Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अशी पत्नी, असा मुलगा!

अशी पत्नी, असा मुलगा!

वेध

Nasrapur rape case महाराष्ट्राच्या मातीने संतांची परंपरा जोपासली, माणुसकीचे धडे दिले, स्त्रीचा सन्मान हा संस्कार म्हणून रुजवला. पण, कधी कधी एखादी घटना या सगळ्या मूल्यांना हादरा देते.

नसरापूर येथे तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिला ठेचून मारण्याची घटना समाजाच्या अंतःकरणाला भेदणारी वेदना आहे. ही घटना ऐकताना शब्द सुचत नाहीत आणि बोलताना आवाज थरथरतो. अशा घटनांनंतर समाजात संताप उसळतो, रस्त्यावर आंदोलने होतात, कठोर शिक्षेची मागणी केली जाते. पण, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण कुठे चुकतो आहोत? तीन वर्षांच्या मुलीचं आयुष्य अजून सुरूही झालं नव्हतं. तिच्या जगात खेळणी होती, आईची कूस होती आणि निरागस हास्य होतं. पण, एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार करून जीवाने संपवून टाकले.

अशा घटना अचानक घडत नाहीत. त्या एका विकृत मानसिकतेच्या, समाजातील काही चुकीच्या प्रवृत्तींच्या आणि आपल्या सामूहिक दुर्लक्षाचा परिणाम आहे. आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? स्त्री-पुरुष समानता, आदर, सहानुभूती हे केवळ पाठ्यपुस्तकात राहिले आहेत का? नसरापूरमध्ये झालेलं आंदोलन हे जनतेच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. लोक रस्त्यावर उतरले, न्यायाची मागणी केली. ही भावना योग्यच आहे. पण, आंदोलन हा केवळ तात्पुरता प्रतिसाद असतो. काही दिवसांनी सगळं शांत होतं आणि आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होतो. प्रश्न असा आहे आपण या घटनांमधून काही शिकलो का? या प्रकरणात आरोपी कांबळेच्या पत्नीने केलेलं वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरतं. त्याला ठेचून काढा, मला ते सांगू नका, असे प्रसार माध्यामांना सांगितले. तर त्या नराधमाच्या मुलानेही अशा बापाच्या पोटी जन्म घेतल्याची लाज वाटते, असे स्पष्ट शब्दांत म्हटलं. त्या माय-लेकाचं विधान नात्यांपेक्षा माणुसकी मोठी असल्याचं स्पष्ट होतं. कदाचित, ते उद्विग्न होऊन बोलले असतीलही. पण, अशा वेळी त्यांनी त्याची पाठराखण केली नाही. तो मानसिक रुग्ण आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही, हे या ठिकाणी विशेष नोंदवले गेले पाहिजे. गुन्हेगार कोणीही, कोणत्याही वयाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही समाजाचा, कोणत्याही धर्माचा असो त्याचे समर्थन नाही, ही भूमिका समाजाने घ्यायला हवी. हेच त्या माय-लेकाने स्पष्ट केले. अन्यथा समाजात नवऱ्याच्या अनेक वाईट सवयींवर पांघरूण घालणाऱ्या बायका आहेत. मुलाने कितीही वाईट कृत्य केले तरी मुलाला पदराआड घेणारी आईही याच समाजात आहे. अशा घटना रोखायच्या असतील तर सुरुवात घरापासून करावी लागेल. मुलांना लहानपणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवणं गरजेचं आहे. मुलगा आहे, थोडंफार चालतं ही मानसिकता बदलावी लागेल. पालकांनी मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि योग्य-अयोग्य याची जाणीव करून देणं आवश्यक आहे. समाजातील विकृत घटना कायम थांबणाèया नाहीत. कारण प्रत्येक कुप्रवृत्तीला आळा घालण्याचे काम कायदा करू शकत नाही. नसरापूर येथील घटनेतील आरोपीला यापूर्वीच कठोर शिक्षा झाली असती तर कदाचित ही तीन वर्षांची चिमुकली बळी गेली नसती. परंतु, कायद्याचा साक्षीवर फारच भरवसा आहे. ती खोटी साक्ष असली तरी चालेल.nasrapur rape case पण, साक्षीदार हवा असतो. अशा घटनांमध्ये शिक्षा न होण्याला कायद्याचा मोठा अडसर आहे. हा अडसरच गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देते. कठोर कायदे असणं महत्त्वाचं आहे. पण, त्याहून महत्त्वाची आहे त्यांची अंमलबजावणी. अनेक वेळा गुन्हेगारांना शिक्षा होण्यास उशीर होतो किंवा ते सुटून जातात. त्यामुळे समाजात भीती निर्माण होत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट, कडक शिक्षा आणि पोलिस यंत्रणेची जबाबदारी हे सगळं प्रभावीपणे केलं पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो हे सगळं सरकारचं काम आहे. पण समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. संशयास्पद वर्तन दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तक्रार करणं, पीडितांना आधार देणं आणि जागरूकता वाढवणं हे सगळं आपण करू शकतो. स्त्रीसुरक्षा हा केवळ कायद्याचा विषय नाही, तो सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिकतेचा विषय आहे. नसरापूरची घटना आपल्याला हादरवून सोडते. पण हा हादरा केवळ काही दिवसांचा न राहता, तो बदलाचा प्रारंभ व्हायला हवा. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली. तरच समाज बदलू शकतो.

त्या निष्पाप मुलीला आपण परत आणू शकत नाही. पण, तिच्या आठवणीला न्याय देण्यासाठी, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. हे जरी सत्य असले तरी कायदा कठोर करण्याची गरज आहे. तसेच समाजात त्या कांबळेच्या पत्नी आणि मुलासारख्या मुलाचीही गरज आहे तेव्हाच घरातून, समाजातून गुन्हेगारीला आळा बसेल.

प्रफुल्ल व्यास

9881903765

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur