी जाऊन चित्रपटाचा प्रचार करत आहेत.

नुकतीच आलिया भट पुण्यातही प्रमोशनसाठी आली होती. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, कथा, आलिया भट आणि शर्वरी वाघ यांचे दमदार अॅक्शन सीन्स तसेच बॉबी देओलचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, 'अल्फा'मधील काही दृश्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) दिल्याची माहिती समोर आली आहे. सीबीएफसीने चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी देताना काही आवश्यक सुधारणा करण्यास सांगितले आहे. चित्रपटाला 'UA 16+' प्रमाणपत्र देण्यात आले असून, त्याचा रनटाईम १४० मिनिटे, म्हणजेच २ तास २० मिनिटे ४८ सेकंद इतका आहे.

सीबीएफसीने चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात येणारा डिस्क्लेमर पुन्हा लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व गाण्यांसोबत इंग्रजी सबटायटल्स जोडण्यास सांगितले आहे. चित्रपटातील चाकू हल्ल्याचा एक सीन बदलून त्याऐवजी पर्यायी दृश्य समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले असून, एक आक्षेपार्ह शब्दही हटविण्यात आला आहे.

याशिवाय, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने आवश्यक त्या ठिकाणी अँटी-अल्कोहोल (मद्यपानविरोधी) स्टॅटिक संदेश समाविष्ट करण्यास तसेच 'जीएसआर-ई नियम २२, १९८३'नुसार सर्व अनिवार्य प्रमाणपत्र कार्ड आणि चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात येणारा एंड-स्क्रॉल समाविष्ट करण्याचे निर्देशही दिले आहेत. आशयाशी संबंधित बदलांव्यतिरिक्त, चित्रपटाची संवाद पटकथा (डायलॉग स्क्रिप्ट) सादर करणे, बालकलाकारासाठी पालकांचे संमतीपत्र देणे आणि चित्रपटाचा अंतिम रनटाईम स्पष्ट करणे, अशा औपचारिक बाबींची पूर्तताही निर्मात्यांना करण्यास सांगण्यात आली होती.विशेष म्हणजे, सीबीएफसीच्या नोंदींनुसार चित्रपटातील कोणतेही फुटेज कापण्यात आलेले नाही. आवश्यक बदल आणि सुधारणा या दृश्यांमध्ये फेरबदल करून करण्यात आल्या आहेत. या सर्व सुधारणांनंतर 'अल्फा'ला सिनेमागृहातील प्रदर्शनासाठी 'UA 16+' प्रमाणपत्र देण्यात आले आहे.यशराज फिल्म्स निर्मित 'अल्फा' हा स्टुडिओच्या सर्वात मोठ्या अॅक्शनपटांपैकी एक मानला जात असून, तो 'वायआरएफ स्पाय युनिव्हर्स'चा महत्त्वाचा भाग आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट ३ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur