Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अर्शदीप सिंगचा विक्रम; भुवनेश्वरला टाकले मागे!

अर्शदीप सिंगचा विक्रम; भुवनेश्वरला टाकले मागे!

क्राइस्टचर्च,

Arshdeep-singh भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दोन बळी घेत त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

या कामगिरीसह त्याने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा चार वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडला निर्धारित २० षटकांत १८० धावांवर रोखले. अर्शदीप सिंगने चार षटकांत ३३ धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. या दोन बळींसह अर्शदीपच्या २०२६ या वर्षातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील बळींची संख्या ३८ वर पोहोचली. यापूर्वी हा भारतीय विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता. भुवनेश्वरने २०२२ मध्ये एका कॅलेंडर वर्षात ३७ बळी घेतले होते. आता अर्शदीपने त्याला मागे टाकत भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंगने यापूर्वीही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने २०२४ मध्ये ३६ आणि २०२२ मध्ये ३३ बळी घेतले होते. वरुण चक्रवर्तीने २०२५ मध्ये ३६ बळी मिळवले, तर अक्षर पटेलने २०२६ मध्ये आतापर्यंत ३२ बळी घेतले आहेत. दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्यत्व असलेल्या देशांच्या गोलंदाजांचा विचार करता, एका वर्षात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अद्याप आयर्लंडच्या जोशुआ लिटलच्या नावावर आहे. त्याने २०२२ मध्ये ३९ बळी घेतले होते. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने २०२४ मध्ये ३८ बळी मिळवले होते. अर्शदीप सिंगनेही २०२६ मध्ये ३८ बळी घेत या यादीत स्थान मिळवले आहे.

आता जोशुआ लिटलचा विक्रम मोडण्यासाठी अर्शदीपला आणखी दोन बळींची आवश्यकता आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. सातत्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर अर्शदीपला जागतिक स्तरावरही नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur