Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली आयसीयूमध्ये दाखल

अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली आयसीयूमध्ये दाखल

मुंबई

Anna hazare ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अहिल्यानगरमधील राळेगण सिद्धीजवळील स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना मुंबईत हलविण्यात आले. डॉक्टरांचे पथक सध्या त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांना तीव्र विषाणू संसर्गासोबतच निर्जलीकरणाचा त्रास झाला आहे. त्यानंतर त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची सविस्तर तपासणी सुरू असून विविध चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे. सध्या त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.दरम्यान, भ्रष्टाचारविरोधी आंदोलने आणि उपोषणांमुळे देशभरात ओळख निर्माण झालेले अण्णा हजारे यांनी अलीकडेच नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. २० जुलै रोजी आंदोलकांनी संसदेकडे काढलेल्या मोर्चादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा आणि हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला होता. याप्रकरणी हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारला केले होते.जंतरमंतरवरील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांनी दोन तासांचे मौन आंदोलनही केले होते. २३ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मौन पाळून त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.अण्णा हजारे सुमारे दीड दशकापूर्वी 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' (आयएसी) आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते. त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा आणि उपोषणाचा त्यावेळच्या देशाच्या राजकारणावर तसेच सामाजिक चर्चेवर मोठा प्रभाव पडला होता.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि बेरोजगारी यांसारख्या तरुणांशी संबंधित गंभीर समस्यांचाही उल्लेख केला होता. या प्रश्नांकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे आव्हान म्हणून पाहू नये, असे त्यांनी म्हटले होते. या समस्या समाजातील व्यापक असंतोष आणि तरुणांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur