Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बांबर्डा-चामला रस्त्यावर वाघोबाचा सहपरिवार मुक्त संचार

बांबर्डा-चामला रस्त्यावर वाघोबाचा सहपरिवार मुक्त संचार

तळेगाव (शा. पंत),

Crowd of villagers to see the tiger आष्टी तालुक्यातील घनदाट जंगल परिसरालगत असलेल्या बांबर्डा ते चामला मार्गावर वाघ, वाघीण आणि दोन बछड्यांचा मुक्त संचार अनेकांनी शनिवारी प्रत्यक्ष डोळ्यात साठवला.

परिसरात वाघ असल्याची माहिती परिसरात परसरली. हजारो रुपये खर्च करून अभयारण्यात वाघ पाहण्यासाठी जाणार्यांनी गावाशेजारी वाघाला सहकुटुंब बघण्यासाठी गर्दी केली होती.

मारुती घटी यांच्या शेताजवळ वाघ, वाघीण आणि दोन बछडे रस्त्यालगत फिरताना कारचालकाला दिसली. कारचालक चापले यांनी हा संपूर्ण थरारक प्रसंग आपल्या कॅमेर्यात कैद केला आहे. गत काही दिवसांपासून बांबर्डा परिसरात वाघ आणि अस्वलाचा वावर असल्याची चर्चा गावकर्यांमध्ये होती. मात्र, आता वाघ, वाघीण आणि दोन बछड्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वीच अंबादास चंदीवाले यांच्या गायीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. या घटनेनंतर परिसरात वन्यप्राण्यांच्या मुक्त संचार हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच आता वाघ, वाघीण आणि दोन बछडे एकत्रित दिसल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. वाघाचे कुटंुब रस्त्याच्या वळणाजवळ दिसताच परिसरातील नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी धाव घेतली. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाल्याने वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पिलांसह असलेली वाघीण धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, वाघ, वाघीण आणि बछड्यांचा वावर थार, चामला, बांबर्डा आणि बोरखेडी या गावांच्या परिसरात असल्याने चारही गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतात जाण्यासही धास्तावत नाही. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिस कर्मचारी मोहित बगलेकर यांनी ग्रामस्थांना शेतशिवारात जाताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur