Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'अनसंग हिरों'चा शोध घेणाऱ्या मंदाताई!

'अनसंग हिरों'चा शोध घेणाऱ्या मंदाताई!

मुंबई वार्तापत्र...

नागेश दाचेवार,

Mandakinitai-bhat : १५ ऑगस्ट हा केवळ तिरंगा फडकविण्याचा, राष्ट्रगीत म्हणण्याचा किंवा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे त्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना स्मरण करण्याचा, ज्यांच्या त्यागाच्या पायावर आपल्या स्वातंत्र्याची इमारत उभी राहिली.

इतिहासाच्या सुवर्णपानांवर काही नावे अक्षरांनी कोरली गेली; पण त्या अक्षरांच्या सावलीत हजारो चेहरे काळाच्या अंधारात हरवून गेले. कुणी तुरुंगाच्या कोठडीत यातना सोसल्या, कुणी भूमिगत राहून लढा दिला, कुणी घरादाराचा त्याग केला, तर कुणी स्वातंत्र्याची पहाट पाहण्याआधीच हौतात्म्य पत्करले. हीच विस्मृतीची धूळ झटकून त्या 'अनाम स्वातंत्र्यवीरांचा' शोध घेण्याचे, त्यांची नावे आणि त्यांची गाथा समाजासमोर आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य मंदाकिनीताई यांनी हाती घेतले आहे. सध्याच्या घडीला त्यांनी एक हजारच्या आसपास स्वातंत्र्यसमरातील अशाच 'अनाम स्वातंत्र्यवीरांना' प्रकाशझोतात आणले आहे. आज वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांचे ज्वलंत देशभक्तांचा शोध आणि त्यांच्यावरील लेखन अविरतपणे सुरू आहे. मुळात ताईंनी आपले ते एकमेव ध्येयच बनवून घेतले आहे.

मंदाकिनीताई भट या ज्येष्ठ लेखिका, सावरकर विचारांच्या कृतिशील अभ्यासक आणि मुद्रण-साहित्य क्षेत्रातील एक निष्ठावंत व्यक्तिमत्त्व आहेत. राष्ट्रभक्ती, क्रांतिकारकांचे जीवन आणि मराठी भाषा संवर्धनासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे वासुदेव भट यांच्या त्या कन्या, तर ग्रंथालय चळवळीत दीर्घकाळ सेवा देणाऱ्या सुधा भट यांच्या त्या भगिनी होत. घरातूनच लाभलेला वाचन आणि ग्रंथसेवेचा वारसा त्यांनी स्वतःच्या सशक्त व स्वतंत्र लेखनशैलीतून समृद्ध केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडील दामोदर सावरकर यांच्यावर पहिल्यांदाच चरित्र लिहून त्यांचे अप्रकाशित पैलू वाचकांसमोर आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. मॅडम कामा, कवी गोविंद, सावरकर विचार दर्शन, तेजोनिधी, तेजोभास्कर, क्रांतिकारकांच्या सावल्या, सावरकरांचे समाजकारण अशी त्यांची गाजलेली काही पुस्तके आहेत. शिक्षिकेची नोकरी सांभाळत त्यांनी सुमारे २०० ते २५० मान्यवर लेखकांच्या पुस्तकांच्या मुद्रण प्रती आणि मुद्रितशोधनाचे अत्यंत दर्जेदार काम केले आहे.

नव्या पिढीतील लेखकांना योग्य दिशा देणे आणि अचूक मुद्रितशोधनाचे धडे देण्याचे कार्य त्या आजही सातत्याने करतात. हिंदुमहासभा, अखिल भारतीय कीर्तन संस्था, मराठी वृत्तपत्र संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांसारख्या विविध संस्थांमध्ये त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे. प्रेमळ पण परखड, स्पष्टवक्त्या आणि बाणेदार स्वभाव हे मंदाकिनीताईंचे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेची समृद्धी, शब्दांचे अचूक उच्चार आणि राष्ट्रभक्तीचा प्रचार-प्रसार ही त्यांची जीवननिष्ठा राहिली आहे. मात्र, त्यांनी आज इतिहासाच्या पानात उपेक्षित राहिलेल्या आणि समाजमनातून विस्मृतीत गेलेल्या 'अज्ञात राष्ट्रभक्तांचा' शोध घेऊन त्यांचे शौर्य जगासमोर आणण्याचे हाती घेतलेले कार्य हे 'न भूतो न भविष्यति' असे अलौकिक व अविस्मरणीय आहे. ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, पण ज्यांच्या नावाचा साधा नामोल्लेखही इतिहासाने केला नाही, अशा अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक आणि देशभक्तांच्या त्यागाला अविरत संशोधनातून त्यांनी नवसंजीवनी दिली आहे. अशाच हजार स्वातंत्र्यवीरांचा शोध म्हणजे केवळ हजार नावे शोधणे नव्हे, तो हजार कुटुंबांच्या वेदना शोधण्याचा, हजार बलिदानांच्या पाऊलखुणा पुन्हा वाचण्याचा आणि इतिहासाच्या हरवलेल्या पानांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे.

स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास म्हणजे केवळ काही मोठ्या नेत्यांच्या संघर्षाची कथा नव्हे. तो भारताच्या कानाकोपऱ्यात पेटलेल्या असंख्य मशालींचा इतिहास आहे. गावोगावी, वाड्यावस्त्यांमध्ये, शेताच्या बांधावर, जंगलाच्या वाटेवर, कारागृहाच्या अंधाऱ्या कोठडीत आणि भूमिगत चळवळीच्या गुप्त ठिकाणी स्वातंत्र्याची आग धगधगत होती. त्या धगेला नाव देणारे, त्या त्यागाला चेहरा देणारे अनेक जण मात्र इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून आज हरवले आहेत.

स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची बाजी लावणाऱ्या क्रांतिकारकांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या, घराचे घरपण टिकवून त्यांना मानसिक बळ देणाऱ्या त्यांच्या पत्नींचे योगदान तितकेच मोलाचे होते, परंतु इतिहासाच्या पानात या स्त्रिया सदैव दुर्लक्षित राहिल्या. मंदाकिनीताईंनी केवळ अज्ञात क्रांतिकारकांचाच शोध घेतला नाही, तर त्यांच्या पाठीशी असणाऱ्या अशा सुमारे १५० क्रांतिसावल्यांचा (पत्नींचा) मागोवा घेत 'क्रांतिकारकांच्या सावल्या' या पुस्तकातून त्यांच्या त्यागाची अमरगाथा साकारली. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या या आदिशक्तींना आणि त्यांच्या अतुलनीय राष्ट्रसेवेला प्रकाशात आणण्याचे मंदाकिनीताईंचे हे कार्य अत्यंत संवेदनशीलच आहे. मंदाकिनीताईंच्या कार्याचे वेगळेपण इथेच अधोरेखित होते.

इतिहासाच्या पुस्तकांत जे दिसते ते वाचणे सोपे असते, पण इतिहासाच्या पानांमधून जे निसटून गेले आहे, ते शोधण्यासाठी जिद्द, संवेदनशीलता आणि अथक संशोधनाची गरज असते. जुन्या कागदपत्रांमध्ये, कुटुंबांच्या आठवणींमध्ये, गावच्या स्मृतींमध्ये आणि विस्मृतीत गेलेल्या संदर्भांमध्ये त्या स्वातंत्र्यवीरांच्या अस्तित्वाचा मागोवा घेतला जातो. काळाच्या ओघात धूसर झालेल्या आठवणींना पुन्हा उजाळा देणे म्हणजे जणू राखेत दडलेल्या निखाऱ्याचा शोध घेणे. मंदाकिनीताईंचे हे कार्य त्याच अर्थाने इतिहास संशोधना पलीकडचे आहे. याला एक स्मृतिसंवर्धनाचे राष्ट्रीय कार्यच म्हणावे लागेल.

आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो. आपल्या हातातला तिरंगा अभिमानाने फडकतो. संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत. लोकशाहीने आपल्याला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण या प्रत्येक स्वातंत्र्यामागे कुणाचातरी त्याग आहे, कुणाचेतरी अश्रू आहेत, कुणाचातरी तुरुंगवास आहे आणि कुणाचेतरी प्राणार्पण आहे. म्हणूनच स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात केवळ प्रसिद्ध नावांचा जयघोष पुरेसा नाही. ज्यांची नावे इतिहास विसरला त्यांनाही इतिहासाच्या स्मरणात स्थान मिळाले पाहिजे. मंदाकिनीताईंचा हजार स्वातंत्र्यवीरांचा शोध हा म्हणूनच एका व्यक्तीचा प्रकल्प न राहता समाजाच्या सामूहिक स्मृतीला जागविणारी चळवळ ठरते. कारण राष्ट्र केवळ वर्तमानात जगत नाही, ते आपल्या इतिहासाच्या स्मृतींवरही उभे असते. ज्या समाजाला आपल्या बलिदानांची आठवण राहते, तोच समाज आपल्या स्वातंत्र्याची खरी किंमत जाणतो. १५ ऑगस्टच्या पहाटे जेव्हा तिरंगा आकाशात डौलाने फडकतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक रंगात असंख्य स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न सामावलेले असते. त्या तिरंग्याकडे पाहताना एखाद्या प्रसिद्ध नेत्याची आठवण येते, पण त्याच क्षणी इतिहासाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या अनाम वीरांचीही आठवण झाली पाहिजे. इतिहासाच्या विस्मृतीत हरवलेल्या या अनाम ज्योती पुन्हा प्रज्वलित झाल्या, तर स्वातंत्र्याची कहाणी अधिक व्यापक, अधिक समृद्ध होईल. त्यामुळे आता तिरंग्याला सलाम करताना आपण त्या हजार अनाम वीरांनाही मनापासून अभिवादन करूया आणि त्यांच्या स्मृतींना प्रकाशात आणणाऱ्या मंदाकिनीताईंच्या ध्यासालाही वंदन करूया.

९२७०३३३८८६

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur