Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अपघाताची मालिका पाच ठार, सहा जण जखमी

अपघाताची मालिका पाच ठार, सहा जण जखमी

मुंबई

Samruddhi Mahamarg accident राज्यातील विविध भागांत बुधवारी झालेल्या भीषण अपघातांच्या मालिकेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्ग, जळगाव, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये घडलेल्या या अपघातांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही ठिकाणी वाहनांचा वेग, तर काही ठिकाणी नियंत्रण सुटल्याने हे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील दुसरबीडजवळ फॉर्च्युनर कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर आणि त्यांची पत्नी गुलीस्तानबी असे मृतांचे नाव आहे. हे कुटुंब नागपूरहून संभाजीनगरकडे प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या दुर्घटनेत कारमधील आणखी तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. पाळधीजवळील सावदा-रिंगणगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला. किरण बाबूलाल राक्षे-मराठे (३८), चेतन पाटील (३५) आणि प्रदीप उखा निकम (४०) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील Samruddhi Mahamarg accident मुंबई-गोवा महामार्गावरही एक भीषण अपघात घडला. गोव्याहून कणकवलीकडे जाणाऱ्या थार वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन जोरात धडकले. नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात झालेल्या या अपघातात वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत श्रीमती नानोडकर (४३) आणि विलासिनी सातार्डेकर (५३) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालक सनी नानोडकर, उज्वला कांबळी आणि पांडुरंग नानोडकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील हरणबारी-मुल्हेर मार्गावर टिप्पर आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन आणखी एक गंभीर अपघात घडला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.राज्यातील विविध भागांत एका दिवसात घडलेल्या या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाढता वेग, निष्काळजी वाहनचालक आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात असून, वाहनचालकांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur